Search

गुळ निर्मिती

गुळ निर्मिती

गुळ आणि भारतीय खाद्यपदार्थ यांचे एक वेगळे नाते आहे. विविध पदार्थांमध्ये गोडवा आणण्याचे काम करणाऱ्या गुळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. वैज्ञानिक मान्यतेनुसार गोड खाल्याने शरीरातील रक्तसंचार वाढतो. उर्जा मिळते. सर्दी, कफ या आजारांमध्ये गुळ लाभदायक आहे. गुळ तयार करण्याची एक पद्धत आहे एक तंत्रज्ञान आहे. सुधारित तंत्रज्ञानाने गुळ निर्मिती कशी करावी हे जाणून घेऊया.

ऊसाचे पिक परिपक्व होण्यासाठी साधारण एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो. गुळ निर्मितीसाठी ऊसाची तोडणी करण्याआधी ऊस पूर्ण परिपक्व होणे गरजेचे आहे. कारण अपरिपक्व उसापासून गुळाचा उतारा कमी मिळतो, गूळ नरम बनतो. गूळ रवाळ होत नाही. साठवणी दरम्यान असा गूळ खराब होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच योग्य प्रमाणात पक्व झाल्यानंतरच ऊसाची तोडणी करावी.

ऊसतोडणी –

पक्वतेची चाचणी घेतल्यानंतर धारदार कोयत्याने पक्व उसाची तोडणी जमिनीलगत करावी, त्यामुळे बुडक्या कडील जास्त साखर असलेल्या कांड्या वाया जात नाहीत. ऊसावरील मुळ्या, पाचट, माती काढून ऊस स्वच्छ करावा. ऊसाच्या शेंड्याकडील दोन ते तीन कोवळ्या अपक्व कांड्या वाढ्याबरोबर तोडून टाकाव्यात कारण त्यामध्ये पाण्याचे, नत्राचे आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते तर साखरेचे प्रमाण अत्यल्प असते, त्यामुळे गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.

हॅंड रेफ्रॅक्टो मीटरचा वापर –

 • या उपकरणासोबत रस काढण्यासाठी टोचा मिळतो. ऊसाच्या ८ ते १० व्या पेऱ्यावर थोडासा तिरकस कोनाने टोचा आत टोचावा आणि थोडासा फिरवावा.
 • टोच्याच्या पोकळीतून रस घेऊन काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बाटलीत जमा करावा. कमीत कमी ८ ते १० ठिकाणांहून रस घेऊन एकत्र करावा.
 • या रसाचे दोन थेंब हॅंड रेफ्रॅक्टो्मीटरच्या तबकडीवरील काचेवर घेऊन लोलकाने झाकावे.
 • उजेडाकडे तोंड करून दुर्बिणीतून पाहिल्यास ब्रिक्सची उभी मोजपट्टी आणि रसाचा फिक्कट थर दिसतो. दोन्ही रेषा जेथे जुळतात ते ब्रिक्सचे रीडिंग समजावे.

स्पींडल ब्रीक्स हायड्रोमीटरचा वापर –

 • ऊसाचा प्रातिनिधिक नमुना घेऊन त्याचा रस चरक्याच्या साहाय्याने काढावा.
 • रस एक लिटर क्षमतेच्या मोजपात्रात अथवा त्यासारख्या उभट भांड्यात घ्यावा.
 • रसाचा फेस तसेच बुडबुडे काढून रसात अलगदपणे ब्रिक्स हायड्रोमीटर सोडावा.
 • हायड्रोमीटर स्थिर झाल्यानंतर रसाच्या पातळीशी जुळणारी ब्रिक्सची रेषा मोजावी.

गुळ निर्मिती तंत्रज्ञान –

 • ऊस गाळपासाठी आडव्या तीन लाट्यांचा, स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने गिअर बॉक्स असलेल्या चारक्याची निवड करावी.
 • गुऱ्हाळासाठी चरक्या ची गाळप क्षमता साधारणपणे ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे.
 • गाळप वाढल्यास सूक्ष्म कचऱ्याचे प्रमाण वाढते, रसातील सुक्रोजचे प्रमाण वाढते; परंतु खनिजे आणि ग्लुकोजचे प्रमाण कमी होते, त्यामुळे गुळाचे औषधी महत्त्व कमी होते.
 • ऊसाच्या रसात फिनॉलिक द्रव्य असतात. या द्रव्यांचा लोखंडाशी संबंध आल्यास त्याचा गुळाच्या रंगावर विपरित परिणाम होतो म्हणून रसाचा लोखंडाशी संपर्क टाळावा.
 • स्वच्छ आणि आरोग्य पूर्ण वातावरणात तसेच निर्यातक्षम गूळ तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील चरक्याचा वापर करावा.
 • द्विस्तरीय पद्धतीच्या गाळणीतून रस चांगला गाळून घेऊन “फूड ग्रेड’चे प्लॅस्टिक अथवा स्टीलच्या नळीतून मंदानात घ्यावा.
 • मंदानातील स्वच्छ रस पंपाच्या साहाय्याने प्लॅस्टिकच्या अथवा स्टीलच्या साठवण हौदात स्थिरीकरणासाठी ठेवावा.
 • तयार झालेला रस स्थिरीकरणासाठी ठेवताना गुळ कशा आकारमानात हवा आहे, त्याप्रमाणे भांड्याची निवड करावी. एकदा गुळ स्थिर झाला कि मग त्याच्या आकारमानानुसार विभागणी करावी. विक्रीसाठी नेताना आवश्यक ती काळजी घेऊन गरजेनुसार पॅकेजिंग करावे. जेणेकरून वाहतुकीदरम्यान उत्पादन उत्तम राहील.

Related posts

Shares