Search

एक डोळा ऊस रोपे तयार करण्याचे तंत्र

एक डोळा ऊस रोपे तयार करण्याचे तंत्र

ऊसाच्या रोपांची लागवड करण्याचे फायदे आणि त्याची निर्मिती कशी करावी याचे तंत्र आपण जाणून घेऊ.

ऊस रोपे लागणीचे फायदे

 • एक ते दीड महिन्यापर्यंत रोपे शेताबाहेर (ट्रेमध्ये/ पिशवीत) वाढत असल्यामुळे या काळात जमिनीस विश्रांती मिळते.
 • या काळात हिरवळीच्या खताचे पीक घेण्यास किंवा शेतातील पिकाच्या काढणीस अवधी असल्यास रोपे लागण करून हंगाम साधता येतो.
 • काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो किंवा जास्त पावसाने वाफसा नसल्याने वेळेवर लागण करता येत नाही, अशा वेळेस ऊस रोपे लागण करून वेळेवर हंगाम साधता येतो.
 • सर्व रोपांना सूर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, पाणी आणि वाढीचे इतर घटक योग्य व सारख्या प्रमाणात मिळाल्यामुळे सर्व उसांची वाढ एकसारखी (ऊस संख्या एकरी 45 ते 50 हजार) होऊन फुटव्यांची मर कमी होते, उत्पादनात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ होते.
 • क्षारपड जमिनीत रोपांची लागण केल्यास रोपांचा वाढीचा जोर चांगला राहून वाढ चांगली राहते.
 • लागवड केलेल्या उसातील नांग्या भरण्यासाठी किंवा खोडवा पिकातील नांग्या भरण्यासाठी रोपांचा वापर फायदेशीर असतो.
 • नवीन वाण प्रसारित झाल्यावर बेणे कमी असल्यास रोपे तयार करून लागवड केल्यास कमी बेण्यापासून जास्त क्षेत्रावर नवीन वाणाची लागवड केल्यास दोन ओळींतील अंतर जास्त ठेवता येते, त्यामुळे यांत्रिक पद्धतीने आंतरमशागत करता येते.
 • दोन ओळींमध्ये आंतरपिके घेता येतात, नवीन जातीचा लवकर प्रसार करता येतो, बेण्याची बचत होते.
 • रोपांची वाहतूक कमी खर्चात आणि दूर अंतरावर करता येते.

प्लॅस्टिक ट्रेमध्ये एक डोळा ऊस रोपे निर्मिती

जागेची निवड

 • ऊस रोपे तयार करण्यासाठी पाणथळ, वाळवीचा प्रादुर्भाव असलेली जागा निवडू नये. वर्षभर पाण्याची सोय असावी.
 • ऊन, वारा व जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी जागेवर शेडनेट गृह साधारणपणे रोपांच्या प्रमाणानुसार तयार करावे.
 • एक आर शेडनेट गृहात 2.00 x 1.5 फुटाचे 42 कपांचे प्लॅस्टिक ट्रे वापरल्यास 45 दिवसांत अंदाजे 10,000 रोपे तयार करता येतात.

साहित्य

 • प्लॅस्टिक ट्रे – 360 मि.मी. x 560 मि.मी. x 70 मि.मी., 42 कप, वजन – 160 ग्रॅम.
 • कोकोपीट  चांगले कुजलेले, पीएच – 6.5 ते 7.5, निर्जंतुक, कर्ब – नत्र गुणोत्तर 20:1, ईसी 600-700(micromohs)
 • रोपे वाहतुकीसाठी प्लॅस्टिक क्रेट्‌स – 60 सें.मी. x 40 सें.मी. x 22 सें.मी., वजन प्रति कॅरेट 1.620 किलोग्रॅम.
 • पाणी देण्यासाठी झारी, रबरी पाइप व शॉवर किंवा सूक्ष्म तुषार संच, पाण्याची टाकी इत्यादी.
 • सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया, कार्बेन्डाझिम, ऍसिटोबॅक्‍टर, थायमेट इत्यादी.

बेणे निवड

 • रोपवाटिकेसाठी बेणे मळ्यातील नऊ ते 11 महिने वयाचे, सुधारित जातीचे शुद्ध, जाड, रसरशीत, लांब कांड्यांचे, निरोगी बेणे वापरावे.
 • बेणे तोडल्यापासून शक्‍यतो 24 तासांच्या आत त्याची लागवड करावी.

प्लॅस्टिक ट्रेमध्ये एक डोळा ऊस लागण

sugarcane seedling

 • प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर लागवडीयोग्य होतात, त्यासाठी ऊस लागणीअगोदर एक महिना ट्रेमध्ये रोपे तयार करावीत.
 • बेणेमळ्यातील बेणे आणल्यानंतर एक इंच लांबीचे एक डोळ्याचे तुकडे करावेत.
 • एक डोळ्याचे तुकडे पाच ते दहा मिनिटे 0.1 टक्का कार्बेन्डाझिमच्या (10 लिटर पाण्यात 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम) द्रावणात बुडवून नंतर ते सावलीत सुकवावेत.
 • बेणे थोडे सुकल्यानंतर जिवाणूसंवर्धनाची बेणेप्रक्रिया करावी, त्यासाठी 10 लिटर पाण्यात एक किलो ऍसिटोबॅक्‍टर + एक किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.) + 1.5 ते 2.0 किलो शेण मिसळून
  त्यात 30 मिनिटे बेणे बुडवून नंतर पाच मिनिटे सावलीत सुकवून ट्रेमध्ये लागवडीसाठी वापरावे.
 • 25 किलो कोकोपीटमध्ये साधारणपणे दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट + एक किलो युरिया चांगले मिसळून ते प्लॅस्टिक ट्रेमध्ये कपात एकतृतीयांश भरून घ्यावे. नंतर त्यावर एक डोळा कांड्या ठेवाव्यात. त्यावर पुन्हा कोकोपीट टाकून ट्रे पूर्ण भरून घ्यावेत.
 • प्लॅस्टिक ट्रे ठेवताना त्याखाली जमिनीवर थायमेट टाकावे.
 • ऊस लागण झाल्यावर गरजेनुसार झारीने अथवा सूक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे.
 • रोपांना दोन- तीन पाने आल्यानंतर शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
 • ट्रेमध्ये कोकोपीट वापरून तयार केलेली ऊस रोपे साधारण 30 ते 40 दिवसांची झाल्यावर शेतात लागणीसाठी वापरावीत.

प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करणे

 • प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार करण्यासाठी एक मीटर रुंद आणि रोपांच्या संख्येनुसार पाच ते दहा मीटर लांब आकाराचे वाफे तयार करावेत.
 • एक ब्रास पोयट्याची माती, चांगले कुजलेले शेणखत (3-1) या प्रमाणात घेऊन यामध्ये 25 किलो युरिया, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून चांगले मिश्रण करावे.
 • हे मिश्रण 5 बाय 7 इंच आकाराच्या व बाजूने पाच- सहा छिद्रे पाडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांत भरावे.
 • पिशवीचा वरचा एक ते दीड इंच भाग पाणी देण्यासाठी मोकळा ठेवावा. पिशव्या झारीच्या किंवा पाइपच्या साह्याने चांगल्या भिजवून घ्याव्यात.

एक डोळा ऊस लागण करणे

 • रासायनिक कीडनाशक आणि जिवाणूसंवर्धकाची बेणेप्रक्रिया केलेले ऊस बेणे पिशवीत लागणीसाठी वापरावे.
 • डोळा असलेला भाग पिशवीत वरच्या बाजूस राहून कांडीचा सर्व भाग मातीखाली झाकला जाईल याची काळजी घ्यावी.
 • या पिशव्यांना गरजेनुसार झारीच्या अथवा पाइपच्या साहाय्याने किंवा सूक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे.
 • रोपांना दोन ते तीन पाने आल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
 • एक ते दीड महिन्यानंतर रोपांना तीन ते चार हिरवी पाने आल्यानंतर शेतात लागवड करावी.

शेतात ऊस रोपांची लागण

seedling

 • साधारणपणे 30 ते 45 दिवसांची रोपे शेतात लागवडीस वापरावीत.
 • रोपांची लागवड शक्‍यतो दुपारनंतर करावी.
 • रोपांसाठी दोन ओळींतील अंतर भारी जमिनीत चार ते पाच फूट व दोन रोपांतील अंतर दोन ते 2.5 फूट ठेवावे.
 • काही ठिकाणी पाच ते सात फूट अंतर ठेवूनही एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मात्र, त्यासाठी पीक व्यवस्थापन वेळच्या वेळी करणे गरजेचे आहे.

ठिबक सिंचनाचा वापर करताना दोन ओळींतील अंतर व आंतरमशागतीची पद्धत

सरीतील अंतर रोपातील अंतर आंतरमशागत एकरी लागणारी ऊस रोपे
4 फूट 2 फूट पॉवर टिलर 5,550
5 फूट 2 फूट मिनी ट्रॅक्‍टर 4,450
8 फूट 2 फूट नेहमीचा ट्रॅक्‍टर 2,780
जोड ओळ(1.2m x 2.5m) 2 फूट मिनी ट्रॅक्‍टरची 5,000

 

नेहमीची ऊस लागवड पद्धत व एक डोळा रोपे पद्धतीची तुलना

लागवडीची पद्धत अंदाजे हेक्‍टरी ऊस डोळे/ रोपे एका रोपापासून मिळणारी उसाची संख्या
एक डोळा 12,500 (1 मे. टन) 1,00,000
दोन डोळे 50,000(3-4 मे. टन) 25,000 – 80,000

नेहमीच्या पद्धतीत उगवलेले डोळे विचारात घेतल्यास एका रोपास 2.2 फुटवे मिळतात. हेच प्रमाण रोपे लागवडीत एका रोपास नऊ फुटवे मिळतात, त्यामुळे नेहमीच्या दोन डोळे टिपरी पद्धतीत गाळण्यालायक ऊस कमी मिळतात, तर रोपे लावण्याच्या पद्धतीत हेक्‍टरी गाळण्यालायक ऊस जास्त तर मिळतातच, शिवाय प्रत्येक उसाचे वजन आणि साखर उताराही जास्त मिळतो.

Related posts

Shares