Search

जलसाक्षरतेची मोहीम गावोगाव उभी राहावी

जलसाक्षरतेची मोहीम गावोगाव उभी राहावी

भीषण पाणीटंचाईच्या काळात दोन गटांत, दोन गावांत, दोन जिल्ह्यांत, दोन विभागांत, दोन राज्यांत पाहता पाहता संघर्ष सुरू होतो. मग कळते पाण्याचे महत्त्व. पाण्यासाठीचा संघर्ष भविष्यात टाळायचा असेल तर जल साक्षरतेची चळवळ गावोगाव उभी राहणे आवश्‍यक आहे. ही चळवळ यशस्वी होण्यासाठी मानसिक बदल होणेही गरजेचे आहेत.

प्रा. एस. डी. पायाळ 

तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पंच महाभुतांमध्येही पाण्याचे महत्त्व सांगितले आहे. प्रत्येक सजिवासाठी पाणी हे अत्यंत आवश्‍यक आहे. पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस. सर्व विश्‍वाला आवश्‍यक असणाऱ्या पाण्याची गरज पावसामुळे भागवली जाते. वाढती लोकसंख्या, प्रचंड प्रमाणात जंगलतोड, प्रदूषण, नवीन वृक्षारोपणाचा अभाव, औद्योगिक क्षेत्राची वाढती पाण्याची मागणी आणि आहे तिथे बेसुमार पाण्याचा वापर अशा अनेक कारणांमुळे भीषण पाणीटंचाई भविष्यात भेडसावणार आहे. पाणीटंचाईच्या भीषण समस्येची सोडवणूक करावीच लागणार आहे.
पुरातन काळात पाणी साठवण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्‍या, मोठ्या विहिरी, तळी आदी अनेक पाणीसाठे आता पावसाअभावी कोरडे पडलेले आहेत. खेडोपाडी पूर्वीच्या लोकांनी शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी कर्ज काढून विहिरी बांधल्या. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे आगमन व वितरण समान नसल्यामुळे पाणीसाठे कोरडे पडत आहेत, असे दिसून येते. भीषण पाणीटंचाईच्या काळात दोन गटांत, दोन गावांत, दोन जिल्ह्यांत, दोन विभागांत, दोन राज्यांत पाहता पाहता संघर्ष सुरू होतो. मग कळते पाण्याचे महत्त्व. पाण्यासाठीचा संघर्ष भविष्यात टाळायचा असेल तर जलसाक्षरतेची चळवळ गावोगाव उभी राहणे आवश्‍यक आहे. ही चळवळ यशस्वी होण्यासाठी मानसिक बदल होणेही गरजेचे आहे.
जीवनाला, कार्याला तसेच वास्तवाला प्रतिसाद देण्याची क्षमता जेव्हा कमी होत जाते तेव्हा अशी भयगंडाने ग्रासलेली माणसे वास्तवाला सामोरे जात नाहीत. काहींना जबाबदारीचे ओझे नको असते. अशा एक ना अनेक कारणांमुळे माणसे डबक्‍यातील सुरक्षित जीवन जगत राहतात. बहुतेक लोक विलक्षण आत्मकेंद्रितपणे जगतात. आपण या बदलत्या निसर्गाशी, ढगांशी नाते जोडले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. पृथ्वीवरील सगळ्या जिवंत गोष्टीशी संघर्ष व ताणतणाव यामुळे आपला सातत्याने ऱ्हासच होत आहे. आपण स्वतः परिवर्तन घडवून आणले नाही, तर तुम्ही दुःखाला प्रतिष्ठा मिळवून द्याल. माणसाच्या दुःखाचे मुळ तृष्णेत आहे. माणसाच्या इच्छा, आकांक्षा तसेच आसक्ती यामध्ये आहे. या सर्वांचा त्याग करणे, हीच खरे तर मुक्ती आहे. मोक्ष आहे. हा मोक्ष मिळण्यासाठी आपले या निसर्गाशी काही देणे आहे आणि ते देण्यासाठी आत्मकेंद्रित पणातून प्रथम बाहेर पडणे आवश्‍यक आहे. जे दिसते ते रूप आणि जे दिसत नाही; परंतु असते ते स्वरूप तुम्ही आंतरिक अवधान ठेवत स्वचे स्वरूप जाणून घ्याल आणि झालेले आकलन त्वरित आमलात आणाल तेव्हाच तुमच्यात परिवर्तन होईल.
पाणी हे जीवन आहे आणि या पाण्यावरच निसर्गातील जीवजंतू यांचे जीवन अवलंबून आहे. जगभरातील अनेक देशांत त्याच बरोबर भारतातही आजही शेतीच मुख्य व्यवसाय आहे. शेतीची पाण्याची गरज तर आहेच; पण पिण्यासाठीच पाणी नसेल तर शेती काय किंवा औद्योगिक क्षेत्रासाठी पाण्याची मागणी काय या सर्व गोष्टी हताश आणि निराश करणाऱ्याच ठरणार, पाण्यासाठी वणवण भटकणारी खेडोपाडी वाड्या, वस्त्या, तांड्यावर महिला, मुले डोक्‍यावर घडा, हातात तांब्या वाटी घेऊन जाताना आपण पाहतो. पाणीटंचाईचा सर्वांत मोठा फटका बसतो तो गरिबांना, अगोदरच वाईट परिस्थिती असणाऱ्या गरिबांच्या आरोग्यावर आणखी वाईट परिणाम होतो. यामुळे गरीब लोक गरिबी आणि रोग यांच्या चक्रातून बाहेर येऊ शकत नाहीत. त्यासाठी आपण जलसाक्षरता मोहीम खेडोपाडी तसेच शहरातही जोरात राबविली पाहिजे. पावसाळ्यात उपलब्ध पाण्याचा बेहिशेबी वापर बऱ्याच ठिकाणी पाहतो. घरामध्ये नळ सुटलेले असतात, टाक्‍या वाहतात व गळत असतात या सर्वांची वेळीच्या वेळी दुरुस्ती करावी. आजही घरात दोन-दोन बादल्या पाणी अंघोळीसाठी वापरले जाते. बऱ्याच महिला वरचेवर फरशी धुणे, गच्ची धुणे, सकाळी, संध्याकाळी दारापुढे फरशीवर पाणी मारणे, घराजवळील बागांना कारणाशिवाय पाणी घालणे, वॉशिंग मशीनमध्ये भरपूर प्रमाणात पाणी वापरून ते सांडपाण्यात सोडून देणे, मोठा नळ सोडून धुणे इ. कामे बेजबाबदारपणे करतात. पिण्याचे पाणी भरपूर भरणे व दुसरे दिवशी ओतून देणे. अशा सर्व ठिकाणी सुज्ञपणे काटकारीने पाण्याचा वापर करता येईल. आंघोळीचे पाणी, धुण्याचे पाणी, स्वयंपाकाचे पाणी, बेसिनचे सांडपाणी हे सर्व उन्हाळ्यासाठी वाया न घालवता झाडांना द्यावे. शक्‍य असेल तर रस्त्यावरील एखादे झाड सामाजिक बांधिलकी म्हणून जगवावे.
“थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे पावसाच्या पाण्याच्या थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन साठवण करावे. ठिबक सिंचन पद्धतीनेच शेती करून पाणी वाचवावे. पाण्याच्या काटेकोर नियोजनाबरोबरच काळजीपूर्वक वापराबाबतही कटाक्ष ठेवायला हवा. कित्येक ठिकाणी पाण्याच्या गैरवापरामुळे पाणीटंचाईचे संकट आले आहे. शालेयस्तरावर मुलांना पाण्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या शिक्षणाचा समावेश व्हायला हवा.
शेतीचे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी सद्यःस्थिती उसाला देण्यात येणारे मोकाट पाणी बंद करून ठिबक सिंचनानेच द्यावे. पाणीवापराबाबत इस्राईल देशात ज्याप्रमाणे क्रॉपपॅटर्न धोरण तेथील शासन ठरवते त्याप्रमाणे ठरवावे. आपल्याकडे शेतकरी मनात असेल ते पीक घेतात व पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. शासनानेही हवामानानुसार “पीक पेरा’ धोरण ठरवावे. जेणेकरून चाऱ्याचा व धान्याच्या टंचाईचा प्रश्‍न कमी करता येईल.

9420966384
(लेखक परभणी येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

Source- http://www.agrowon.com/Agrowon/20150416/5439371424768706502.htm

Related posts

Shares