Search

काटेरी करवंदांतून मिळवली आर्थिक सुबत्ता

काटेरी करवंदांतून मिळवली आर्थिक सुबत्ता

यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील अश्विनीपूर परिसरात जनार्दन जाधव यांची ३५ एकर शेती आहे. येथील जमीन हलकी, मुरमाड आणि पडीक स्वरूपाची असल्याने पारंपरिक पिकांचे उत्पादन फारसे मिळत नव्हते.

शेतीला गुराढोरांचा त्रास होता, म्हणून जनार्दन यांनी कुंपणासाठी काटेरी करवंदाची लागवड केली. यामुळे शेताची सुरक्षा तर झालीच, शिवाय करवंदापासून उत्पन्नही मिळाले. म्हणून त्यांनी तीन एकरांत करवंदाची लागवड केली. आजोबांचा हा वारसा आज आकाश जाधव हा गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तरुण पुढे चालवत आहे. आज आकाश सुमारे साडेसात एकरावरील करवंद बागेचे उत्तम व्यवस्थापन करून एकरी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत!

आकाश यांच्या करवंद शेतीविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

लागवड

  • एकरी सुमारे ७५० ते ८०० झाडांची २० फूट x ३ फूट अशा अंतरावर लागवड करण्यात आली आहे
  • बहुतांश झाडे १८ ते २० वर्षांपूर्वीचीअसून त्यांनी तीन वर्षांपूर्वी नवी बाग उभारली
  • करवंदाच्या झाडांना जनावरांचा त्रास होत नाही तसेच चोरीची भीती फारशी राहत नाही. खतांचा तसेच कीटकनाशकांचा फारसा वापर करण्याची गरज भासत नाही
  • या पिकाची पाण्याची गरज सुद्धा अत्यल्प असते. भर उन्हाळ्यातदेखील पंधरा दिवसांनी पाणी देणे पुरेसे ठरते
  • आकाश यांनी सुमारे सहा एकराला ठिबक सिंचन केले आहे.

फळांची काढणी व उत्पादन

लागवडीनंतर सुमारे तीन वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. झाड जसजसे मोठे होत जाईल तसतसे उत्पादनात वाढ होते.
करवंदाला वार्षिक फळधारणा होते. फेब्रुवारी- मार्चमध्ये बहर येतो व जून-जुलैमध्ये फळधारणा होते. फळे ऑगस्टच्या सुमारास परिपक्व आणि तोडणीयोग्य होतात. एकरी सरासरी पाच टन उत्पादन मिळते.

विक्री व आर्थिक बाबी

करवंदाला दोन प्रकारची फळे लागतात. काही हिरवी तर काही लाल-गुलाबी अशा रंगाची असतात. हिरवी करवंदे भाजी, लोणचे, चटणीसाठी वापरतात. त्यांची विक्री स्थानिक बाजारपेठेत होते.
लाल-गुलाबी करवंदे मुरब्बा आणि चेरी बनविण्यासाठी उपयोगात येतात, या करवंदांना व्यावसायिकांकडून जास्त मागणी असते. करवंदांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे औषधी गुणधर्माच्या दृष्टीनेही ते महत्त्वपूर्ण आहे.

आकाश यांना साडे सात एकरांत ३० टनांपर्यंत उत्पादन मिळते आणि प्रतिकिलो ३० रुपये असा दर मिळतो. जाधववाडी करवंदांच्या जाळीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करतात. सर्व खर्च वजा करता एकरी एक लाख रुपये याप्रमाणे सुमारे साडे सात लाखांचा निव्वळ नफा आकाश यांना प्रत्येक हंगामात होतो.

करवंदाने घडवला बदल

आकाश यांच्या करवंद बागेमुळे जाधववाडीचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यांचे अनुकरण करून परिसरातील शेतकऱ्यांनी करवंदाची लागवड केली आणि आर्थिक सुबत्ता मिळवली. पूर्वी टीन पत्र्यांची असलेली घरे आज सिमेंट काँक्रीटची झाली आहेत. घरात सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर काढणीच्या हंगामात दररोज सुमारे २०० मजुरांना उत्तम रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.

आकाश यांनीदेखील करवंद पिकातुन मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर विविध शेतीपूरक व्यवसाय सुरु केले आहेत. त्यांनी करवंदाची रोपवाटिका विकसित केली आहे ज्यात प्रतिनग १३ ते १५ रुपये याप्रमाणे २० हजारांहून अधिक रोपांची विक्री केली आहे.

तसेच दशेरी आंब्यांची व फणसाची प्रत्येकी ४० झाडे, जांभळाचीही नवी ८० झाडे, लिंबाची जुनी २००, तर नवी अडीचशे पर्यंत झाडे आहेत. लिंबाचे पीक वर्षाला एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न देते. फळबागांव्यतिरिक्त चार एकरांत उसाची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय गावरान कोंबड्या आणि गावरान बकरी पालन सुरू केले असून त्यासाठी शेडची उभारणी करण्यात आली आहे.

अशाप्रकारे आकाश यांनी मेहनत व चिकाटीच्या बळावर स्वतःसोबत स्वतःच्या गावाचासुद्धा विकास करण्याचे महत्वपूर्ण कार्य सुरु केले आहे.

Related posts

Shares