Search

नियोजन चारा पिकांचे…

नियोजन चारा पिकांचे…

सध्या अनियमित पावसामुळे पुढील काळात जनावरांसाठी सकस हिरव्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सध्याच्या पावसावर जनावरांच्या संख्येनुसार काही क्षेत्रावर संकरित नेपिअर, मका, ज्वारी, स्टायलो यासारख्या चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करावे.
संकरित नेपिअर


fodder

बहुवार्षिक, भरपूर उत्पादन देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. पाण्याची सोय असल्यास उन्हाळी हंगामासाठी या पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करावी. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकाचे चांगले उत्पादन मिळते.

संकरित नेपिअर या चाऱ्यामध्ये आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात. या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत (आर.बी.एन. – 13) हे सुधारित वाण आहेत. यशवंत वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपूर फुटवे; मऊ, लांब व रुंद पाने आणि त्यावर अल्प प्रमाणात लव ही आहेत. याचबरोबरीने फुले जयवंत हा नवीन सुधारित वाण यशवंत वाणापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त उत्पादन देतो. यामध्ये ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण देखील यशवंत गवतापेक्षा कमी आहे, म्हणून हा वाण जनावरांच्या चाऱ्यासाठी फायदेशीर आहे.

या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची चांगली वाढ होते. संकरित नेपिअर गवत बहुवार्षिक व भरपूर उत्पादन देणारे असल्याने शेत तणविरहित ठेवावे. लागवडीपूर्वी उभ्या – आडव्या नांगरटी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी सात ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऑगस्ट महिन्यापर्यंत या गवताची लागवड करता येते. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. सरासरी दोन ठोंबांतील अंतर 90 x 60 सें.मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र द्यावे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्याने तणांचा उपद्रव होतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी. गवताच्या भरपूर उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कापणी व उत्पादन –

या गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सात ते आठ आठवड्यांनी कराव्यात. म्हणजे सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारे वर्षभरात सात कापण्या घेता येतात. कापण्या वेळेत करणे आवश्‍यक आहे, अन्यथा चारा जाड व टणक होऊन पौष्टिकतेचे प्रमाण कमी होऊन, चारा कमी मिळतो. शिफारशीप्रमाणे उत्तम व्यवस्थापन केल्यास प्रति वर्षी आठ ते नऊ कापण्यांद्वारे 2500 ते 3000 क्विंटल चारा एक हेक्‍टरपासून मिळू शकतो.

चाऱ्यासाठी मका

fodder1

 

मका लागवडीसाठी भारी ते मध्यम, काळी, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. जमीन खोलवर नांगरून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन पुरेसे शेणखत मिसळावे. पेरणी जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद – 2, विजय यांसारख्या जातींची निवड करावी. हेक्‍टरी 75 किलो बियाणे लागते. बियाण्याची पेरणी पाभरीच्या साह्याने करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. नंतर 30 दिवसांनी 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करावी. पाण्याचा ताण पडला तर 10-15 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कापणी पीक 50-60 टक्के फुलोऱ्यात आल्यावर करावी. या पिकापासून हेक्‍टरी 600 क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो.

ज्वारी –
लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या द्याव्यात. पेरणी जुलैअखेरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी एम.पी. चारी, निळवा, रुचिरा, पुसा चारी, फुले अमृता या जातींची निवड करावी. पेरणी तिफणीच्या साह्याने करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 40 किलो बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. पिकाची पहिली कापणी पीक फुलोऱ्यात आल्यावर किंवा पेरणीनंतर 65-70 दिवसांनी करावी. पहिल्या कापणीत हेक्‍टरी 500 क्विंटल चारा उत्पादन मिळू शकते; मात्र पीक फुलोऱ्यात येण्याअगोदर जनावरास खाऊ घालू नये. ज्वारी पिकाचा मूरघास तयार करता येतो.

स्टायलो –
या पिकासाठी निचरा होणारी, मुरमाड, डोंगराळ जमीन चालते. याची पेरणी जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी फुले क्रांती या जातीची निवड करावी. लागवडीसाठी 30 सें.मी अंतरावर काकऱ्या पाडून बी टाकावे. हेक्‍टरी दहा किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धन लावावे. पेरणीपूर्वी हेक्‍टरी 32 किलो स्फुरद द्यावे. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात 48 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. पहिली कापणी 75 ते 80 दिवसांनी किंवा पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी करावी. नंतर 50-60 दिवसांनी कापण्या कराव्यात. वर्षाकाठी दोन कापण्यांपासून हेक्‍टरी 250 क्विंटल चारा मिळू शकतो.

एकाच चाऱ्याचा अतिवापर टाळा…

पशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारा पिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्यांचा उपयोग चारा म्हणून करतात. उसाच्या वाढ्यांत 0.5 ते 1.5 टक्के प्रथिने, ———05 टक्के स्निग्ध पदार्थ व 9.0 टक्के काष्ठमय तंतू असतात. वरील पोषणमूल्यांचा विचार करता वाळलेल्या एकदल चाऱ्यापेक्षा उसाच्या वाढ्यांमध्ये पोषणमूल्ये कमी असतात. उसाच्या हिरव्या वाढ्यांत हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्‍झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. वाढे मोठ्या प्रमाणात खाऊ घातल्यामुळे ऑक्‍झलेटचा शरीरातील कॅल्शिअमशी संयोग होऊन कॅल्शिअम ऑक्‍झलेट तयार होते आणि ते लघवीवाटे बाहेर पडते, त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मूत्राशयावर अनिष्ट परिणाम होतो; तसेच गर्भपात, हाडे ठिसूळ होणे, जनावर माजावर न येणे व उत्पादन कमी होणे, तसेच वासरे कमकुवत होणे इ. अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जनावरांना आठ ते दहा किलो वाढे व त्याबरोबर सकस हिरवा द्विदल चारा दहा किलो यांचे मिश्रण करून द्यावे, त्याचबरोबर एक ते दीड किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम क्षार खनिजे द्यावीत.

Related posts

Shares