Search

उच्चशिक्षित दोन बहिणींनी दिली पोल्ट्री उद्योगाला झळाळी

उच्चशिक्षित दोन बहिणींनी दिली पोल्ट्री उद्योगाला झळाळी

मेहनत, पक्षी संगोपनातील धोके, बाजारपेठेतील अनियमितता यामुळे पोल्ट्री व्यवसायात उतरण्याचं धाडस सहजासहजी कुणी करत नाही; मात्र उच्चशिक्षित दोन बहिणींनी आपल्या भावाच्या मदतीने जालना जिल्ह्यातील सोयगाव येथील बंद पडलेला पोल्ट्री फार्म विकत घेतला. अवघ्या वर्षभरातच त्याचा आधुनिक विस्तार केला. दुष्काळी भागात उद्योगाच्या माध्यमातून सुमारे 40 जणांना रोजगारही उपलब्ध केला आहे.

जालना जिल्ह्यात भोकरदनपासून सहा किलोमीटर अंतरावर विभी पोल्ट्री फार्म आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झालेला हा फार्म चांगलाच नावारूपाला येत आहे. सोनाली सुनील भंडारे आणि गीतांजली भीमसेन जाधव या दोन सख्ख्या बहिणींनी मोठ्या धाडसाने हा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना भाऊ गिरीश जाधव यांची खंबीर साथ लाभली.
गिरीश मॅकेनिकल इंजिनिअर, सोनाली सिव्हिल इंजिनिअर, तर गीतांजली जाधव कृषी पदवीधरसह एम.एस.डब्लू. पदवीप्राप्त आहेत. नाशिकसारख्या मोठ्या शहरात गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून या तिघांनी शेतीसोबतच विविध प्रयोग करायचे ठरवले. भोकरदनजवळ बंद अवस्थेतील पोल्ट्री उद्योगाचा 31 मार्च 2012 रोजी बॅंकेकडून ताबा घेतला. येथे पडक्‍या अवस्थेत चार शेड होते. बॅंकेचे पाच कोटी रुपये कर्ज आणि स्वतःकडील सुमारे तीन कोटी रुपये असे सुमारे आठ कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध केले. वीस हजार कोंबड्यांची पिल्ले आणून व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या उद्योगासाठी कुठलेही अनुदान घेतलेले नाही. राष्ट्रीय बॅंकेचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरल्याचे भंडारे सांगतात.

व्यवस्थापनातला नेटकेपणा

खाद्य – कोंबड्यांना मका, सोयाबीन तसेच दहा ते पंधरा प्रकारचे घटक एकत्र करून खाद्य तयार केले जाते. शक्‍यतो शाकाहारी खाद्यच त्यांना दिले जाते. फार्मच्या आवारात ग्राइंडर बसविण्यात आले आहे. सकाळी सात व सायंकाळी चार या खाद्य देण्याच्या वेळा तंतोतंत पाळल्या जातात.
आरोग्य – कोंबड्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. वेळोवेळी लसीकरणाबरोबर औषधे पाण्यातून दिली जातात. आजारी किंवा जखमी कोंबड्यांना स्वतंत्र ठेवले जाते. वेळोवेळी पशुवैद्यकांकडून आरोग्य व्यवस्थापन केले जाते.
सध्या मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई आहे, त्याची झळ पोल्ट्री उद्योगालाही बसतेय. त्यामुळे इथे अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कमीत कमी पाण्याचा वापर केला जातो. फार्मला दररोज पाच ते सहा टॅंकर पाणी लागते. ते विहीर किंवा टाक्‍यांत साठवले जाते. त्यानंतर पाइपलाइनद्वारे पक्ष्यांपर्यंत आणले जाते.

हवेशीर शेड

आजच्या घडीला सहा शेड असून, एकूण सत्तर हजार कोंबड्या फार्ममध्ये आहेत. प्रति शेडमध्ये दहा हजार कोंबड्यांची व्यवस्था असून, नव्या सहाव्या शेडमध्ये वीस हजार कोंबड्या आहेत. उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यातील वातावरणाचा विचार करून पोल्ट्री व्यवस्थापन करण्यात येते. पाणी व खाद्य पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

अल्पावधीतच पोल्ट्रीचा विस्तार
नाशिकसारख्या संपन्न भागातून मराठवाड्यात येत पोल्ट्री उद्योग सुरू करून दुष्काळी स्थितीतही नेटक्‍या व अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून या कुटुंबातील भाऊ- बहिणींनी हे यश संपादन केले आहे.
दुष्काळी स्थितीत पाण्यावर खर्च वाढला. पाण्याचा काटेकोर वापर होण्यासाठी निपल सिस्टिम वापरली आहे. वेळोवेळी कोंबड्यांचे वजन केले जाते. अंड्यांची गुणवत्ता तपासली जाते. स्वच्छ पाणी व स्वच्छ खाद्य यावर भर असतो. कुक्‍कुटपालन व्यवसायातील अभ्यासू व प्रत्यक्ष कार्यरत प्रत्येकाकडून उपयुक्‍त माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.

अर्थशास्त्र

 • सध्या 70 हजार कोंबड्या शेडमध्ये आहेत.
 • सध्या अंड्यांचा सरासरी दर प्रति नग पावणेतीन ते तीन रुपयांपर्यंत.
 • दरात चढ- उतार होत राहतात.
 • सोनाली भंडारे म्हणाल्या, की सिल्लोड, औरंगाबाद, भोकरदन, अगदी चाळीसगाव, भुसावळपर्यंत आम्ही अंड्यांची विक्री करतो. दररोज 30 ते 35 हजार अंड्यांचे उत्पादन होते, मागणीही तेवढीच आहे.
 • याशिवाय सुमारे 72 आठवड्यांनी अंदाजे पंधरा हजार कमी उत्पादनक्षम कोंबड्यांची बॅच विक्रीला पाठविण्यात येते. त्याला प्रति नग 40 ते 60 रुपये व सरासरी 50 रुपये दर मिळतो.
 • वर्षाला सुमारे 40 टन कोंबडी खत उपलब्ध होते, त्याला प्रति टन 1600 ते 2000 रु. दर मिळू शकतो.
 • हवामानाच्या परिस्थितीनुसार अंडी उत्पादन व दराच्या चढ- उतारांप्रमाणे उत्पन्न कमी- जास्त होत राहते.
 • खाद्यावर 80 हजार, पाण्यावर पाच हजार, मजुरांवर आठ हजार व विजेसह इतर खर्च मिळून दिवसाला सुमारे एक लाख रुपये खर्च होत

 

चाळीस लोकांना रोजगार

विभी पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून परिसरातल्या सुमारे 40 जणांना रोजगार मिळाला आहे. दुष्काळातही महिलांनाही काम मिळाल्याने त्या उत्साहाने काम करतात. तिघा भावंडांनी बॅंकेकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, आर्थिक व्यवहार चोख असल्यामुळे बॅंकेचे कर्ज हातोहात फेडण्याचे प्रयत्न झाले.

अन्य सुविधा

 • अर्ध्या एकरात आधुनिक शेततळे व दोन विहिरी.
 • रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा आहे.

भावी नियोजन

दिवसाला दोन लाख अंडी उत्पादन करण्याची क्षमता असणारे अत्याधुनिक, इकोफ्रेंडली आदर्श कुक्कुटपालन केंद्र बनविण्याचा या भावंडांचा मानस आहे.

तनिष्का व्यासपीठाचे पाठबळ

जिद्द, मेहनत, चिकाटी व नवीन काही करण्याची धडपड असेल तर महिला कोणतेही आव्हानात्मक काम यशस्वी करू शकतात, असे सोनाली सांगतात. “सकाळ’ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या पाठबळामुळे प्रोत्साहन मिळाल्याचे त्या सांगतात.

पोल्ट्री व्यवसायातील जोखीम

1) व्यवस्थापनात दुर्लक्ष झाल्यास कोंबड्यांमध्ये मर होऊ शकते.
2) खाद्याची गुणवत्ता चांगली नसेल तर अंड्यांचे उत्पादन कमी होते.
3) विजेच्या भारनियमनामुळे खाद्य देण्यास विलंब झाला तरी मोठा फटका बसतो.
4) मजूर नसतील तर मोठा उद्योगही अडचणीत येऊ शकतो.
5) वेळोवेळी आकस्मित बसणारे आर्थिक फटके व्यवसायाच्या प्रगतीत अडसर ठरतात.

तीनही भावंडांकडून शिकण्यासारखे

 1. उच्चशिक्षण असूनही शेतीशी निगडित आव्हानात्मक उद्योगाची निवड.
  2. ध्येय साध्य करण्यासाठी खेड्यात राहण्याची तयारी.
  3. व्यवसायवृद्धीसोबत रोजगार उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न.
  4. दुष्काळी स्थितीतही नेटके व्यवस्थापन.
  एखाद्या शेतकऱ्याकडे मोठे भांडवल नसले तरी एकूण अंदाजपत्रकाच्या 25 टक्के रक्कम त्याने स्वतः उभारली व उर्वरित बॅंकेकडून कर्ज घेतले तरी दहा हजार पक्ष्यांची प्रति बॅच या क्षमतेचा पोल्ट्री उद्योग उभा करता येतो, त्यासाठी एक कोटीपर्यंत रक्कम लागते. लेअर कोंबड्यांसाठी बॅंकेचे कर्ज ब्रॉयलर कोंबड्यांच्या तुलनेत सुलभपणे मिळू शकते. फार छोट्या स्वरूपातील हा व्यवसाय तितका फायदेशीर होणार नाही, तसेच एकदा लेअर कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला की तो मधेच बंद करता येत नाही. तसेच, आम्ही बंद अवस्थेतील पोल्ट्री उद्योग खरेदी केल्याने त्यातील उभारणी, केज यांवरील खर्च कमी झाला. काही पथ्ये पाळून व चोख व्यवस्थापन करूनच हा व्यवसाय यशस्वी करता येतो.- संपर्क : सोनाली भंडारे, 9270062779
  गीतांजली जाधव, 7350247636

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

Source: http://mr.vikaspedia.in/agriculture/best-practices/animal_husbandry/90991a94d91a93693f91594d93793f924-92694b928-92c93993f923940902928940-92693f932940-92a94b93294d91f94d930940-90992694d92f94b91793e93293e-91d93393e933940

Related posts

Shares