Search

जमीनीची मोजणी. – भाग १

जमीनीची मोजणी. – भाग १

शेत जमीनीची मोजणी व त्या आधारे येणारी जमीनीची निश्चित मोजमापे ही शेतकर्यांचच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. गावाच्या नकाशामधे सर्व्हे नंबर, रस्ते, गावाची शीव, नदया,नाले इत्यादी दाखविण्यांत आले. प्रत्येक जमीनीची शंखू साखळीच्या आधारे जी मोजमापे घेतली आहेत त्या मोजमापाच्या आधारे मूळ रेकॉर्ड जिल्हयाच्या कचेरीत कायम स्वरुपी जतन करण्यांत आले. आजही जमीनीची मोजणी करतांना या मूळ रेकॉर्डमधील नकाशा व मोजमापे यांचा विचार करुन व त्याच्याशी तुलना करुनच जमीन मोजली जाते. ज्या गावामध्ये एकत्रीकरण योजना अंमलात आली अशा गावामध्ये सर्व्हे नंबर ऐवजी एकत्रीकरणानंतर त्यास गट नंबर असे संबोधले गेले. त्यामुळेच 7/12 वर भूमापन क्रमांक या सदराखाली जो क्रमांक लिहीला असतो तो एकतर सर्व्हे नंबर किंवा गट क्रमांक असतो.
जमीनीच्या मोजणीची आवश्यकता :
शेतकर्यााच्या दृष्टीने शेत जमीनीच्या मोजणीची गरज, खालील वेगवेगळया कारणामुळे आवश्यक असते.
1. जेवढी जमीन आपल्या मालकीची आहे तेवढी सर्व जमीन आपल्या ताब्यात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी.
2. वडीलोपार्जित जमीनीमध्ये वारसाने किंवा वाटपाने किंवा विक्रीमुळे हिस्से पडले असतील तर आपल्या वाटयाला आलेली जमीन ही रेकॉर्डप्रमाणे प्रत्यक्षात ताब्यात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी.
3. वाटण्या झाल्या नसल्या तरी प्रत्यक्षात वहिवाटीप्रमाणे जे हिस्से असतात ते योग्य प्रमाणात आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी.
4. एखादी जमीन नवीन खरेदी केल्यास किंवा विक्री केल्यास खरेदी खताप्रमाणे निश्चित क्षेत्र काढण्यासाठी.
5. खातेफोड करुन जमीनीचे वाटप करीत असतांना सर्व हिस्सेदारांना समान प्रमाणात जमीन येण्यासाठी.
6. बांधावरील झाडे, विहीरी घरे ही नेमकी कोणत्या हद्दीत आहेत हे समजण्यासाठी.
7. काही जमीनी बिगर शेती करुन घेण्यासाठी किंवा बिगर शेती होणारी जमीन व शेतीची जमीन यांची स्वतंत्रपणे बांध निश्चित होण्यासाठी.
8. वहिवाटीमध्ये बदल झाला असेल किंवा बांध सरकले असतील तर निश्चित क्षेत्र निदर्शनास येण्यासाठी.
9. अतिक्रमण केले असल्यास किती क्षेत्रावर अतिक्रमण आहे हे निश्चित करण्यासाठी.
10. गावाची शीव, गायरान, पाणंद, रस्ते, स्मशानभूमी इत्यादी सार्वजनिक ठिकाणावर अतिक्रमण झाले असल्यास.
जमीन मोजणीचा अर्ज :
शेत जमीनीच्या मोजणीचा अर्ज हा आता प्रत्येक तालुक्याला जे मोजणी कार्यालय आहे, त्या तालुका निरिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे करावा लागतो. या अर्जामध्ये, अर्ज करणार्या् व्यक्तिचे नांव, पत्ता, मोजावयाच्या जमीनीचे वर्णन चतु:सिमा, खातेदाराचे नांव व पत्ते इत्यादी महत्वाचा तपशिल असतो.
शेतजमीनीची मोजणी कशी करतात ?
कोणत्याही खातेदाराने मोजणीबाबतचा अर्ज दाखल केल्यानंतर अशा मोजणी प्रकरणाला मोजणी रजिस्टर क्रमांक दिला जातो.
त्यानंतर या प्रकरणामध्ये या जमीनीबद्दलचे जे मूळ रेकॉर्ड कार्यालयात आहे त्या मूळ रेकॉर्डमधून टिपण / फाळणी व एकत्रीकरण झाले असल्यास त्या योजनेचा उतारा तयार करुन या प्रकरणामध्ये लावला जातो व हे संपूर्ण प्रकरण मोजणी करणार्यास भूकर मापकाकडे (सर्व्हेअर) दिले जाते.
मोजणीसाठी प्राप्त झालेल्या अशा प्रकरणामध्ये संबंधित भूकर मापक हा अर्ज करणार्या् व्यक्तिंना व पत्ते देण्यांत आलेल्या लगतच्या कब्जेदारांना मोजणीच्या अगोदर किमान 15 दिवस रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठवून तारीख कळवतो.
सर्वसाधारणपणे जून ते ऑक्टोबर या पावसाठी मोसमात तालुक्यामध्ये रेकॉर्डबद्दलचे काम केले जाते. उर्वरित काळात जमीनीच्या मोजणीचे काम सर्व्हेअरमार्फत केले जाते. प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी, मोजणी करण्यासाठी भूकर मापकास मदतीसाठी लागणारे मजूर, निशाणदार, चुना, हद्दीचे दगड इत्यादी साहित्य हे अर्जदाराने स्वत:च्या खर्चाने पुरविणे अपेक्षित आहे.
आजकालच्या सर्व मोजणी या प्लेन टेबल मोजणी पध्दतीने केल्या जातात. प्रत्यक्ष जमीनीची लांबी, रुंदी किंवा बांधाचे माप न घेता प्लेन टेबल पध्दतीने मोजणीदाराला मोजणी नकाशा हा तंतोतंत वस्तुस्थितीप्रमाणे तयार करता येतो. जमीन वर, खाली, ओबडधोबड व ओढया-नाल्याची असली तरी तिचे निश्चित असे आकारमान हे या प्लेन टेबल पध्दतीने समजू शकते.
मोजणीसाठी आलेले सर्व्हेअर हे सर्वप्रथम जी जमीन मोजावयाची आहे त्या जमीनीची पाहणी करुन प्रत्यक्ष वहिवाट कोठे आहे याबाबत अर्जदार शेतकर्याजस विचारणा करतात. प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे हद्द लक्षात यावी म्हणून खुणा ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे जमीनीमध्ये किंवा त्या गटाजवळ असलेल्या मुळ मोजणीच्या खुणा म्हणजे सर्व्हे नंबरचा दगड किंवा बांधाचा दगड किंवा उरळया याच्या खुणा विचारात घेऊन प्लेन टेबलच्या आधारे जमीनीची मोजणी केली जाते.
मोजणीच्या वेळी अनेकवेळा जो शेतकरी अर्ज करतो त्याच्या लगतचे शेतकरी मात्र गैरहजर राहतात. विशेषत: जर अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला असेल तर अतिक्रमण करणारी व्यक्ती हजर रहात नाही. एखादी व्यक्ती मोजणीच्या वेळी गैरहजर राहिले तरी त्यांच्या गैरहजेरीमध्ये मोजणी करता येते. तथापि मोजणी करण्यांत येणार आहे अशाप्रकारची आगाऊ नोटीस संबंधीत व्यक्तिला बजावली गेली असली पाहिजे किंवा त्या व्यक्तिनी ही नाटीस घ्यावयास नकार दिला असला पाहिजे.
मोजणीच्या आधारे प्लेन टेबल वर आपोआप जमीनीच्या खूणा व नकाशा तयार होत जातो. मोजणीच्या संदर्भात अर्जदारासह सर्व संबंधिंतांचा लेखी जबाबसुध्दा सर्व्हेअरकडून घेतला जातो. एखाद्या व्यक्तीने जबाब न दिल्यास, त्याने जबाब द्यावयास नकार दिला असा पंचनामा करतात. प्लेन टेबलच्या आधारे होणारी ही मोजणी नेहमीच जमीनीच्या मूळ रेकॉर्डशी तुलना करुन पाहिली जाते. त्यामुळे कधीकधी जमीनीची मोजणी झाली की लगेचच हद्दीच्या खुणा न दाखवता पुन्हा तालुक्यामध्ये जाऊन मूळ रेकॉर्डशी तुलना करुन क्षेत्राचा मेळ बसल्यानंतर काही दिवसांनंतर जमीनीच्या हद्दी दाखविल्या जातात.

मोजणीनंतरची कार्यवाही :
अशा पध्दतीने जमीनीची मोजणी करुन प्रत्यक्ष हद्दी पुन्हा दाखविल्यानंतर तालुका कार्यालयात मोजणी नकाशाच्या स्वच्छ दोन प्रती तयार केल्या जातात. अशा मोजणी नकाशामध्ये मोजणी कोणी मागितली आहे त्या अर्जदाराचे नांव, मोजणीची तारीख, सर्व्हेअरचे नांव, नकाशाच्या दिशा, हद्दी दाखविल्याचा दिनांक, नकाशाचे स्केल व सहीशिक्का इत्यादी महत्वाचा तपशिल लिहिलेला असतो.
जर वहिवाटीची हद्द आणि रेषेप्रमाणे येणारी हद्द वेगवेगळया असतील तर अशी वहिवाटीची हद्द तुटकतुटक रेषेने व रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द ही सलग रेषेने दाखविली जाते. या दोन्हीमध्ये अतिक्रमणाचे क्षेत्र रंगाने रंगवून दाखविले जाते.
मोजणी नकाशावर सुध्दा – – – ही वहिवाटीची हद्द असून ______ ही रेकॉर्डची हद्द आहे व क रंगाने दाखविलेले क्षेत्र हे – गट नं. मधील असून त्यामध्ये – गट नंबराच्या मालकाने अतिक्रमण केले आहे असा उल्लेख असतो. अशा पध्दतीने मोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराचा अर्ज निकाली काढून त्यास मोजणी नकाशाची एक प्रत दिली जाते.
निमताना मोजणी अर्ज :
वरील पध्दतीने जमीनीची एकदा मोजणी झाली आणि सर्व्हेअरने हद्दी पुन्हा दाखविल्यानंतर जर अशी मोजणी जर मान्य नसेल तर मूळ मोजणीच्या विरोधात अपील करण्याची तरतूद आहे. त्यानुसार थेट तालुका निरिक्षक भूमि अभिलेख यांचेकडे निमताना मोजणीसाठी अर्ज केला जातो. अशा अर्जावरुन स्वत: तालुका निरिक्षक हे, पुन्हा केलेल्या मोजणीची परत खात्री करुन स्वतंत्र मोजणी करुन जमीनीची हद्द दाखवतात.
संदर्भ : सातबारा. को. इन

Related posts

Shares