Search

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन- भाग २

शेडनेट मधील ढोबळी मिरची उत्पादन- भाग २

मागील भागात आपण शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवड कशी करावी; या बाबत माहिती घेतली. या भागात पिकाची आंतरमशागत, किड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, उत्पादन व अर्थशास्त्र याविषयी जाणुन घेऊया.

आंतरमशागत:

ढोबळी मिरची

 • झाडाला आकार येण्यासाठी छाटणी करणे आवश्‍यक असते, त्यासाठी सहा पाने झाडावरती ठेवून लागवडीनंतर 21 दिवसांनी झाडांची छाटणी करावी.
आधार देणे:
 • लागवडीनंतर फांद्यांना नायलॉन/प्लॅस्टिकच्या (जाडसर) दोरीने बांधून जमिनीस समांतर व जमिनीपासून तीन मीटर उंचीवर लावलेल्या लोखंडी तारांना या दोऱ्या टांगाव्या.
 • वरच्या लोखंडी तारा मजबूत (12 गेजच्या) असाव्यात,
 • एका गादीवाफ्यावरील दोन ओळींच्या वरती तीन लोखंडी तारा बांधव्या व एका झाडाला चार प्लॅस्टिक दोऱ्या बांधाव्या.
खत व्यवस्थापन:
 • माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले शेणखत, तसेच माती परीक्षण अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार 150 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश पिकाला द्यावे.
 • संबंधित खतमात्रा संदर्भासाठी दिली आहे. संपूर्ण पालाश, स्फुरद आणि शेणखत, तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी.
 • उर्वरित अर्धे नत्र लागवडीनंतर एक महिना व पन्नास दिवसांच्या अंतराने दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे.
 • मिश्रखतांचा वापर केल्यास फायदा अधिक होतो.
 • पीकवाढीच्या अवस्थेत योग्य वेळी पाण्यात विरघळणाऱ्या खतांची फवारणी करावी.
 • मातीचे मातीपरीक्षण केल्यानंतर कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास त्याचा पुरवठा अनुक्रमे मायक्रोसॉल कॅल्शिअम आणि मायक्रोसॉल-मॅग्नेशिअम ठिबक सिंचनद्वारा पाण्याबरोबर 25 ते 40 ग्रॅम प्रति घनमीटर पाणी या प्रमाणात द्यावे किंवा
 • फवारणीद्वारे 250 ते 500 ग्रॅम/500 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन 7 ते 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा द्यावे.
किडी व रोग व्यवस्थापन:

१. फुलकिडे (थ्रिप्स) व पांढरी माशी (व्हाईट फ्लाय)

ढोबळी मिरची

ढोबळी मिरची

 • हे किडे अतिशय लहान आकारचे असुन रंग फिकट पिवळा असतो.
 • पाने खरवडून त्यातून बाहेर येणा-या रसाचे शोषण करतात.
 • त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात.
 • हे किटक खोडातील रसही शोषतात, त्यामुळे खोड कमजोर बनते,पाने गळतात आणि झाड सुकते.
 • याशिवाय फुलकिड्यामुळे बोकडया (चुरडामुरडा) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.

उपाय –

 • या किडीच्या बंदोबस्तासाठी रोपलावणीपासून ३ आठवड्यांनी पिकावर १५ दिवसांच्या अंतराने ८ मि.मी. डायमेथोएट १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा
 • रोप लागवडीनंतर १० दिवसांनी मोनोक्रोटोफॉस १५ मि.ली. १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
 • पांढरी माशी साठी प्रेाफेनोफॉस (५०.इसी) १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणे.

२. कोळी (माईटस)

 • ही किड अतिशय लहान असून किडीचा रंग पिवळसर करडा असतो.
 • कोळी पानातील रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांवर चुरडा दिसू लागतो.
 • फुले गळतात. फळे वेडीवाकडी होतात आणि फळांच्या आकार लहान राहतो.

उपाय –

 • कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी २० ग्रँम पाण्यात मिसळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडांवर फवारणी करावी.

३. मावा

ढोबळी मिरची

 • हे किटक ढोबळी मिरची च्या कोवळ्या पानांतील आणि शेंड्यातील रस शोषण करतात.

उपाय –

 • ढोबळी मिरची च्या लागवडीनंतर १० दिवसांनी १५ मि.ली. मोनोक्रोटोफॉस १० लिटर पाण्यात मिसळून त्याची रोपांवर फवारणी करावी.

 

महत्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण:

१. रोपांची मर (डँम्पींग ऑफ)

ढोबळी मिरची

 • हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो, लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात.
 • रोपाचा जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि त्यामुळे रोप कोलमडते.रोप उपटल्यावर सहज वर येते.
  उपाय –
 • या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ३० ग्रँम कॉपर ऑक्सीक्लोराईड (५०टक्के) मिसळून हे द्रावण गादीवाफे किंवा रोपांच्या मुळाभोवती ओतावे.

२.  फळे कुजणे आणि फांद्या वाळणे – (फ्रुट रॉट अँड डायबँक)

ढोबळी मिरची

 • या रोगाच्या प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात आणि फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात.
 • बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात.
 • रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात.
  उपाय –
 • या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांच्या नाश करावा.
 • तसेच झायरम किंवा डायथेन एम – ४५ किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध २५ ते ३० ग्रँम १० लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारावे.

३. भुरी (पावडरी मिल्ड्यू)

ढोबळी मिरची

 • भुरी रोगामुळे ढोबळी मिरची च्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते. या रोगाच्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.

उपाय –

 • भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ३० ग्रँम पाण्यात मिसळणारे गंधक किंवा १० मि.ली. कँराथेन १० लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

४. चुरडा मुरडा (लिफ कर्ल)

ढोबळी मिरची

 • हा विषाणुजन्य रेाग असुन याचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा व कोळी रस शोषक किडीमुळे होतो.
 • चुरडा मुरडा रोगाची लक्षणे पाने पुर्णपणे आकुंचन पावणे व पुर्ण गुच्छ होणे, शेंडे निस्तेज होणे, झाड रोगग्रस्त होणे ही आहेत.

उपाय –

 • युरिया या नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळणे. फक्त वाढीचे अवस्थेत युरिया खत १-२ वेळा देणे.
 • फुले व मिरची अवस्थेत अजिबात युरिया देऊ नये.
 • युरिया ऐवजी १०:२६:२६, १२:३२:१६, १४:३५:१४, १५:१५:१५, १९:१९:१९ ही संयुक्त खते वापरणे अथवा ०:४२:३४, ००:००:५० ही विद्राव्य खते फवारणीद्वारे फुले व मिरची लागणीचे अवस्थेमध्ये द्यावीत.
 • पिवळे स्टीकी ट्रॅप, तेलकट युक्त कागद इ. एकरी ४-५ लावणे त्यामुळे फुलकिडे, पांढरी माशी इ. त्याला चिटकूण नियंत्रण होते.
 • चुरडा मुरडाचे एकूण नियंत्रणासाठी मँन्कोझेब २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम प्राफेनाफॉस १० मिली हे १० लिटर पाण्यातुन फवारावे.
 • तसेच विषाणुजन्य रोगाचे नियंत्रणासाठी डायथेन एम-४५ हे २५ ग्रॅम किँवा बाविस्टीन १० ग्रॅम किँवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
 • या औषधांच्या फवारण्या चार ते पाच वेळा आलटुन पालटुन कराव्यात.
काढणी व उत्पादन:
 • तोडणीस तयार झालेल्या ढोबळी मिरची च्या रंगजातीनुसार जाती हिरवा, पिवळा, लाल, भगवा, जांभळा रंग झाल्यावर (85 ते 90 टक्के) तोडणी करावी. हिरव्या रंगाच्या जातीमध्ये फळांचा रंग गर्द हिरवा असताना काढणी करावी.
 • फळे तोडण्यासाठी तीक्ष्ण चाकूचा वापर करावा.
 • फळांची काढणी झाल्यावर फळांचे वर्गीकरण रंग व आकारमानानुसार करावे.
 • फळे झाडावरून देठासहीत काढावीत.
 • साधारणपणे दर 8 दिवसांनी फळांची काढणी करावी.

ढोबळी मिरची

शेडनेट मधिल ढोबळी मिरचीचे अर्थशास्त्र:
 • खुल्या शेतात/वातावरणात लागवड केल्यास ढोबळी मिरची एकरी २५ टन पर्यंत उत्पादन मिळते. हेच उत्पादन शेडनेटमध्ये घेतल्यास एकरी 40 ते 45 टनांपर्यंत उत्पादन मिळु शकते.
 • भांडवलाचा विचार करता खुल्या शेतात लागवड केल्यास एकरी स्थिर भांडवल १ लाख व खेळते भांडवल १.५ लाख रुपये असा एकुण २.५ लाख खर्च येतो. तरी सरासरी किंमतीचा विचार केल्यास प्रति किलोस किमान २० रुपये प्रमाणे एकरी ५ लाखांपर्यंत उत्पादन मिळु शकते. म्हणजेच निव्वळ नफा २.५ लाख रुपये
 • याऊलट शेडनेट मध्ये लागवड केल्यास एकरी स्थिर भांडवल २.५ लाख व खेळते भांडवल १.५ लाख रुपये असा एकुण ४ लाख खर्च येतो. तरी सरासरी किंमतीचा विचार केल्यास प्रति किलोस किमान २० रुपये प्रमाणे एकरी ८ लाखांपर्यंत उत्पादन मिळु शकते म्हणजेच निव्वळ नफा ४ लाख रुपये

Related posts

Shares