Search

चार सूत्री लावणी तंत्रज्ञान 

चार सूत्री लावणी तंत्रज्ञान 

कोकणातील व पश्चिम घट विभागातील शेतकऱ्यांस भातशेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल अशी पण साधी, कमी भांडवलाची आणि तरीसुद्धा अधिक उत्पादन देणारी सुधारित भातशेती पद्धतीची गरज आहे. हे लक्षात घेऊन डॉ. नारायण कृ. सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठ दापोली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने गेल्या दहा वर्षात संशोधन केले. ठिकठिकाणी शेतप्रयोग करून सुधारित चार सूत्री भातशेती पद्धती विकसित केली आहे.

 

चारसुत्री भातशेती पध्दतीत मुख्यत्वेकरुन पुढील व्यवस्थापन सुत्रांचा अंतर्भाव होतो.

1) भात पिकांच्या अवशेषांचा फेरवापर.
2) गिरीपुष्पचा हिरवळीचे खत म्हणून वापर.
3) रोपांची नियंत्रित लावणी.
4) लावणीनंतर त्याच दिवशी युरीया-डिएपी ब्रिकेटचा जमिनीत खोलवर वापर.

हे कृषी तंत्रज्ञान पुढील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणालीवर आधारलेले आहे.

अ) भात पिक लागवडीची ही एक सुधारित पध्दत आहे.
ब) जमिनीतील व खताच्या माध्यमातून पुरविलेल्या पोषक अन्नद्रव्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापर करणे.
क) त्यासाठी एकात्मिक तत्वानुसार पिक लागवड करणे व किड व रोग व्यवस्थापन करणे.
ड) पिकांचे उत्पादन वाढविणे व ते दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करणे.
इ) या बरोबरच लागवडीचे व्यवस्थापन करतांना नैसर्गिक संपत्ती, हवा, पाणी, जमीन व पर्यावरण यांचे प्रदुषणापासुन संरक्षण करणे.
सूत्र १ ः 


भात पिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर ः
१ अ) भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळावी.
भाताच्या तुसाची राख (पूर्ण जळालेली पांढरी राख नव्हे) रोपवाटिकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रति चौरस मीटर एक किलोग्रॅम या प्रमाणात चार ते सात सें.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर बीजप्रक्रिया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.
१ ब) भाताचा पेंढा लावणीपूर्वी शेतात गाडावा.

 


भाताचा पेंढा पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी अंदाजे दोन टन या प्रमाणात शेतात गाडावा.
फायदे ः १) भात पिकांना सिलिका व पालाश यांचा पुरवठा होतो. (पालाश ः २०-२५ किलोग्रॅम. सिलिका ः १००-१२० किलोग्रॅम.) २) रोपे निरोगी व कणखर होतात. ३. रोपांच्या अंगी खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.

सूत्र २ ः 
गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हिरवळीच्या खताचा वापर ः

 
गिरिपुष्प हिरवळीचे खत (दोन ते चार गिरिपुष्पाच्या झाडांची हिरवी पाने किंवा अंदाजे ३० कि.ग्रॅ. / आर) चिखलणीपूर्वी सात ते आठ दिवस अगोदर पसरावीत व नंतर चिखलणी करून रोपांची लावणी करावी.

हिरवळीचे खत वापरण्याची सोपी पद्धत ः
गिरिपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून ३० ते ४० सें.मी. उंचीवर तोडाव्यात. त्याच झाडाच्या तोडलेल्या फांद्या चिखलणीपूर्वी सहा ते आठ दिवस अगोदर खाचरात पसराव्यात. आठवड्यात फांद्यांवरील पाने गळून पडतात. उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी इंधन म्हणून वापराव्यात. चिखलणी करून गळून पडलेली पाने चिखलात व्यवस्थित मिसळावीत, नंतर लावणी करावी.
फायदे ः १) भातरोपांना सेंद्रिय – नत्र (हेक्‍टरी १० ते १५ किलोग्रॅम) वेळेवर मिळाल्यामुळे भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते. खाचरात सेंद्रिय पदार्थ मिळाल्यामुळे जमिनीची जडणघडण सुधारून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते. २) सेंद्रिय पदार्थ मर्यादित प्रमाणात गाडल्यामुळे भात खाचरांतून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाण (म्हणजेच हवेचे प्रदूषण) कमी होते.

सूत्र ३ ः
नियंत्रित लावणी ः

नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर २५ सें.मी. व १५ सें.मी. आलटून-पालटून (२५-१५-२५-१५ सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक दोन ते तीन रोपे प्रति चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने १५ सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एकावेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. त्यानंतर मार्गदर्शक वापरून ४० सें.मी. दोरी मागे सरकवावी. पुन्हा जोड-ओळ पद्धत (चार चूड) वापरून खाचरातील नियंत्रित लावणी पूर्ण करावी. खाचरात अनेक १५ ु १५ सें.मी. चुडांचे चौकोन व २५ सें.मी. चालण्याचे रस्ते तयार होतात. लावणी करताना प्रत्येक चुडात दोन ते तीन रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे. रोपे सरळ व उथळ (दोन ते चार सें.मी. खोलीवर) लावावीत.
फायदे ः प्रचलित पद्धतीपेक्षा बियाण्यांची ३० टक्के बचत होते व त्याच प्रमाणात रोपे तयार करण्याचे श्रम व पैसा वाचतो. त्याच प्रमाणात लावणी व कापणी करावी. कापणीवरील मजुरीचा खर्चही कमी होतो, त्यामुळे उत्पादन फायदेशीर होण्यास मदत होते.
शेतकऱ्यांना ब्रिकेट्‌सचा (खताच्या गोळ्यांचा) कार्यक्षम वापर करणे शक्‍य होते.

सूत्र ४ ः 
युरिया – डीएपी ब्रिकेटचा वापर ः

नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची (युरिया – डीएपी) एक ब्रिकेट (खताची गोळी) हाताने सात ते दहा सें.मी. खोल खोचावी.
१) युरिया – डीएपी खत (६०ः४० मिश्रण) वापरून ब्रिकेट्‌स (२७ ग्रॅ. / १० ब्रिकेट्‌स) उशीच्या आकारात तयार करता येतात.
२) या रासायनिक मिश्र खतात नत्र (छ) व स्फुरद (झ२ज५) ही अन्नद्रव्ये ४ः२ या प्रमाणात असतात.
३) एका आरला ६२५ ब्रिकेट्‌स (१.७५ कि.ग्रॅ.) पुरतात. ४) खताची मात्रा (प्रति हेक्‍टरी) ५७ कि.ग्रॅ. नत्र + २९ कि. ग्रॅ. स्फुरद.
नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी ब्रिकेट (युरिया – डीएपी) हाताने सात ते दहा सें.मी. खोल रोवण्याचे फायदे ः लावणी भातासाठी नत्र व स्फुरद वापरण्याची ही कार्यक्षम पद्धत आहे. पाण्याबरोबर नत्र व स्फुरदयुक्त खत वाहून जात नाही. खतामुळे होणारे प्रदूषण टळते. दिलेल्या खतापैकी ८० टक्‍क्‍यांपर्यंत नत्र भात पिकास उपयोगी पडते. खतात ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते ब्रिकेट्‌स खोल खोचल्यामुळे अन्नद्रव्ये तणाला मिळत नाहीत. तणाचा त्रास कमी होतो. भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) निश्‍चित वाढते.

Related posts

Shares