Search

टोमॅटो व्यवस्थापन – भाग २

टोमॅटो व्यवस्थापन  – भाग २
[Total: 15    Average: 2.9/5]

टोमॅटो व्यवस्थापन  या लेखाच्या पहिल्या भागात आपण हवामान, जमीन तसेच खत व्यवस्थापन अशा विविध पैलूंबाबत माहिती जाणून घेतली. या भागात आपण पाणी नियोजन, संजीवकांचा वापर, आंतरमशागत, आधार देणे, वळण देणे तसेच काढणी आणि उत्पादन यासारख्या महत्वपूर्ण पैलूंवर प्रकाशझोत टाकणार आहोत.

पाणी व्यवस्थापन :

टोमॅटो हे पीक ओलाव्याला अत्यंत संवेदनशील आहे. अतिरिक्त पाणी किंवा पाण्याचा ताण या दोन्ही गोष्टी या पिकासाठी हानिकारक आहेत. हिवाळ्याच्या दिवसात टोमॅटो पिकाला ८ ते १० दिवसांनी तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांनी पाणी देणे आवश्यक आहे. टोमॅटोच्या पिकासाठी ठिबकसिंचनाचा वापर करणे फायद्याचे ठरू शकते. कारण यामुळे साधारण ३५ % पाण्याची बचत होऊ शकते तसेच विद्राव्य खते देणे शक्य होते.

संजीवकाचा वापर :

  • टोमॅटो पिकावर संजीवकांचा वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
  • बी एक सारखे व लवकर उगविण्यासाठी जी. ए. २० पी. पी. एम. च्या द्रावणात १ तास भिजवून पेरावे.
  • टोमॅटोचे पीक फुलावर असतांना जी. ए. ची फवारणी केल्यास फळांचे देठ जाड, आणि फळातील बियांचे प्रमाण कमी होणे यासाठी १०, २० किंवा ३० पी. पी. ए ची फवारणी करावी.
  • फळधारणा सुरु असताना १०० पी. पी. एम जी. ए ची फवारणी करावी.
  • फुलगळ व फळगळ कमी करण्यासाठी नॅपथॅलीन अॅसिटीक अॅसिड  २०-४० पी. पी. एम फवारणी करावी.
  • वाढ थोपवून लवकर फुले येण्यासाठी पुर्नलागवडीनंतर १ आठवड्यांनी २५० पीपीएम सायकोसील फवारणी करावी.
  • फळे लवकर पिकून गडद रंग येण्यासाठी इथ्रेल ५०० पी. पी. एम फवारणी करावी.
  • फळे अधिक काळ टिकण्यासाठी फळवाढीच्या काळात ५-१० पीपीएम सीक्स बी. ए दोन तीन वेळा फवारणी करावी.
  • फळांचा आकर्षकपणा आणि गोडी वाढण्यासाठी – नॅपथॅलीन ऍसिटिक ऍसिड ५० पी. पी. एम + बोरॉन ५ पी. पी. एम फळे तयार होण्यापूर्वी फवारणी करावी.

आंतरमशागत : 

टोमॅटोचे चांगले उत्पादन येण्यासाठी वरचेवर तण  काढून खुरपणी करणे जरुरी आहे. मात्र हे काम करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. बासालीन हे तणनाशक हेक्टरी २ किलो या प्रमाणात वापरल्यास साधारण अडीच महिन्यात तणांचा बंदोबस्त होतो.

आधार देणे :

वेलीसारख्या वाढणाऱ्या टोमॅटोच्या जातींना आधार दिल्यास उत्पन्न आणि फळांची गुणवत्ता वाढते. पावसाळी हंगामात आधार दिल्यास रोगाचा उपद्रव, फळे नासणे इत्यादी त्रास कमी होऊन उत्पन्न चांगले येते. आधारासाठी बांबू, सुतळी तसेच तारेचा वापर करता येऊ शकतो. सुतळी किंवा तारेवर ताण कमी पडावा यासाठी दोन्ही बाजूस डांब लावून या डांबावर तारा खेचतात.

वळण देणे :

जमिनीपासून २० ते ३० सेंमी पर्यंत येणारी फूट खुडून टाकावी. पाने काढू नयेत. प्रत्येक तीन रोपांच्या दरम्यान दणकट बांबू किंवा कारवीच्या काठ्या रोपांच्या रांगेत घट्ट रोवाव्यात. बांबूच्या वाशाला तारा बांधून ओळीतील काठ्यांना आडव्या बांधाव्यात. यामुळे फवारणी, फळांची तोडणी, रोपांना भर देणे, पाणी देणे अशी अनके कामे व्यवस्थित आणि जलदगतीने होतात.

काढणी : 

रोपांची लागवड केल्यानंतर ७५ ते ९० दिवसात फळे तोडणीस तयार होतात. वाहतुकीचे साधन आणि बाजारपेठेत अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी विविध अवस्थेत करता येते.  यामध्ये मुख्यत्वे हिरवी पक्व अवस्था, गुलाबी अवस्था, पक्व अवस्था तसेच पूर्ण पक्व अवस्था यांचा समावेश होतो.

उत्पादन :

टोमॅटोचे सरासरी हेक्टरी उत्पादन २५ ते ३० टन मिळते, तर धनश्री या जातीचे उत्पादन ५० ते ५५ टन तर फुले राजा या जातीचे उत्पादन ५५ ते ६० टन उत्पादन मिळते.

 

 

 

 

 

Related posts

Shares