Search

टोमॅटो व्यवस्थापन

टोमॅटो व्यवस्थापन
[Total: 13    Average: 3.3/5]

जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात गेलात तरी टोमॅटो हि फळभाजी न खाणारा माणूस भेटणे तसे कठीणच. टोमॅटो युरोप मार्गे भारतात आला असावा असे म्हटले जाते. इंडियन, कॉन्टिनेन्टल, चायनीज, जॅपनीज, लेबनीज, थाई, इटालियन कोणत्याही पक्वान्नांमध्ये टोमॅटोचा सर्रास वापर केला जातो. याशिवाय वेगवेगळे सँडविचेस, सूप्स, सॅलेड्स यांचा टोमॅटो अविभाज्य भाग आहे. टोमॅटो मध्ये ‘क’, ‘अ’ तसेच ‘ब’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत. याशिवाय टोमॅटो मध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. यामुळेच टोमॅटोला वर्षभर मागणी असते. यामुळेच लागवड करताना टोमॅटो व्यव्थापन  कसे करावे हे जाणून घेऊया.

हवामान :

टोमॅटोच्या पिकाला उष्ण हवामान मानवते. सरासरी १५ ते ३५ अंश सें. ग्रे. तापमान टोमॅटो साठी पोषक ठरते. तापमान १३ अंश सें. ग्रे च्या खाली गेल्यास किंवा ३८ अंश सें. ग्रे.हून अधिक असल्यास याचा फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. फळांना लाल आकर्षक रंग येण्यासाठी २४ अंश ते २६ अंश सें. ग्रे.तापमान फारच अनुकूल मानले जाते.

वाढीची अवस्था                                          पोषक तापमान (अंश सें. ग्रे.)

 

बी उगवण्यासाठी                                                 २६ ते ३२

रोपांच्या वाढीसाठी                                               २३ ते २६

फुले येण्यासाठी                                                    १३ ते १४

परागकणांच्या वाढीसाठी                                      २० ते २७

फळधारणा                                                           १८ ते २०

फळ पिकविण्यासाठी                                            २४ ते २६

जमीन :

टोमॅटोचे पीक हलक्या रेताड जमिनीपासून ते माध्यम काळया, पोयट्याच्या किंवा भारी जमिनीतही येऊ शकते. पण उत्तम निचरा असलेल्या काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत टोमॅटोचे पीक उत्तम येते. हलक्या जमिनीत पीक लवकर येते तर भारी जमिनीत पीक उशिरा आले तरी उत्पन्न भरपूर प्रमाणात मिळते. टोमॅटो लागवडीसाठी जमिनीचा सामू साधारण ६ ते ७ दरम्यान असावा.

लागवड :

लागवडीसाठी जमीन उभी – आडवी नांगरून कुळवून ढेकळे फोडावीत. हेक्टरी ४० ते ५० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर सरी वरंबे तयार करून ९० x ३० सें. मी. अंतरावर लागवड करावी. खरीप हंगामासाठी जून किंवा जुलै मध्ये बी पेरावे. हिवाळी हंगामासाठी सप्टेंबर – ऑक्टोबर तर उन्हाळी हंगामासाठी डिसेम्बर – जानेवारीत बियांची पेरणी करावी.

एक हेक्टर लागवडीसाठी साधारण ४०० ग्रॅम बी लागते. जर संकरित बियाणे वापरले तर १५० ग्रॅम बियाणे लागते. बियांची पेरणी पावसाळी हंगामात गादीवाफ्यावर, हिवाळी व उन्हाळी हंगामात सपाट वाफ्यावर करावी. ३ – ४ आठवड्यांनी रोपांची उंची १२ ते १५ सें. मी. झाल्यावर रोपांचे स्थलांतर करावे.

खत व्यवस्थापन :

जमीन भुसभुशीत केल्यानंतर संतुलित खतांचा पुरवठा करावा. टोमॅटो पिकाला हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद  आणि १०० किलो पालाश द्यावे. नत्रयुक्त खते हप्त्यात विभागून देणे उपयुक्त ठरते. पहिला हप्ता स्फुरद आणि पालाश खतांबरोबरच लागवडीआधी द्यावा, तर नत्राचा दुसरा हप्ता ३ समान हप्त्यात २० दिवसाच्या अंतराने झाडाभोवती बांगडी पद्धतीने द्यावा.

संकरित टोमॅटोसाठी हेक्टरी ३०० किलो नत्र १५० किलो स्फुरद आणि १५० किलो पालाश द्यावे. १५० किलो नत्र व स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा लागवडीसाठी वाफे तयार करताना किंवा सऱ्या बांधताना ७.५ ते १० सें. मी. खोलीवर द्यावी. राहिलेले १५० किलो नत्र लागवडीनंतर ३ समान हप्त्यात २० दिवसाच्या अंतराने झाडाभोवती बांधणी पद्धतीने द्यावे.

पुढील भागात आपण पाणी नियोजन, संजीवकांचा वापर, आंतरमशागत, आधार देणे, वळण देणे तसेच काढणी आणि उत्पादन यासारख्या नियोजनातील महत्वपूर्ण गोष्टींचा आढावा घेऊया.

Related posts

Shares