Search

आधुनिक तंत्रज्ञान – मल्चिंग पेपरच्या मदतीने भात शेती

आधुनिक तंत्रज्ञान – मल्चिंग पेपरच्या मदतीने भात शेती

शेतामध्ये काम करताना शेतकरी विविध प्रयोग करत असतो, आणि त्याचे हे यशस्वी प्रयोगच कालांतराने आधुनिक तंत्रज्ञानम्हणून ओळखले जाते. पारंपरिक पद्धतीने शेती करताना लागणारा वेळ, मजुरांची अनुपलब्धता आणि दिवसागणिक वाढत जाणारा खर्च यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भातशेती करताना देखील शेतकऱ्यांना अशाच समस्यांचा सामना करावा लागत असतो. आधुनिक तंत्रज्ञान – मल्चिंग पेपरच्या मदतीने भात शेती हा आधुनिक प्रयोग या सगळ्यावर एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. या तंत्रज्ञानाच्या अवलंबाने केवळ खर्चात कपात होत नाही तर कमी वेळात दर्जेदार उत्पादन आल्याने चांगला नफा मिळतो.

गोष्ट नवीन शोधाची :

पालघरला राहणारे श्री. अनिल पाटील हे मूळचे शेतकरी. शेती या व्यवसायाबद्दल आस्था असणाऱ्या पाटील यांनी २००५ साली राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून अचूक शेती संदर्भात अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१० ते २०११ दरम्यान छोट्या शेतजमिनीवर मल्चिंग च्या मदतीने भातशेती करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला. त्यांच्या या प्रयत्नाला कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ज्ञ श्री. कुशारे यांचे मार्गदर्शन लाभले.

mulching-2

मल्चिंग च्या मदतीमुळे होणारे आर्थिक फायदे लक्षात घेत श्री. पाटील यांनी २०१२ मध्ये चार गुंठ्यांमध्ये मल्चिंग च्या मदतीने भातशेती करायला सुरुवात केली. भाताची काढणी झाल्यानंतर त्याच शेतजमिनीत श्री. पाटील यांनी वाल, मका तसेच चणे यांसारखी पिके यशस्वीरीत्या घेतली. २०१४ साली कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने त्याच जमिनीत चणे उगविण्यासंदर्भात चाचणी घेतली. आणि खारीपातील भात लागवडीनंतर चणे लागवडीचा निर्णय घेतला. महत्वाची गोष्ट म्हणजे मल्चिंग च्या मदतीने तांदूळ आणि चणे यांचे पीक उत्तम येत असल्याचा निष्कर्ष निघाला. या तंत्रज्ञानाला सिम्पल राईस फार्मिंगअसे नाव देण्यात आले.

mulching-4

२०१० साली मल्चिंग च्या मदतीने तांदळाचे यशस्वी उत्पादन घेणारे श्री. अनिल पाटील हे केवळ पालघर जिल्ह्यातीलच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातले पहिलेच शेतकरी आहेत. या कामात पाटील यांना पालघर कृषी विद्यापीठाचे वेळोवेळी मिळणारे सहकार्य आणि मार्गदर्शन यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. २०१२ साली पाटील यांनी ४ गुंठे जमिनीत कर्जत या तांदूळ जातीची लागवड केली, आणि याचे परिणाम सुखावणारे होते. आधीच्या पद्धतीमुळे १ हेक्टर जागेत साधारण: ३० ते ४० क्विंटल तांदूळ उत्पादन शक्य होते मात्र मल्चिंग सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे हेच उत्पादन ५ टनांहून अधिक झाले. महत्वाची गोष्ट म्हणजे २०१२ पासून पुढे श्री. पाटील यांच्या उत्पादनात दरवर्षी वाढच होत गेली.

www-gifcreator-me_na7ydh

मल्चिंग भात शेती तंत्रज्ञान :

 • नांगरणी आणि कुळवणी केल्यानंतर गादीवाफे तयार करावेत.

 • .५ फुटांवर सरी खणून घ्याव्यात.

 • गादीवाफ्यांची रुंदी ३ फुटांपर्यंत ठेवावी.

 • दोन गादीवाफ्यांमधील अंतर १.५ फूट ठेवावे.

 • यानंतर गादीवाफ्यांवर मल्चिंग पेपर अंथरावा.

 • पाऊस झाल्यानंतर मल्चिंग पेपर वर १ X १ फुटावर साधारण २ इंचाची छिद्र पाडावीत.

 • मातीमध्ये अपेक्षित ओलावा निर्माण झाल्यानंतर प्रत्येक छिद्रात ४५ बियाणे टाकावीत.

 • बियाण्याची लागवड केल्यानंतर १५ दिवसात युरियाचा हफ्ता द्यावा.

mulching-5

 • दोन गादीवाफ्यांच्या मध्ये छोटी छिद्रे करून युरिया ब्रिकेट्स टाकावे.

 • एक एकरसाठी साधारण ६५ किलो युरिया लागू शकतो.

 • कर्जत हि भाताची जात साधारणपणे ११०१२० दिवसात तयार होते.

चणे लागवड :

 • खरिपातील भाताची काढणी झाल्यानंतर ऑक्टोम्बर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चणे लागवड करता येणे शक्य आहे.

 • लागवड करताना युरिया साठी तयार केलेल्या छीद्रांमध्ये १ ते २ चण्याची बियाणे टाकावीत.

काही महत्वाचं :

 • चण्याची काढणी झाल्यानंतर, खरिफतील भाताची लागवड करता येऊ शकते.

 • महत्वाचे म्हणजे तयार गादीवाफ्यांवर भाताची लागवड शक्य आहे. एकाच गादीवाफ्यावर सलग चार वेळा पीक घेणे शक्य आहे.

 • गादीवाफ्यांवर पसरलेला मल्चिंग पेपर तीन वर्षे वापरता येऊ शकतो.

 • याचाच अर्थ सलग चार वर्षे गादीवाफे तयार करणे, मल्चिंग आणि कामगारांवर होणाऱ्या खर्चात निश्चित कपात होऊ शकते.

mulching-3

मल्चिंग चे फायदे :

 • बियाणे कमी लागते.

 • जमिनीची धूप कमी होते.

 • मल्चिंग च्या वापरामुळे चिखलणी, रोप वाटिका तसेच लावणी व आंतरमशागतीचा खर्च कमी होतो.

 • मशागत आणि गादीवाफे तयार करण्याचा खर्च एकदाच होतो. दोन वर्षांपर्यंत मशागतीचा खर्च टाळता येतो.

 • पाणी मर्यादित लागते.

 • कीटक आणि रोगांपासून पिकाचा बचाव होतो.

 • गादीवाफ्यांवर तण उगवत नाहीत.

 • दर्जेदार आणि अतिरिक्त उत्पादन शक्य होते.

 • उत्पादनात १.५ ते २ पट वाढ होते.

 • एकाच गादीवाफ्यावर तीन वेळा पीक घेणे शक्य.

 • जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने रब्बीत चण्याचे चांगले उत्पादन येते.

शेतकऱ्याची माहिती :

श्री. अनिल पाटील,

गाव सांगे, मुक्काम पोस्ट गोरे,

तालुका वाडा, जिल्हा पालघर, महाराष्ट्र.

पुरस्कार :

 1. महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार २०१२.

 2. वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कृत सर्वोत्कृष्ट भाजी उत्पादक शेतकरीपुरस्कार २००९

 3. प्रहार वृत्तपत्र प्रहार भूषण पुरस्कार“.

 4. प्रगतशील शेतकरी पुरस्कार ठाणे जिल्हा परिषद १९९४१९९५

लेखक : भरत कुशारे

कृषि तज्ञ ( कोसबाड कृषी विज्ञान केंद्र)

कोसबाड हिल,

पालघर , जिल्हा ठाणे.

Related posts

Shares