Search

फायदेशीर बटाटा लागवड – भाग 1

फायदेशीर बटाटा लागवड – भाग 1
[Total: 34    Average: 2.8/5]

बटाटा आपल्या नेहमीच्या जेवणातील एक महत्वाचा घटक. गहू, तांदूळ आणि मक्यानंतर बटाटा हे जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे खाद्यान्न असून जगातील १३० देशात बटाट्याचे उत्पादन होते. बटाटा उत्पादनात भारताचा पाचवा क्रमांक लागतो. बटाटा हे विकसित तथा विकसनशील देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असे प्रमुख पीक आहे.

बटाटा हे पीक प्रामुख्याने उत्तर भारतात थंड हवामानाच्या ठिकाणी घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात लागवड केली जाते. खरीपातील उत्पादनाच्या मानाने रब्बी हंगामातील बटाटा उत्पादन अधिक येते. याचे प्रमुख कारण म्हणजे खरीप हंगामातील लागवड पावसावर अवलंबून असते. बहुतेक वेळा लागवड उशिरा होते. त्यामुळे उगवण कमी होते. रब्बी हंगामात मात्र बटाटा लागवड करून पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पिकाची जोमदार वाढ होते. तसेच थंडीमुळे पिकाची वाढ चांगली होते व उत्पादन अधिक येते. पावसाळी बटाट्याच्या तुलनेत रब्बी हंगामातील बटाटा निर्धोक असून त्यापासून अधिक उत्पादन हमखास मिळते.

म्हणूनच बटाट्याची लागवड कधी आणि कशी करण्यात येते हे महत्वाचे ठरते.  बटाटा लागवडी संदर्भातील काही महत्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकूया.

जमीन

 • बटाट्याचे पीक घेण्यासाठी मध्यम प्रतीची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन अधिक  चांगली असते.
 • बटाट्यासाठी  चिकण वा पाणथळ जमिनीची निवड करू नये. कारण या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असते.
 • जर बटाटा लागवड केलेली जमीन पाणथळ असेल तर लागवड केलेला बटाटा किंवा बटाट्याचे बियाणे लागवडीनंतर ताबडतोब कुजणे किंवा सडण्याची शक्यता असते.
 • याचा परिणाम उत्पादनावर होतो बटाट्याची उगवण अतिशय कमी होऊन, झाडांची हेक्टरी संख्या कमी मिळते, पर्यायाने उत्पादन घटते.

पूर्वमशागत

 • खरिप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर जमिनीची उभी-आडवी नांगरणी करावी.
 • यानंतर,  काही दिवस जमीन उन्हात तापल्यानंतर कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन, ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
 • शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर हेक्टरी २५ ते ३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे किंवा खरिपातील हिरवळीचे खत म्हणून ताग किंवा धैंचा जमिनीत गाडणे, रब्बी बटाट्याचे अधिक उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने फारच फायद्याचे आढळले आले.
 • सोयाबीन, मूग, उडीद किंवा बाजरी या पिकानंतर बटाट्याचे पीक घेतल्यास उत्पादन चांगले मिळून जमिनीचा पोत कायम टिकून राहतो.

बटाटा बेणे

 • कोणतेही पीक घेताना बियाणाचा दर्जा अत्यंत महत्वाचा असतो. बटाटा बेणे हे कीड व रोगमुक्त असावे.
 • बेणे बटाटे पूर्ण वाढलेले व त्यावर अंकुर फुगलेले, ठेंगणे, जाड व चांगले पोसलेले कोंब असावेत.
 • लागवडीसाठी वापरावयाचे बटाटे बेणे हे २५ ते ३०  ग्रॅम वजनाचे, पाच सें.मी. व्यासाचे, संपूर्ण (न कापलेले) साधारणतः अंड्याच्या आकाराचे असावे. बटाटे कापून फोडी करताना विळा व तेथील जागा जंतू विरहित करावी.
 • त्यासाठी विळा/ चाकू मॅन्कोझेबच्या ०.२ टक्का द्रावणात बुडवून वापरावा.
 • कापलेल्या फोडी कमीत कमी १० ते १२तास सावलीत सुकवून घ्याव्यात व नंतरच लागवडीस वापराव्यात.
 • एक हेक्टकरसाठी १५-२० क्विंटल बेणे लागते.

हवामान व हंगाम

 • बटाटा हे पीक राज्यात रब्बी हंगामात अधिक उत्पादन देते असे संशोधनावरून दिसून आले आहे. पीक वाढीच्या काळात दिवसाचे सरासरी तापमान २१ अंश से.पेक्षा कमी असावे.
 • बटाटा पोसण्यास २० अंश से. तापमान आदर्श असते. जमिनीत योग्य ओलावा व पोषक अन्नघटक असावे.
 • जमिनीचे तापमान १७ ते २० अंश से. असल्यास बटाटे चांगले पोसतात. यापेक्षा जास्त तापमान पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम करते. त्यामुळे उत्पादन कमी मिळते.
 • रब्बी हंगामात १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान लागवड करावी. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीचा बटाटे पोसण्यास चांगला उपयोग होतो व अधिक उत्पादन मिळते.
 • १५  नोव्हेंबर नंतर बटाटा लागवड केल्यास पीकवाढीच्या काळात तापमान वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिमाण होतो.

बटाटा लागवडीचे अजूनही महत्वाचे पैलू आहेत. बटाटा लागवड, खत नियोजन, पाणी नियोजन, काढणी आणि काढणी पश्चात विविध प्रक्रिया उद्योग अशा विविध पैलूंवर पुढील भागात प्रकाशझोत टाकूया.

बटाटा लागवड – भाग 2

Related posts

Shares