Search

फायदेशीर बटाटा लागवड – भाग 2

फायदेशीर बटाटा लागवड – भाग 2
[Total: 9    Average: 2.4/5]

बटाटा हा कंदवर्गीय भाजीपाला म्हणून ओळखला जातो. आपल्या दररोजच्या आहारात प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर केला जातो.  बटाट्यापासून बनविले जाणारे विविध पदार्थ आपण चवीने खाल्ले असतीलच. बटाटा आणि त्यापासून बनविले जाणारे विविध पदार्थ… नावं घेऊन तोंड दुखेल पण पदार्थांची नावे संपणार नाहीत. बटाट्यामध्ये जीवनसत्त्व ‘ब’ आणि ‘ क’ भरपूर प्रमाणात असते. तसेच पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याविषयीच्या मागील भागात आपण बटाटा लागवडीसाठी जमीन कशी असावी? जमिनीची पूर्व मशागत कशी करावी? बटाट्याचे बेणे कसे निवडावे? कोणते हवामान आणि हंगाम बटाट्याच्या पिकासाठी पोषक आहे? अशा विविध महत्वपूर्ण पैलूंबाबत माहिती घेतली. आणि आता बटाट्याच्या या दुसऱ्या भागात आपण लागवड पद्धतीपासून विविध गोष्टी कश्या कराव्यात हे जाणून घेऊया.

बटाट्याची लागवड कशी करावी?

बटाटा लागवडीसाठी फक्त प्रमाणित व निरोगी बियाणे वापरावे. खरीप हंगामातील बटाटा ताबडतोब रब्बी हंगामातील लागवडीसाठी वापरू नये, कारण जवळ जवळ तीन महिने बटाटा सुप्त अवस्थेत असतो. शीतगृहातून बटाटे बाहेर काढल्यानंतर त्याची लगेच लागवड न करता कमीत कमी ७ ते २० दिवस सावलीत विरळ पसरून ठेवावेत. या कालावधीत बटाट्यांना मोड येणे गरजेचे आहे. मोड न आलेले किंवा अधिक सुकलेले बटाटे लागवडीस वापरू नयेत.

खतांचे नियोजन कसे करावे?

उत्पादन कोणतेही असो खतांचा चपखल पण मर्यादित वापर होणे गरजेचे आहे. अधिक उत्पादन मिळण्यासाठी संतुलित खतांचा वापर करावा. खतांचा वापर करण्याआधी जमिनीचा पोत लक्षात घ्यावा. यासाठी मृदा परीक्षण केल्यास नक्किच फायदा होऊ शकतो. पिकास माती परीक्षणानुसार १५० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, १२०  किलो पालाश प्रति हेक्टरी खतांची मात्रा द्यावी. यापैकी नत्राची १०० किलो मात्रा, संपूर्ण स्फुरद व पालाश लावणीच्या वेळी द्यावा व उरलेली नत्राची ५० किलो मात्रा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर प्रति हेक्टरी द्यावी किंवा सुफला १५:१५:१५ द्वारे वरील खताची मात्रा द्यावयाची झाल्यास लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी सुफला (१५:१५:१५) च्या आठ बॅगा तसेच युरिया व म्युरेट ऑफ पोटॅशच्या दोन बॅगा द्याव्यात व लागवडीनंतर एक महिन्याने युरियाच्या दोन बॅगा द्याव्यात. खते दिल्यानंतर पिकास लगेच पाणी द्यावे. रासायनिक खते बटाट्यावर पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी अन्यथा बटाटे सडू शकतात. त्यासाठी रासायनिक खते जमिनीत पेरून दिल्यास फायदेशीर ठरते. आंतरमशागत कशी करावी ?

अशाप्रकारे आंतरमशागतीत खुरपणी, खांदणी किंवा वरंब्यास माती लावणे इत्यादींचा अंतर्भाव होतो. बटाटा सूर्यप्रकाशात आल्यास ताबडतोब हिरवा होतो. वरंब्यास भरपूर माती लावली असता बटाटे हिरवे होत नाहीत. लागवडीपासून एक महिन्याच्या आत तणनियंत्रणासाठी एक ते दोन खुरपण्या देऊन शेत स्वच्छ ठेवावे किंवा तणनियंत्रणासाठी तणनाशकाचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने वापर करावा.

पाणी व्यवस्थापन कसे करावे?

बटाट्याची एकूण पाण्याची गरज ५० ते ६० सेंमी आहे. खरीपातील बटाट्याला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. तर रब्बी हंगामातील लागवड जमीन ओलावून वाफश्यावर केली असल्यास पहिले पाणी १० ते १५ दिवसांनी द्यावे. रब्बी हंगामामध्ये ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. बटाट्याला एकूण ९ ते १० पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. बटाटे काढणीपूर्वी १० ते १२ दिवस पाणी तोडावे.

काढणी कशी करावी?

साधारणपणे बटाटे ९० ते १०० दिवसांत काढणीस तयार होतात. मात्र बटाटा काढणीचे एक तंत्र आहे. काढणीपूर्वी बटाट्याची झाडे जमिनीलगत कापून घ्यावीत आणि त्यानंतर ५ – ६ दिवसांनी बटाट्याची काढणी करावी. त्यामुळे बटाट्याची साल निघत नाही व वाहतुकीत बटाटा चांगला राहतो. बटाटा काढणीसाठी लाकडी नांगराचाही वापर करून मजुरांकडून तो वेचून घेतात. यानंतर, वेचलेले बटाटे स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठवावेत. जर लगेचच बटाटे बाजारात पाठविणे शक्य नसेल तर बटाटे शितगृहात साठवावेत. काही शेतकरी, शितगृहाची सोय नसल्यास आरणीमध्ये देखील बटाट्याची साठवण करता येते.

चांगले उत्पादन कसे घ्यावे?

उत्तम नियोजन असेल तर कमी गुंतवणूक आणि कमी जागेतही बटाट्याचे पीक घेऊन चांगला फायदा मिळू शकतो. साधारणपणे एक एकरामध्ये  एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. म्हणूनच, बटाट्याची शेती फ्याद्याची ठरू शकते.

उत्पादन घेतल्यानंतर प्रक्रिया उद्योग कोणते?

बटाट्याचे अधिक उत्पादन झाल्यास बटाट्यापासून निरनिराळे प्रक्रिया पदार्थ तयार करून विकणे फायद्याचे ठरते. बटाट्याचे वेफर्स. पापड, चिप्स, कीस, चिवडा, चकली, असे एकापेक्षा एक पदार्थ तयार केले जातात.

एकुणच काय बटाट्याचे अनेक पदार्थ बनविले जातात. आणि या पदार्थांना चांगली मागणी देखील आहे. म्हणूनच, बटाट्याचे उत्पादन निश्चितपणे फायद्याचे ठरू शकते.

Related posts

Shares