Search

गवती चहा लागवड

गवती चहा लागवड

गवती चहाची लागवड पाण्याची उपलब्धता असल्यास केव्हाही करता येते. याच्या तेलात 55 ते 85 टक्के सिट्रॉल मिळते. सिट्रॉलचा उपयोग सुगंधित साबण, सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती, सुगंधी तेलनिर्मितीमध्ये होतो. हे बहुवार्षिक गवत असून, ते दोन मीटरपर्यंत उंच वाढते. त्याला भरपूर फुटवे येतात. पाने केसाळ असून 80 ते 125 सें.मी. लांब असतात. पानांना लिंबासारखा वास येतो. फुलांचा दांडा 25 ते 35 सें.मी. लांब असतो. गवती चहा लागवड या भागात आपण या पिकाच्या लागवडीसंदर्भातील वैविध्यपूर्ण माहितीचा आढावा घेऊया.

जमीन :

सुपीक जमिनीपेक्षा पोयट्याची, रोड परंतु चांगला निचरा होणारी जमीन या पिकांच्या लागवडीस योग्य आहे. लालसर वाळूमिश्रित जमिनीतही हे पीक चांगले येते. ज्या जमिनीतील गवती चहाची मुळे उत्तम वाढतील अशी जमीन निवडावी. कारण त्यामुळे त्यातील सिट्रॉलचे प्रमाण वाढते.

वाण :

लागवडीसाठी केसीपी 25, ओडी 25, प्रगती, प्रमाण, कावेरी या जातींची निवड करावी.

मशागत :

पाण्याची उपलब्धता असल्यास केव्हाही करता येते. मात्र पावसाळ्यातील लागवड चांगली जोमाने होते. याची लागवड 4 ते 6 वर्षांतून एकदाच करावी लागते. त्यामुळे लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी. एकरी 10 टन कंपोस्ट किंवा शेणखत मिसळावे. लागवड बिया किंवा गवती चहाच्या आलेल्या नवीन फुटव्यापासून करता येते. फुटव्यापासून केलेली लागवडीची वाढ जोमाने होते. गवती चहाला एका वर्षानंतर अनेक फुटवे येतात. असे फुटवे कुदळीने खणून काढावेत. चांगल्या रोगविरहित फुटव्यांची शेतात 75 बाय 60 सें.मी. अंतरावर लागवड करावी.

पाणी नियोजन :

लागवड करताना जमिनीत पुरेसे पाणी आहे अशी खात्री करून घ्यावी. स्थानिक परिस्थितीनुसार 8 ते 10 दिवसांनी पाणी नियोजन करावे.

लागवडीचे तंत्र :

लावणी केल्यानंतर पीक 4-6 वर्षे राहत असल्यामुळे मेलेल्या रोपांच्या ठिकाणी दुसरी रोपे ताबडतोब लावावीत. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी गादीवाफे किंवा सऱ्या बांधणी करून घ्यावी.

कापणी :

लागवडीनंतर पहिली कापणी 6 ते 9 महिन्यांनी करावी. नंतरच्या कापण्या 3 ते 4 महिन्यांनी कराव्यात. अशा प्रकारे पहिल्या वर्षी 2 ते 3 कापण्या व नंतरच्या वर्षात 3 ते 4 कापण्या कराव्यात. सहा वर्षे हे पीक चांगले उत्पादन देऊ शकते. कापणी जमिनीपासून 20-25 सें.मी. उंचीवर करावी.

काढणी पश्चात तंत्रज्ञान :

या गवापासून पाण्याच्या वाफेच्या साह्याने उर्ध्वपातन (डिस्टिलेशन) करून तेल काढण्यात येते. तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगते. तेलात 70 ते 85 टक्के सिट्रॉल असते. कापणी केलेल्या गवतापासून एका तासाच्या अंतराने तेल काढावे.

उत्पन्न :

प्रती वर्षी एकरी 15 ते 18 टन ताजे गवत गवती चहापासून 90 लिटर तेलाचे उत्पादन मिळते.

आर्थिकदृष्ट्या महत्त्व :

1) सिट्रॉलचा उपयोग निरनिराळ्या सुगंधीयुक्त रसायनांमधून होतो. सर्वसाधारणणे गवती चहाच्या तेलात 55 ते 85 टक्के सिट्रॉल मिळते. त्याचा उपयोग जीवनसत्त्वाच्या गोळ्या तयार करण्याकडे, सुगंधित साबण, सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती, सुगंधी तेलनिर्मितीमध्ये होतो.

2) तेलाचा उपयोग जंतुनाशक द्रव्ये करण्यासाठी करतात.

3) तेल काढल्यानंतर गवताच्या राहिलेल्या चोथ्यापासून कंपोस्ट खत तयार करावे. या चोथ्यामध्ये उसाची मळी किंवा प्रथिनयुक्त आंबोण मिसळून जनावरांना चारा म्हणून उपयोग करावा.

4) गवताच्या चोथ्याचा उपयोग कार्डबोर्ड पेपर किंवा ठराविक प्रमाणात बांबूचा चोथा मिसळून छपाईचा कागद तयार करता येतो.

औषधी महत्त्व :

1) सर्दीपडसे, अंगदुखी व आमवात अशा अनेक प्रकारच्या व्याधींवर गवती चहाचा काढा उपयुक्त आहे.

2) तेलाचा उपयोग पोटातील गॅस, संधिवातावर, चमकीवर होतो.

3) सर्व प्रकारचे वेदनाशामक बाम, डासांपासून संरक्षण करणारी मलमे गवती चहापासून बनवतात.

Related posts

Shares