Search

ऑगस्ट महिन्यात करावयाची कामे

ऑगस्ट महिन्यात करावयाची कामे
 • ऑगस्ट महिन्यात करावयाच्या पीक व्यवस्थापन कार्यात पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संधारण करुन जास्तीचे पाणी शेततळ्यात साठविणे, आंतरमशागतीद्वारे तण व्यवस्थापन, एकीकृत किडी व रोगांचे व्यवस्थापन इ. बाबींना अग्रक्रम द्यावा.
 • ज्या भागात पाऊस उशिरा झाला असेल अशा भागात आपत्कालीन पीक नियोजन करतात या सप्ताहात तुर, सुर्यफुल, मका, बाजरी व त्यानंतर ऑगस्ट अखेर पर्यंत पेरणी सुर्यफुल किंवा एरंडी या पिकांची पेरणी करावी.
 • भाताच्या खाचरात रोपांची मुळे रुजेपर्यंत बांधीत पाण्याची पातळी १ इंच ठेवावी.
 • पावसात खंड पडल्यास वारंवार डवरणी करुन जमिन भुसभुशीत ठेवावी. पिकांच्या ओळीत चर काढावेत. यामुळे पावसाचे पाणी जागेवरच मुरेल. पावसाचे पाणी शेताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी.
 • पिकांवर किडी आढळल्यास रासायनिक किटकनाशक ऐवजी ५% निंबोळी अर्क (५ किलो निंबोळ्याचा + २० ग्रॅम साबु पावडर + १०० लिटर) फवारावा. हिरव्या बोंडअळीचे नुकसान ५ % पेक्षा जास्त असल्यास एचएनपीव्ही ५०० लिटर हेक्टर फवारावे.
 • मान्सुनपुर्व कपाशीची अर्धवट उमललेली फुले (गुलाबी बोंडअळी ग्रस्त डोमकळ्या) तोडुन जाळावीत.
 • कपाशीचे पीक फुलोरावस्थेत असताना २% युरिया (२ किलो युरिया + १०० लिटर पाणी) फवारणीत प्लॅनोफिक्स मिसळावे.
 • खरिप भुईमुगास ५०% फुलोरावस्थेत हेक्टरी ४०० किलो जिप्सम देऊन डवारणी करावी.
 • सोयाबीनसाठी पिक फुलोरावस्थेत असताना २% युरियाची फवारणी करावी.
 • सुरु ऊसाची पक्की बांधणी (लागवडीपासुन १६ ते १८ आठवड्यानी) हेक्टरी २५० किलो १९:१९:१९ खत देऊन त्वरित आटोपावी.पावसात खंड पडल्यास दर १० दिवसानी ओलीत करावे.
 • ऊसावरिल पायरिला किडींचे अंडीपुंज असलेली खालची पाने तोडुन टाकावीत.
 • रबी हंगामाकरिता वांगी व टोमॅटो बियाण्याची गादीवाफ्यावर पेरणी करावी.
 • फळझाडांची नवीन लागवड राहिली असल्यास ती या आठवड्यात आटोपावी.
 • एकवर्ष वयाचे गावरान आंब्यावर दशहरी, केशर ,आम्रपाली जातीचे मृदकाष्ट कलम करावे.
 • १ ते ४ वर्षे वयाचे संत्रा, मोसंबी फळझाडाचे खुंटावरिल फुट व पानसोट वरचेवर काढावेत.खोडाजवळ पावसाचे पाणी साचु देऊ नये.
 • संत्राच्या / मोसंबीच्या फळांसाठी (वाटाण्याएवढी झाल्यावर) नत्र खताची मात्रा द्यावी. तसेच १०० लिटर पाण्यात १ किलो युरिया + १ ग्रॅम एनएए मिसळुन फवारणी करावी.
 • संत्रावरील काळ्या पांढर-या माशीचे नियंत्रणा करिता निंबोळीचे तेल १०० मि.लि. + मोनोक्रोटोफॉस ७ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
 • मूग व उडीदावर भुरी रोगाची लागण दिसताच गंधक ३० ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
 • पपईचे ६-७ आठवडे वयाची रोपे २ बाय २ मीटर अंतरावर ३०सेमी बाय ३० सेमी बाय ३० सेमी खड्डे करुन रोपांची लागवड करावी.
 • मोगरा, ग्लॅडिओलस फुलझाडांची लागवड करावी.
 • एप्रीलमध्ये छाटणे केलेल्या गावरान बोरीचे नवीन फुटीवर उमरान, गोला, कडाका जातीचे डोळे बांधावेत.

संदर्भ : कृषी विस्तार विभाग, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Related posts

Shares