Search

कोथिंबीर लागवड

कोथिंबीर लागवड
[Total: 94    Average: 3/5]

पालेभाज्या लागवड या लेखाच्या मागील भागांमध्ये आपण पालक तसेच मेथी लागवड याबाबत माहिती जाणून घेतली. याभागात आपण कोथिंबीर लागवड कशी करावी हे जाणून घेऊया. कोथिंबिरीचा वापर भारतीय अन्नपदार्थांमध्ये नेहमीच केला जातो. हिरवागार ताजा कोथिंबीर कोणत्याही पदार्थावर पडला कि तो पदार्थ दिसायला आकर्षक दिसू लागतोच, पण कोथिंबीर तो पदार्थ अधिक स्वादिष्ट करतो. विविध भाज्या, भाताचे विविध प्रकार, सॅलड, चटणी, करी, सूप यामध्ये हमखास कोथिंबिरीचा वापर केला जातो. बाराही महिने मागणी असलेल्या कोथिंबिरीमध्ये ‘अ’ जीवनसत्व, प्रथिने, पिष्टमय पदार्थ तसेच लोह मुबलक प्रमाणात असते. बाजरात कोथिंबिरीला असलेली मागणी पाहता कोथिंबीर लागवड शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हवामान :

महाराष्ट्रात कोथिंबिरीची लागवड वर्षभर करता येते. कडाक्याची थंडी व कडक उन्हाळ्यात कोथिंबिरीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. अशावेळी हे पीक पालेभाज्यांमध्ये आंतरपीक म्हणून घेतल्यास उत्तम ठरते.

जमीन :

हलक्या ते भारी कोणत्याही जमिनीत कोथिंबिरीचि लागवड करता येते. भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला जास्त मानवते.

सुधारित जाती :

पंत हरीत्मा, लाम सी. एस – २,४,६. व्ही – १, व्ही – २, ग्वाल्हेर नं ५३५६, कोईमतूर १ या कोथिंबिरीच्या सुधारित जाती म्हणून ओळखल्या जातात.

लागवड :

कोथिंबिरीचा वर्षभर सतत पुरवठा होण्यासाठी १५ ते २० दिवसांच्या अंतराने टप्प्य्टप्प्याने लागवड करावी. लागवडीसाठी ३ x २ मीटर आकाराचे वाफे फोकून करावी. उन्हाळ्यात पेरणीपूर्वी वाफे भिजवून वाफसा आल्यावर बी पेरावे. पेरणीपूर्वी बी (धने) हळुवार फोडून बिया अलग कराव्यात. धने व्यवस्थित रगडून घ्यावेत. उगवण लवकर होण्यासाठी बियाणे १२ तास पाण्यात भिजवून ठेवावे, १२ तास गोणपाटात उबदार जागेवर ठेवावे आणि नंतर पेरावे. अशा बिया ८ ते १० दिवसात उगवतात. कोथिंबीरीचे हेक्टरी ६० ते ८० किलो बियाणे लागते. कोथिंबिरीची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात करता येते.

खत व्यवस्थापन :

जमिनीच्या पूर्ण मशागतीच्या वेळी हेक्टरी १५ ते २० गाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. बी उगवल्यावर १५ ते २० दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे. तसेच २० ते २५ दिवसांनी १०० लिटर पाण्यात २५० ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या कराव्यात, यामुळे पिकाची वाढ जोमाने होऊन ३० ते ३५ दिवसांत पीक काढणीस तयार होते.

पाणी नियोजन :

कोथिंबिरीची पाने टवटवीत मिळण्यासाठी नियमित पाणीपुरवठा करावा. उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांनी तर हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे.

आंतरमशागत :

वेळोवेळी निंदणी करून वेळीच ताणाचा बंदोबस्त करावं व जमिन भुसभुशीत ठेवावी.

काढणी :

कोवळी, लुसलुशीत व भरपूर पाने असलेल्या १५ ते २० सेंमी वाढलेल्या कोथिंबिरीची फुले येण्यापूर्वी काढणी करावी. आणि जुड्या बांधून विक्रीस पाठवाव्यात.

उत्पादन :

पावसाळी आणि उन्हाळी हंगामात हॅक्क्टरी ९ ते १० टन आणि उन्हाळ्यात ६ ते ७ प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. बियांचे उत्पादन १ टन मिळते.

Related posts

Shares