Search

पावसाला विलंब झाल्यास “कांदा पिकांचे” व्यवस्थापन कसे करावे…

पावसाला विलंब झाल्यास “कांदा पिकांचे” व्यवस्थापन कसे करावे…

भारतीय हवामान विभागाद्वारे या वर्षी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरिपातील कांदा पीक (२० टक्के क्षेत्र) जिरायती स्वरूपाचे असून, प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व राजस्थानच्या काही भागांमध्ये घेतले जाते. रब्बी कांदा (६० टक्के क्षेत्र) व रांगडा कांदा (२० टक्के क्षेत्र) ही बागायती पिके म्हणून घेतली जातात. त्यामुळे कमी पावसाची शक्यतेचा खरिपातील कांदा पिकावर परीणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर यांच्यातर्फे कांदा पिकाचे विविध अवस्थांमध्ये कांदा पिकाचे व्यवस्थापन योग्य रीतीने कसे करावे, यासाठी सल्ला प्रसारित केला आहे.

क) पावसाळ्याकरिता १५ दिवस विलंब झाल्यास – download
कांदा पिकाची जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये पुनर्लागवड केली जाऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीचा खरीप कांद्यावर फारसा प्रभाव पडत नाही. पावसामध्ये रोपवाटिका तयार करणे कठीण ठरते. उलट पाऊस उशिरा आल्यास रोपवाटिका तयार करणे सोपे होते.
१) व्यापक अनुकूल क्षमतेच्या जाती (खरीप तसेच रांगडा हंगामातील उपयुक्त) भीमा सुपर, भीमा राज, भीमा रेड, भीमा शुभ्रा, ॲग्री फाउंड डार्क रेड, अर्का कल्याण, अर्का प्रगती, बसवंत ७८० आणि फुले समर्थ यांची लागवड केली जाऊ शकते.
२) जूनच्या दुसऱ्या आठवड्यात उंच गादीवाऱ्यांवर रोपवाटिका तयार करता येईल. त्यामुळे ३५ ते ५० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करता येईल.
३) गादीवाफ्यावर रोपे वाढविण्याकरिता ठिबक अथवा सूक्ष्म-तुषार सिंचन प्रणालीचा वापर करावा.
४) रोपवाटिकेत किमान तीन ते चार पाण्याच्या पाळ्या देणे आवश्यक आहे.
५) रोपांचे आंशिक शेडनेटद्वारे संरक्षण करावे.
६) बाष्पीभवन टाळण्याकरिता बियाण्यांची उगवण होईपर्यंत ओले गवत (भात पेंढा) वापरावे.
७) विघटित सेंद्रिय खत अर्धा टन प्रति १००० वर्ग मीटर या प्रमाणात द्यावे.
८) रोपांची वाढ चांगल्याप्रकारे न झाल्यास, पाण्यात विरघळणाऱ्या (विद्राव्य) नत्र, स्फुरद, पालाश खतांची (उदाहरणार्थ १९ः१९ः१९ नत्रःस्फुरदःपालाश, ५ ग्रॅम प्रति लिटर) पानांवर फवारणी करावी.

ख) पावसाळ्याकरिता ३० दिवस विलंब झाल्यास – 
१) वर उल्लेख केलेल्या पद्धतींचे अनुसरण करावे.
२) अन्य पर्याय म्हणजे ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीसोबत उंच गादीवाऱ्यांवर थेट पेरणी (बियाणे दर ८-९ किलो प्रति हेक्टर प्रमाणे) करावी. या पद्धतीमध्ये पुनर्लागवड पद्धतीपेक्षा १ महिना लवकर कांदा पीक परिपक्व होते.
३) छोट्या आकाराचे कांदे (कंदिका) उपलब्ध असल्यास, त्यांचा उपयोग खरीप पिकाकरिता करावा. त्यामुळे रोपांच्या पुनर्लागण पद्धतीपेक्षा ४५ दिवस अगोदर कंद पक्व होतील.
onion1
ग) वाढीच्या अवस्थेत पावसाची कमतरता – 
मातीच्या प्रकारानुसार सक्रिय वानस्पतिक वाढीच्या अवस्थेत तीन ते चार पाण्याच्या पाळ्या देणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी पिकांच्या अवस्था माहीत करून घ्याव्यात.
– स्थापना अवस्था (पेरणीनंतर १०-२० दिवस),
– सक्रिय वानस्पतिक वृद्धी काळ (पेरणीनंतर ३०-४० दिवस)
– कंद तयार होण्याच्या सुरवातीचा काळ (पेरणीनंतर ४०-४५ दिवस).

वानस्पतिक वाढीच्या काळात पावसाची कमतरता झाल्यास, खालील उपाययोजना कराव्यात.
१) ठिबक सिंचनासह उंच गादीवाफ्यांवर पिकाची लागवड करावी.
२) पावसाळ्याचे पाणी साठवण्यासाठी शेततळे तयार करून, त्या पाण्याचा तीन ते चार संरक्षित सिंचनासाठी वापर करावा.
३) बाष्पोत्सर्जनामुळे पिकातून बाहेर पडणारे पाणी रोखण्यासाठी केओलिन ५० मि.लि प्रति लिटर——–प्रमाण खात्री करणे—– प्रमाणात फवारावे.
४) बाष्पीभवन कमी करण्यासाठी जमिनीचा पृष्ठभाग भात किंवा गव्हाच्या वाळलेल्या गवताने किंवा चाऱ्याने झाकावा.
५) रोपांची वाढ चांगल्या प्रकारे न झाल्यास, विद्राव्य नत्र, स्फुरद, पालाश खतांची (उदाहरणार्थ १९ः१९ः१९ नत्र ः स्फुरद ः पालाश, ५ ग्रॅम प्रति लि.) पानांवर फवारणी घ्यावी.
६) सक्रिय वानस्पतिक वृद्धी काळात रोपे त्वरित ठीक होण्याकरिता गंधक (८५ टक्के डब्ल्यू.पी.) १.५ ते २ ग्रॅम प्रति लिटर या दराने पानांवर वापरावे.
७) पीक उत्तमरीतीने उभे राहण्यासाठी, झिंक, मॅगेनीज, लोह, तांबे, बोरॉन या सूक्ष्म मूलद्रव्यांचे मिश्रण ५ मि.लि. प्रतिलिटर पुनर्लागवडीनंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी पानांवर फवारावे.
८) चांगले कुजलेले २० टन शेणखत प्रति हेक्टर किंवा अन्य सेंद्रिय खते पुनर्लागवडीच्या १५-३० दिवस अगोदर द्यावे.
९) कोरड्या हंगामात फुलकिड्यांची संख्या आर्थिक आरंभ पातळी (३० फुलकिडे प्रति रोपपर्यंत) वाढू शकते. अशावेळी प्रोफेनोफॉस १ मि.ली.प्रति लिटर किंवा कार्बोसल्फान २ मि.ली.प्रति लिटर किंवा फिप्रोनील १.५ मि.लि.प्रति लिटर या प्रमाणे फवारावे.
घ) अंतिम स्थितीमध्ये अवर्षण –
पुनर्लागणीच्या ८५ दिवसांनंतर एक सिंचन पुरेसे आहे. ते साठविलेल्या पावसाचे पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरून दिले जाऊ शकते.

टीप – वरील उपाययोजनाचा वापर पाण्याची कमतरता असल्यास, रांगडा व रब्बी कांदा पिकांसाठीसुद्धा वापरता येते.

 

संदर्भ :- अग्रोवन

 

Related posts

Shares