Search

आंब्याच्या पल्पची करा साठवण

आंब्याच्या पल्पची करा साठवण

 

Mango Pulp 2
आंब्याचा रंग, मनमोहक सुवास, गोडी आणि मधुर चवीमुळे हे फळ विशेष प्रसिद्ध अाहे. यात जीवनसत्त्व ‘अ’ हे विपुल प्रमाणात आहे. प्रति १०० ग्रॅम आंब्यातून २७४३ मिलि ग्रॅम एवढे अ जीवनसत्त्व मिळते. तसेच अांब्यात जीवनसत्त्व क, फॉस्फरस आणि ऊर्जादेखील भरपूर प्रमाणात असते. हा बहुगुणी आंबा आपल्याला वर्षभर मिळत नाही. तो वर्षभर मिळण्याकरिता आपल्याला त्याचा पल्प काढून त्याची साठवण करता येते.
पारंपरिक पद्धतीने अांब्याचा पल्प साठवाचा असेल तर पाणी न टाकता रस काढून घेऊन त्याला पुरणयंत्रातून बारीक करून चाळणीने चाळून घेतले जाते. आंबटपणाच्या प्रमाणानुसार त्यामध्ये साखर मिसळली जाते. मंद आचेवर स्टीलच्या पातेल्यात रस आटवून तो स्टीलच्या ताटात पसरवून सुकविला जातो आणि रस संरक्षित केला जातो.

आधुनिक पद्धतीने पल्पची साठवण –
– पल्प काढण्याकरिता पूर्ण पिकलेला एकसारख्या आंब्याची निवड करावी.
– आंबे स्वच्छ धुऊन पल्पर मशीनच्या साह्याने साल आणि कोय वेगळी करून रस काढून, गाळून तो पाश्चराईज करून घ्यावा.
– रस पाश्चराईज करण्यासाठी ७० ते ८० अंश सेल्सिअस तापमानाला कमी कालावधीसाठी रस पाश्चरायझेशन मशिनमध्ये गरम करावा. यातून रसातील सूक्ष्मजीवांची संख्या आणि रासायनिक क्रियेवर नियंत्रण मिळवले जाते. त्यामुळे रस खराब होण्याचे टाळले जाते.
– नंतर रस निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत भरून क्रॉऊन कॉर्कची झाकणे लावून, ८५ डी.सें. तापमानात २० ते २५ मिनिटे पाश्चरायझेशन करावे. टिकवण काळ वाढविण्यासाठी सोडियम बेन्झोएट ६०० मिलि ग्रॅम प्रति लिटर रस या प्रमाणे वापरावे आणि रस संरक्षित करून ठेवावा.
– या रसापासून आपल्याला आंबा वडी, आंबा बर्फी, आम्रखंड, कुल्फी, आइस्क्रीम, आंबा स्क्वॅश, सरबत, मिल्क शेक, आंबा जॅम आणि इतर पदार्थ तयार करता येतात.
आवश्यक मशिनरी
बाजारामध्ये क्षमतेनुसार पल्प काढण्याच्या विविध मशिनरी उपलब्ध आहेत पैकी आंबे धुण्यासाठी वॉश मशिन, पल्पिंग मशिन, पाश्चरायझेशन मशिन, पल्प फिलिंग मशिन, पॅकिंग मशिनचा वापर करावा.

Related posts

Shares