तण नियंत्रण पद्धती आणि दक्षता

तण नियंत्रण पद्धती आणि दक्षता
[Total: 65    Average: 2.6/5]

शेतीत कीटक व रोगांव्यतिरिक्त तणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विविध पिकांच्या सुरवातीच्या वाढीचा कालावधी पीक तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनक्षम असतो. या कालावधीत तणनियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. एकात्मीक पद्धतीतून तणनियंत्रण प्रभावीपणे करता येते.

निवारणात्मक उपाय

अ) मशागतीय/ पीकनियोजन पद्धत –

यामध्ये योग्य मशागत, वेळेवर व योग्य खोली व अंतरावर पेरणी करणे, खतांची योग्य मात्रा योग्य पद्धतीने देणे, हेक्‍टरी योग्य रोपांची संख्या राखणे, नेमके पाणीव्यवस्थापन व निचरा पद्धतीचा वापर करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, कीड व रोगनियंत्रण यांचा समावेश होतो.

ब) कायिक/ यांत्रिक पद्धत –

यामध्ये मानवी, पशुधन किंवा यांत्रिक शक्तीचा वापर करून तणांना शेतातून काढून टाकतात किंवा नष्ट करतात. उदा. यात खुरपणी, कोळपणी यांचा प्रामुख्याने समावेश होतो;तसेच खंदणी, तण उपटणे, छाटणी, जाळणे इत्यादींचाही त्यात समावेश होतो.

क) जीव जिवाणूंचा वापर –

कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही तणनियंत्रण करता येते. उदा. गाजरगवताचे नियंत्रण मेक्‍सिकन भुंगे वापरून करता येते किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा गवत घेऊन त्याच्या वाढीवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येते.

ड) रासायनिक पद्धत –

यामध्ये तणांना समूळ नष्ट करणारी निवडक व बिननिवडक रासायनिक द्रव्ये म्हणजेच तणनाशकांचा वापर करून तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते.

तणनाशके वापरताना घ्यावयाची दक्षता

  1. विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत अचूकपणे वापरावीत.
  2. मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत. तणनाशके खरेदी करताना याची काळजी घ्यावी.
  3. तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा नॅपसॅक पंप वापरावा.
  4. तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
  5. तणनाशके ही नेहमी जोराचे वारे नसताना;तसेच फवारल्यानंतर दोन–तीन तास स्वच्छ सूर्यप्रकाश राहील आणि पाऊस न येण्याची शक्‍यता पाहूनच फवारावीत.
  6. फवारा जमिनीवर मारताना फवारा मारणाऱ्याने मागे मागे सरकत जावे जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडत नाहीत.
  7. ग्लायफोसेटसारखे बिनानिवडक तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 21 दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.
Shares