Search

अळंबी उत्पादन कसे कराल ?

अळंबी उत्पादन कसे कराल ?
[Total: 47    Average: 2.6/5]

लहानपणातील काही गोष्टी खूप गंमतीशीर असतात. आपल्यापैकी अनेकांनी कुत्र्याची छत्री हे नाव ऐकले असेल, काहींनी पहिले असेल, हाताळले असेल किंबहुना अनेकांचे ते आवडीचे खाद्य असेल. आलं का लक्षात? बरोबर हि जी विशेषणे लावली गेली आहेत ते अळंबी किंवा मशरूम म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात निसर्गात ही वनस्पती आपल्याला आढळते.  मशरूमला जगभर एक ‘पौष्टिक अन्न’ म्हणून मान्यता मिळालेली आहे.

अळंबी किंवा मशरूमचे औषधी गुणधर्म

 • मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. अशा प्रकारच्या अन्नाची गरज मधुमेही व्यक्तींना असते. मशरूममध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करणारे घटक आहेत.
 • मूत्रपिंड (किडनी) रोग्यांचा जीवनकाळ वाढविण्यास उपयुक्त.
 • कमी उर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूम मध्ये कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे.
 • मशरूममध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. मशरूमचे नियमित सेवन केल्यास स्कर्व्ही रोगापासून बचाव होऊ शकतो.
 • पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरिता मदत करणारे अन्न

अळंबीचे प्रकार

बटन मशरूम:
बटन मशरूम

 • बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या प्रदेशात केली जाते. बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतांवर केली जाते.
 • दीर्घ मुदतीची पद्धत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्दतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट तयार केले जाते.
 • ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते.
 • कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बी पेरले जाते.
 • १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खात, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो व उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.

शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम) :
धिंगरी मशरूम

 • नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५%) या मशरूमची लागवड ८-१० महिने करता येते.
 • संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात.
 • धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे. अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो.
 • धिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
 • २०० लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी अळंबी उत्पादन घेऊ शकतो.

अळंबी लागवड

 बी पेरणे :
अळंबीची लागवड

 • प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा. अंदाजे दोन ते अडीच इंच. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे.
 • बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा. पुन्हा बी चा थर, असे करून पिशवी भरावी.
 • बी पेरताना ओल्या काडाच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना काड दाबून भरावे.
 • पिशवी भरल्यावर दोऱ्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत.
 • छिद्रे पाडताना दाभण किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा.

उबविणे :
4mushroom

 • बुरशीच्या वाढीकरिता उबविणे ही महत्वाची क्रिया आहे.
 • बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात.
 • खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे.

पिशवी काढणे :
5mushroom

 • पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते.
 • ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी.
 • तापमान २० ते ३० अंश सेल्सियस  व आद्रता ७०-८५% राहील याची दक्षता घ्यावी.
 • खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी.
 • पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी.
 • दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी.
 • फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा.

काढणी :
6mushroom

 • मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते.
 • वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत.
 • मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे.
 • १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.
 • एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते.
 • शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.

 साठवण :
7mushroom

 • ताज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या २००-३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात.
 • मशरूम ४-५ दिवस फ्रीजमध्ये उत्तम राहते. मशरूम उन्हात दोन दिवसात उत्तम वाळते.
 • मशरूम वाळवण्याकरिता ४५-५० अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते.
 • वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.

अळंबीचे भरघोस उत्पादन येण्याकरिता महत्वाच्या बाबी :

 •  मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा.
 •  मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे.
 •  मशरूमच्या खोलीत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यावी.
 •  खोलीतील तापमान ३० अंश सेल्सियस व आद्रता ८०% राहील याची काळजी घ्यावी.
 •  आळिंबी लागवड करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे, चप्पल यांचा वापर करावा.
 •  नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा.
 •  काडाचे निर्जंतुकीकरण महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी.
 •  सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधीप्रकाश बॅग उघडल्यावरच भरपूर ठेवावा.
 •  मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे.
 • पिशव्या भरण्यापूर्वी काड फार ओले नसावे. हाताने दाबून पाहावे. पाणी न निघाल्यास भरण्यास योग्य आहे, असे समजावे.
 • पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर १० इंच ठेवावे.
 • रोग, किडीचा, चिलटांचा प्रादुर्भाव झाल्यास नुवान ( १ मि.मि., १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.)
 • आळिंबीचे स्पॉन विश्वसनीय संस्थेमार्फतच घ्यावे. जुने, काळसर, हिरवी बुरशी असणारे स्पॉन वापरू नये.
 • भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये कीडी, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नाही ना, या करिता दर रोज निरीक्षण करावे.
 • मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायरमध्ये आळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी.

अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आपण यशस्वी उत्पादन घेऊ शकतो.

स्त्रोत : वनराई संस्था

Related posts

Shares