Search

जुलै महिन्याचे कृषी व्यवस्थापन कसे कराल? भाग पहिला

जुलै महिन्याचे कृषी व्यवस्थापन कसे कराल? भाग पहिला

उन्हाळा, हिवाळा, पावसाला या तिन्ही ऋतू मध्ये महाराष्ट्रात शेती केली जाते. ऋतू मध्ये असलेल्या विविधते प्रमाणे शेतीचे हंगाम असतात.  यामध्ये, खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन हंगामाचा प्रामुख्याने समावेश असतो. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. खरीपातील काही पिकांची लागवड झाली आहे, तर काही पिकांची लागवड अजून बाकी आहे. खरीप दरम्यान जुलै महिन्यात आपण शेतीसम्बाधित कोणती कामे करू शकतो याबाबत आपण जाणून घेऊया.  या लेखाच्या पहिल्या भागात आपण “भात, नागली, बाजरी आणि भुईमुग” या पिकांसाम्बाधित माहिती घेऊया.

१. भात

१)गादी वाफ्यावरील भात रोपास, रोपे १५ दिवसांनी झाल्यावर २ किलो अमोनियम सल्फेट किंवा १ किलो युरिया दर गुंठा क्षेत्रास द्या. वाफा तणविरहीत ठेवा.

२)भाताच्या रोपांची पुर्नलागण अशी करा –

अ)रोपांची पुर्णलागण करावयाच्या शेतात शेत तयार करतांना शेवटच्या नांगरणीचे वेळी हेक्टरी २-३ टन या प्रमाणात भाताचा पेंडा गाडावा. चिखलणी करते वेळी हेक्टरी २ टन या प्रमाणात गिरीपुष्पाचा पाला जमिनीत गाडावा.

आ)सुधारीत भाताच्या रोपांची नियंत्रीत लावणी पध्दत –

-सुधारीत भाताच्या २० ते २५ दिवसाच्या रोपाची नियंत्रीत लावणी करावी. त्यासाठी बांबू मार्गदर्शक किंवा सुधारीत लावणी दोरी वापरावी. बांबू मार्गदर्शक किंवा दोरीवर २५ से.मी., १५ से.मी., अशा अंतरावर खुणा कराव्यात.

-प्रत्येक खुणेजवळ चुडात ३ ते ४ रोपे लावावीत. चुडांची संख्या प्रति चौ.मी. २५ इतकी राहते.

-लावणी करताना एकाच वेळी चुडांच्या दोन ओळी लावाव्यात व प्रत्येक वेळी ४० सें.मी. मागे जावे. असे केल्यामुळे १५ X १५ से.मी. मापाचे चुडांचे चौकोन व २५ सें.मी. चालण्याचे रस्ते (आडवे व उभे) संपूर्ण खाचरात तयार होतात.

क)युरिया डिएपी ब्रिकेटस वापरण्याची पध्दत –

-शेतक-याने कमरेभोवती बांधलेल्या प्लँस्टीक पिशवीत एक ते दिड किलोग्रँम ब्रिकेटस घ्याव्यात डाव्या कोरड्या हाताने पिशवीतून एकाचवेळी ५ ते १० ब्रिकेटस काढाव्यात.

-डाव्या हाताने एका वेळी एक ब्रिकेट उजव्या हातात टाकावी. उजव्या हाताने एका वेळी एक ब्रिकेट चार ओव्याच्या किंवा चुडांच्या (१५ X १५ सें.मी. चौकोनात) मध्यभागी ७ ते १० सें.मी. खोलीवर लावणीच्या नंतर त्याच दिवशी खोचावी.

-भात रोपाच्या पुर्नलागणीनंतर ८ ते १० दिवसांनी खाचरात निळे हिरवे शेवाळ २० किलो प्रती हेक्टरी फोकूण द्यावे.

२. नागली

१)पेरणी / लागण उतारास आडवी करा. कुलथी, उडीद यांचे मिश्रण पीक घ्यावे.

२)नागली रोपांची लागण ओळीत करावी. (१५ X १० सें.मी.)

३)पेरणीपुर्वी अँझोटोबँक्टर व स्फुरद जीवाणूची २५० ग्रँम प्रती किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.

३. बाजरी

१)शिफारस केलेल्या पेरणीसाठी निवड करा.

-संकरीत वाण – श्रध्दा, सबुरी, शांती

-सुधारीत वाण – आय.सी.टी.पी.८२०३

२)१५ जुलैपर्यंत पेरणी करा.

३)पेरणीपुर्वी अँझोटोबँक्टर व स्फुरद जिवाणूंची प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करा.

४)रासायनिक खतांचा वापर करा. पेरणीच्या वेळी एक हप्त्यात हलक्या जमिनीत ५०:२५ किलो नत्र व स्फुरद प्रती हेक्टरी द्या. मध्यम ते भारी जमिनीत ३० किलो नत्र स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळी द्या. पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी नत्राचा ३० किलो प्रतिहेक्टरी हप्ता द्या.

४. भुईमूग-

१)पेरणी ७ जुलैपूर्वी पूर्ण करा.

२)फुले प्रगती व एस.बी. ११, फुले उनप (जे.एल.२८६) या वाणांचा वापर करा.

३)७ जुलैपर्यंत पेरणी न झाल्यास भुईमूगाऐवजी एरंडी / सुर्यफूल पीक घ्या.

४)भुईमूगावरील मुळकुजव्या व जमिनीतून उदभवणा-या इतर रोगाच्या परिणामकारक व आर्थिकदृष्ट्या फायद्याचे नियंत्रणासाठी थायरम अथवा बाविस्टीन या बुरशीनाशकाची अथवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रँम व नत्र स्थिर करणा-या रायझोबियम आणि स्फुरद विरघळविणा-या स्फुरद जीवाणूंची प्रत्येकी २५ ग्रँम प्रतीकिलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रीया करावी.

या लेखाच्या पुढील भागात आपण जुलै महिन्यात विविध पिकांसाठी कोणती कामे करता येतील याचा आढावा घेऊया.

 

Related posts

Shares