Search

गांडूळ खताचे जमिनीच्या आरोग्यावर होणारे अनुकूल परिणाम…

गांडूळ खताचे जमिनीच्या आरोग्यावर होणारे अनुकूल परिणाम…

गांडूळ शेतकऱ्यांचा मित्र असतो हे आपण पुस्तकातून वाचले आहे… पण सध्या आपण पाहायला गेलो तर सेंद्रिय शेती आणि गांडूळ खत या विषयांवर आपल्याला बरच वाचनात येते. गांडूळ खताचे अनेक फायदे आहेत, ते नेमके काय आहेत यावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत.

गांडूळ खतातील अन्नद्रव्याचे प्रमाण :-

compost methods

गांडूळ खतातील अन्नद्रव्याचे प्रमाण हे मुख्यत्वे गांडूळ खत निर्मितीकरिता वापरण्यात आलेल्या सेंद्रिय पदार्थातील अन्नद्रव्याच्या प्रमाणावर व शेणाच्या वापरावर अवलंबून असते. गांडूळ खतातील अन्नद्रव्याचे प्रमाण इतर पद्धतीने तयार केलेल्या कंपोस्ट खतातील अन्नद्रव्याच्या तुलनेने अधिक असते. सर्वसाधारणपणे एकाच प्रकारच्या सेंद्रिय पदार्थापासून तयार केलेल्या गांडूळ खताऐवजी विविध प्रकारचे सेंद्रिय पदार्थ ज्यामध्ये एकदल व द्विदल वर्गीय वनस्पतीचे अवशेष समप्रमाणात आहेत, शेणाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे अशा खतात सर्वच अन्नद्रव्ये संतुलित प्रमाणात उपलब्ध होतात.

गांडूळ खताचा वापर :-

विविध प्रकारचा सेंद्रिय स्वरूपाचा कुजणारा काडीकचरा, पिकाचे अवशेष, शेण यांच्या मिश्रणातून तयार झालेले वासरहित मृदगंधयुक्त, चहाच्या पत्तीसारखे कणीदार गांडूळखत तयार करून सावलीत मोकळ्या हवेत साठवावे किंवा गोणपाटाच्या पोत्यात भरून ठेवावे. गांडूळ खतामध्ये मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये, संप्रेरके, संजीवके असतात. अनेक पटीने वाढ झालेले उपयुक्त असे विविध प्रकारचे सूक्ष्म जीवजंतू, गांडुळाची अंडी व नुकतेच बाहेर पडलेली गांडुळाचे पिले यांचा पण यात समावेश असतो.

 

 

 

१) धान्यवर्गीय पिके (तृणधान्य, कडधान्य व गळीत धान्य) –

या पिकांना उपलब्धतेनुसार हेक्टरी अडीच ते पाच टन गांडूळ खत पेरणीच्या वेळी बियाण्यासोबत पेरून द्यावे; परंतु रासायनिक खताबरोबर पेरून देऊ नये.

पेरणीच्या वेळी रासायनिक खताचा वापर करावयाचा झाल्यास मात्र गांडूळ खत पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर पंधरा दिवसांच्या अंतराने जमिनीत मिसळून घ्यावे.

धान्यवर्गीय पिकांना जर संपूर्णपणे सेंद्रिय निविष्ठाचा वापर करायचा झाल्यास हेक्टरी ५ ते १० टन गांडूळ खत इतर सेंद्रिय खतासोबत (उदा. कंपोस्ट, निंबोळी पेंड, हिरवळीचे खत इत्यादी) द्यावे. जेणेकरून ते एकमेकांना पूरक ठरतील.

२) कापूस –

हेक्टरी अडीच ते पाच टन गांडूळ खत उपलब्धतेनुसार किंवा अडीच टन गांडूळखत व अडीच टन चांगले कुजलेले शेणखत यांचे मिश्रण करून कापूस लागवडीपूर्वी १० ते १५ दिवस अगोदर शेतात पेरून द्यावे.

३) ऊस –

हेक्टरी पाच टन गांडूळखत लागवडीपूर्वी सरीतून चर देऊन मिसळावे. त्यावरून सरीत उसाचे पाचट किंवा इतर काडीकचऱ्याचे आच्छादन करावे. पाणी देऊन सतत ओलावा राखावा जेणे करून जमिनीत गांडुळाची वाढ होऊन ती नैसर्गिकरीत्या भुसभुशीत राहील.

खोडवा पिकासाठी ऊस तोंडणीनंतर पावसाळ्यापूर्वी नांगराच्या साह्याने चर करून त्यात हेक्टरी ५ टन गांडूळखत मिसळून मातीने हलके झाकून घ्यावे. त्यावर पाचटाचे आच्छादन करून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

४) भाजीपालावर्गीय पिके –

हेक्टरी २ टन गांडूळखत पिकानुसार मुळाच्या सान्निध्यात बांगडी पद्धतीने किंवा सरीतून सरत्याच्या साह्याने पेरून द्यावे.

 

५) फळ पिके –

अ) – कलम लावताना प्रत्येक खड्ड्यात ५ किलो गांडूळ खत देऊन नंतर प्रत्येक वर्षी मोहर येण्यापूर्वी ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान प्रति झाडास वाढीनुसार १० ते ५० किलो गांडूळ खत मुळांच्या सान्निध्यात टाकून मातीने हलके झाकून घ्यावे.

ब) डाळिंब, बोर, पेरू, संत्रा, मोसंबी, नारळ, चिकू, लिंबू इत्यादी – कलमे लावताना प्रत्येक खड्ड्यात ५ किलो गांडूळ खत तर मोठ्या झाडांना वयानुसार व विस्तारानुसार १० ते २५ किलो गांडूळ खत मुळांच्या सान्निध्यात चर खोदून मातीत हलके मिसळून द्यावे.

 • गांडूळ खताचे जमिनीच्या आरोग्यावर होणारे अनुकूल परिणाम –
 • गांडूळ खतामुळे हलक्या जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते तर भारी जमिनीच्या निचरा होण्याच्या क्षमतेत वाढ होते.
 • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गांडूळ खतामुळे वाढवून जमिनीचे कायिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.
 • गांडुळे जमिनीवर खोलवर जाऊन मशागत करत असल्यामुळे जमिनीची उलथापालथ करतात. त्यामुळे शेतातील माती समृद्ध व उपजाऊ बनते.
 • गांडुळांच्या हालचालीमुळे जमीन सच्छीद्र बनून पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरून जमिनीची जलग्रहण क्षमता व निचरा होण्याची क्षमता वाढते.
 • जमिनीची निचरा क्षमता वाढल्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी होऊन जमिनी क्षारयुक्त व चोपणयुक्त बनत नाहीत. क्षारयुक्त व चोपणयुक्त जमिनीत इतर सेंद्रिय पदार्थासोबत गांडूळखताचा वापर केल्यास अशा जमिनी लवकर दुरुस्त होण्यास मदत होते.
 • जमिनीत राहिलेले पिकांचे अवशेष इतर सेंद्रिय पदार्थ यांचे गांडुळांच्या मदतीने जलद विघटन होऊन त्यातील अन्नद्रव्ये मुक्त होतात. जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते.
 • गांडुळाच्या मदतीने सेंद्रिय पदार्थांपासून कमी कालावधीत उत्कृष्ट असे सेंद्रिय खत तयार करता येते.
 • जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गांडूळखतामुळे वाढवून जमिनीचे कायिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.
 • जमिनीचा सामू (आम्लविम्ल निर्देशांक) सुधारण्यास मदत होऊन त्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण अनुकूल राखण्यास मदत होते.
 • जमिनीचा पोत सुधारून धूप कमी करण्यास मदत होते.
 • हलक्या जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते तर भारी जमिनीच्या निचरा होण्याच्या क्षमतेत वाढ होते.
 • पडीक व मुरमाड जमीन सुधारण्याकरिता गांडूळखताचा तसेच गांडुळांचा उपयोग होतो.
 • गांडुळाच्या हालचालीमुळे जमीन सच्छिद्र होऊन पाणी, हवा व तापमान यांचे जमिनीतील नियमन चांगल्या रितीने होते.
 • नत्र स्थिरीकरण, स्फुरद विद्रावीकरण व इतर अनेक महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या जिवाणूंच्या संख्येत गांडूळखतामुळे लक्षणीय वाढ होऊन जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारतात.
 • जमिनीतील घातक द्रव्ये, कीटकनाशके व इतर विषारी घटक गांडुळाच्या चयापचय क्रियेमुळे लवकरात लवकर विघटन होऊन जमीन प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होते.

मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

सन्दर्भ  – अग्रोवन

Related posts

Shares