Search

जागतिक सहल दिन विशेष : कृषी पर्यटन : शहरीकरणाला कृषीपरंपरेशी जोडणारा व्यवसाय

जागतिक सहल दिन विशेष : कृषी पर्यटन : शहरीकरणाला कृषीपरंपरेशी जोडणारा व्यवसाय

पर्यटन क्षेत्राला सध्या प्रचंड मागणी आहे. जगभरातील उंचावणारी उत्पन्न मर्यादा, विविध देशांबद्दल, जागांबद्दल आणि माणसांबद्दल माणसाला असलेली मूलभूत उत्सुकता आणि धकाधकीच्या जीवनातून विसाव्याची गरज म्हणून लोकांचा पर्यटनाकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे व्यवसाय म्हणून पर्यटनाचे महत्त्वही वाढत आहे. यातूनच एका संकल्पनेने जन्म घेतला, त्याला ‘एक्स्पिरिअन्स टुरिझम’ म्हणजे ‘अनुभवात्मक पर्यटन’ म्हणतात. एखाद्या जागी फक्त जाऊन येण्यापेक्षा तिकडचे जीवन, पद्धती प्रत्यक्षात अनुभवण्याकडे पर्यटकांचा ओढा आहे. यातूनच जन्म झाला कृषी पर्यटनाचा.

भारत, वैविध्याने आणि सौंदर्याने नटलेला देश. आजही या देशातील ७०% जनता ही ग्रामीण भागात राहते. देशाला स्वातंत्र्य मिळून पाच तप उलटले तरी ग्रामीण भागाचा उदरनिर्वाह करणारी शेती पूर्णपणे दुर्लक्षीत राहिली. त्यामुळेच आज आपल्यासमोर शेतकरी आत्महत्येसारखी महाभयाण समस्या उभी ठाकली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे शहर आणि गाव यातील दरीही तेवढीच वाढली असल्यामुळे गाव, गावाकडची संस्कृती, शेती, शेतकर्‍यांची जीवनपद्धती अशा अनेक विषयांपासून शहरी लोक कोसो दूर राहिलेत. आज पुन्हा एकदा ‘गावाकडे चला’ असं म्हणण्याची वेळ आलीय. शहरी माणसाला या गावाकडच्या मातीची ओढ आहे तर ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व्यवसायांची गरज आहे. या दोन्ही गोष्टीची सांगड घालून ‘कृषी पर्यटन’ ही संकल्पना आजमितीस आपल्या मातीत रुजू लागलीय.

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा निसर्गाकडे ओढा वाढत आहे. निसर्गाची हानी न होऊ देता पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा आनंद देणारी कृषी पर्यटन केंद्रे हा सक्षम पर्याय शेतकर्‍यांना मिळाला आहे. आजमितीस महाराष्ट्रात तीनशेहून अधिक कृषी पर्यटन केंद्रे आहेत.

आजच्या नव्या पिढीला शेती, गोठे, चुलीवरचं जेवण, घर, गावाकडच्या प्रथा हे सारं माहीत नसतं. गंमत म्हणजे जर आजच्या मुलांना विचारलं भात कुठे पिकतो? जे अन्न आपण खातो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय आणि किती प्रकारच्या प्रक्रियेतून जाते याची कल्पनाच नसेल तर अन्न वाया घालवू नये याचे महत्त्व पटेलच कसे? शेतकर्‍यांची दु:खं समजण्याची त्यांच्या आत्महत्येच्या प्रश्‍नाशी आजची पिढी जोडली जाईलच कशी? अशा प्रश्‍नांची उत्तर मिळवायची असतील तर त्यासाठी कृषी पर्यटन हाच मार्ग आहे. हे आता शहरी जणांना मनोमन पटू लागलेय, त्यामुळे काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी आता जोमाने कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला पाहिजे. अत्यंत उज्ज्वल असे भवितव्य असणारा असा हा कृषी पर्यटनाचा पूरक व्यवसाय करून तो मुख्य व्यवसाय कसा होईल याचा ध्यास घेतला पाहिजे.

आज शेतीमालाच्या दराबाबत अनिश्चितता आहे. शेतकरी शेती उत्पादन पिकवतो. त्याला दर निश्चितीचा हक्क नाही. यामुळे शेतकर्‍यांना उत्पादनखर्चसुद्धा मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये कृषी पर्यटन व्यवसायात पर्यटकांचे दर निश्चिती पॅकेज ठरविणे शेतकर्‍यांच्या हातात आहे. म्हणून हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य व सामर्थ्य देणारा आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटन व्यवसायात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे, हे राज्यातील अनेक कृषी पर्यटनचालक शेतकर्‍यांनी सिद्ध केले आहे.

Agro tourism

कृषी पर्यटनासाठी कशाची गरज आहे?

टाग्रेट मार्केट

कुठल्याही व्यवसायाची पहिली गरज म्हणजे आपले मार्केट काय आहे ते समजणे. ते समजले की, त्यांच्या गरजा समजू शकतात. कृषी पर्यटक हा शहरात राहणारा किंवा अगदी विदेशातील एखादा पर्यटक आहे. त्याला गावातील निर्मळ, निभ्रेळ वातावरणाचा अनुभव घ्यायचा आहे. आपले मार्केटिंग असे असावे की, जास्तीत जास्त प्रमाणात शहरी लोकांपर्यंत पोहोचता येईल. रोजच्या कामाची दगदग, टेंशन अशा लोकांना अधिक असते. त्यामुळे नेहमीच्या आयुष्यातून अशा निभ्रेळ जगात येण्याची गरज त्यांच्यापेक्षा अधिक कोणालाही नसेल.

जागा

तुम्हाला शेतजमीन हवी आहे आणि त्याभोवताली पर्यटनाच्या सुविधाही द्यायच्या आहेत. साधारणत: २-५ एकर जागा असावी. अर्थात, ती सरळ असावी असे नाही. या जागेचा वापर शेतीसाठी नाही तर शेतीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी करता येतो. जागा उंचसखल असली किंवा डोंगराळ असली तरीही कल्पकतेने त्याचा वापर केला जाऊ शकतो.

या ठिकाणी तुम्ही काय करू शकता?

जागेचे विभाजन करून थोडय़ा भागात भातशेती , थोडय़ा भागात भाज्या आणि फळझाडांची लागवड करावी. त्यामुळे शेतातील ताजा माल जेवणाला वापरता येतो. जागा पाच एकर किंवा तत्सम असेल तर ब-यापैकी मोठी शेती करता येते. थोडय़ा भागात गोडय़ा पाण्यातील मत्स्यशेती आणि थोडय़ा जागेत कुक्कुटपालन होऊ शकतं. दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन यामध्ये शेणाची किंवा विष्ठेची घाण निर्माण होत असल्याने तो भाग पर्यटकांच्या राहण्याच्या जागेपासून लांब असावा. मात्र, शक्यतो या सर्व गोष्टींचा वापर हा पर्यटनातील वातावरणनिर्मितीसाठी आणि फार तर पर्यटकांच्या गरजेपुरता हवा, अन्यथा हे व्यवसाय जास्त होतील आणि पर्यटनाकडे दुर्लक्ष होईल.

हे सर्व प्रकार न करता संपूर्ण जागेवर फक्त फुलशेतीसुद्धा करता यते. पाश्चात्त्य देशात लांबच लांब पसरलेल्या झेंडूच्या किंवा गुलाबाच्या फुलांच्या बागा असतात. त्यामुळे ती जागा खूप सुंदर दिसते.

जंगल पर्यटन

जागा ही डोंगराळ असेल किंवा डोंगराच्या जवळ असेल तर वर उल्लेखलेल्यापेक्षा अतिशय वेगळे असे जंगल पर्यटन करता येते. यात पर्यटकांना जंगलात आल्याचा अनुभव द्यायचा असतो. त्यामुळे बांबू, खैर असे मोठे मोठे वृक्ष लावावेत. त्याचबरोबर औषधी वनस्पतींची लागवड करावी. बांबू तीन वर्षात प्रचंड प्रमाणात उत्पादन देतात. त्यामुळे तो फायदेशीर वृक्ष आहे. एखाद्या ठिकाणी कृत्रिम धबधबा तयार करावा.

 Image (88)

 घरे

राहण्याच्या खोल्या कौलारू घरांसारख्या दिसणे अधिक उत्तम. बाहेरील बांधकाम विटांचे किंवा कुडाचे असले तरी आत एखाद्या हॉटेलमधील खोल्याप्रमाणे सुखसोयी असाव्यात. खोल्यांमध्ये एसी असेल तर अधिक उत्तम.

प्रत्येक घरात डबल बेड, फ्रीज, उत्तम बाथरूम व शौचालय आणि हवेशीर व सूर्यप्रकाश येईल अशी खिडक्यांच्या रचना असाव्यात. पडदे, उत्तम दरवाजा, खिडक्या अशी पर्यटकांच्या प्रायव्हसीची पुरेपूर काळजी घेणारी यंत्रणा असावी.

उत्पन्न आणि खर्चाचा मेळ

यामध्ये वेगवेगळे पॅकेज ठेवावी लागतात आणि त्यावरूनच उत्पन्नाची निश्चिती होते.

 • पर्यटकांचा केंद्रापर्यंत येण्याचा वेळ
 • केंद्रातून परत घरी जाण्याचा वेळ
 • साधारणत: त्यांना कामावर सुट्टी घ्यावी लागेल का याचा अंदाज

पर्यटनाचा कालावधी

 • केंद्राभोवताली असणारी पर्यटनस्थळे यावर पॅकेज किती दिवसांचे असावे हे अवलंबून असते.
 • साधारण तीन दिवसांसाठी प्रति व्यक्ती किंमत ६००० ते ८००० रुपये ठेवू शकता.
 • या व्यवसायात साधारणत: २५-३० टक्के नफा नक्की मिळतो.

कृषी पर्यटन हा गावात विशेषत: कोकणात अतिशय यशस्वी होईल असा व्यवसाय आहे. त्यासाठी फक्त चिकाटी आणि आपल्या केंद्राचे उत्तम मार्केटिंग करण्याची हातोटी गरजेची आहे आणि त्यातही सतत कुठल्या प्रकारे आणि कोणत्या वर्गातील पर्यटकांना आपण आकर्षति करू शकतो हे सतत शोधत राहणे गरजेचे आहे.

कृषी पर्यटन करू इच्छिणार्‍यांसाठी काही महत्त्वाच्या टीप्स :

 • व्यवसाय सुरू करताना सर्वबाजूंचा अभ्यास आवश्यक आहे. त्याचसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:चे मार्केटिंग करणेही महत्त्वाचे ठरते. आपल्या व्यवसायाची जाहिरात वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, पर्यटनविषयक मासिके यातून सतत करावी.
 • आपल्या शेतीची बलस्थाने आपणच विकसित करावीत. नावीन्य आणि वेगळेपण जपणे गरजेचे असते. आपल्या शेतात पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी शक्यतो नैसर्गिक स्रोतांचा जास्तीत जास्त उपयोग करून पर्यटकांना सेवा द्यावी.

Image (51)

 • शेतीसोबतच निसर्गाशी संबंधीत इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात त्याही पर्यटकांना दाखवता येतात. उदा. विविध पक्षी, प्राणी, झाडे, फुलपाखरे इ.
 • पर्यटकांना घरचे चुलीवर शिजवलेले जेवण मिळाले तर पर्यटक जास्त आनंदी व समाधानी होतात. त्यामुळे या गोष्टींचीही खूप काळजी घ्यायला हवी. राहण्याची व खाण्यापिण्याची योग्य व व्यवस्थित सोय झाली की पर्यटक पुन्हा तुमच्याकडे भेट नक्की देणार याची खात्री.
 • कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आवश्यक असतात – राहण्याचा दाखला व फोटो दाखला, ग्रामपंचायतीचा व्यवसाय म्हणून दाखला, ग्रामपंचायत बांधकाम परवाना, एस्टिमेट (अंदाजपत्रक), आर्किटेक्चर दाखला, ज्या जागी बांधकाम करायचे त्या क्षेत्राचा एनए दाखला (कलेक्टर) किंवा झोन दाखला. जागेविषयक संपूर्ण कागदपत्रे, वकील तारणयोग्यतेचा दाखला, टायटल व सर्च रिपोर्ट, ज्यांच्या नावावर जमीन आहे, त्यांचे संमतीपत्रक, जागेचा नकाशा, अन्य गटधारकांची संमती, कुटुंबातील अन्य सदस्यांची संमती. जोडतारण असल्यास जोडतारणाची कागदपत्रे, आर्थिक कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्रे, जामीनदारांची कागदपत्रे. जामीनदार हा कर्जदाराइतकाच परतफेडीला समप्रमाणात जबाबदार असतो.
 • एकूणच कृषी पर्यटनाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे. तरच चांगल्याप्रकारे आर्थिक प्रगती साधता येते. धकाधकीच्या जीवनात परस्परातील संवाद कमी होतोय त्यामुळे ताणतणाव वाढतोय. तो कमी करण्यासाठी कृषी पर्यटन हे चांगले माध्यम आहे. पर्यटकांना निवांतपणा मिळाला की ते आनंदित होतात. त्यासाठी आपण मात्र त्यांना कमीत कमी आवश्यक अशा पायाभूत सुविधा तरी पुरविल्याच पाहिजेत.
 • कृषी पर्यटन केंद्रासाठी शक्यतो निसर्गाच्या सानिध्यात जागा निवडावी. रिसॉर्ट व कृषी पर्यटन या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे केंद्र चालवणार्‍याने नेहमी लक्षात ठेवावयास हवे. शेतीतून अधिक उत्पन्न वाढविण्याची संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन. यात शेतीला प्रथम प्राधान्यच मिळाले पाहिजे.
 • महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अनेक एकरांवर बहरलेली ही केंद्रे शेतीसोबत नवनवीन संकल्पना, प्रयोग करून कृषी पर्यटन यशस्वीरित्या राबवत आहेत.
 • शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील या क्षेत्रातील वाढती मागणी याची वेळीच दखल घेऊन आपल्याकडील प्रत्येक शेतकर्‍याने कृषी पर्यटनासाठी सुरुवात करायला. योग्य नियोजन आणि दूरदृष्टीने या गोष्टीकडे पाहिले तर भारत हा कृषी पर्यटनात पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास येण्यास जास्त वेळ लागणार नाही.

संदर्भ : प्रहार वर्तमानपत्र, udyojak.org

फोटो स्त्रोत : देस्ता कृषी परिवार फोटो स्पर्धा

 

Related posts

Shares