Search

बायोगॅस संयंत्र कसे उभारावे ?

बायोगॅस संयंत्र कसे उभारावे ?

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असताना यावर आता शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना बायोगॅस हाच एक सशक्त पर्याय उपलब्ध आहे. सध्या पुरवठा होत असलेला घरगुती गॅस सिलिंडर हा मोठ्या प्रमाणावर अनुदान देऊन स्वस्त केलेला आहे, अर्थात हे अनुदान म्हणजे आपल्याच खिशातील पैसे फक्त वेगळ्या मार्गाने काढून घेतलेले असतात.

बायोगॅस बांधून ते जर शौचालयाला जोडले, तर अधिक प्रमाणात घरगुती इंधन सहज उपलब्ध होतेच पण जी स्लरी बाहेर पडते ती बागायतीसाठी उत्तम खत म्हणून वापरली जाऊ शकते. बायोगॅसच्या वापराने अन्न शिजवणे, दिवे लावणे, द्विइंधनीय जनरेटर, रेफ्रिजरेटर, वेल्डिंग इत्यादींसाठी होऊ शकते.

जागेची निवड :

 • बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी.
 • जागा शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असावी.
 • जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी.
 • निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसावा.

बायोगॅसच्या बांधणीचे नियोजन :

 • आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवावे व बांधकाम करावे.
 • केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बायोगॅस मॉडेलचेच बांधकाम करावे.
 • स्थानिक जमीन व हवामानाचा प्रकार विचारात घेऊन त्याच्या बांधकामाचे नियोजन करावे.
 • बांधकामावरून तरंगती गॅस टाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र असे दोन बायोगॅसचे प्रकार पडतात.
 • ज्या भागात मुरूम व तांबूस मातीचा प्रकार आहे, त्या ठिकाणी स्थिर घुमट संयंत्र प्रकारचे बांधकाम करावे.
 • ज्या ठिकाणी काळी माती अगर पाण्यामुळे जमीन फुगणारी आहे अशा ठिकाणी फेरोसिमेंट, प्री-फॅब्रिकेटेड फेरोसिमेंट या प्रकारचे बायोगॅस बांधावेत.

biogas
bio

बायोगॅसचे भांडवल नियोजन:

 • ग्रामीण भागात बायोगॅस बांधकाम केल्यास केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय मंत्रालयामार्फत अनुदान दिले जाते.
 • बांधकामासाठी लाभार्थीची आर्थिक कुवत नसेल तर त्यासाठी राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांकडून कर्जपुरवठा केला जातो.मिळणारी अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या कर्जखाती जमा केली जाते.
 • याशिवाय बायोगॅसचा स्वयंपाकाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर केल्यास (उदा. – इतर ऊर्जा साधनांचा वापर कमी करून डिझेल बचत करणे, जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर केल्यास) प्रति संयंत्रास 5000 रुपये अनुदान देण्यात येते.
 • आपल्याला ज्या प्रकारचा बायोगॅस बांधायचा आहे, त्याप्रमाणे त्याचा खर्च लक्षात घ्यावा लागेल.
 • बायोगॅस योजनेतील अद्ययावत माहितीसाठी आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता
 • बांधकामाचा खर्च संयंत्राच्या आकारावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा संयंत्र बांधण्याचा खर्च 40-45 हजार रुपये येऊ शकतो.
 • तरंगती टाकीचे बायोगॅस (फ्लोरिंग डोम) संयंत्राला येणारा खर्चही त्याच्या आकारमानावर अवलंबून आहे. दोन घनमीटर क्षमतेचा खादी ग्रामोद्योग प्रकारच्या संयंत्रासाठी अंदाजित साधारणपणे 45-50 हजार रुपये खर्च होतो.
अ.क्र. घटक संयंत्राचे आकारमान केंद्र शासनाकडून प्राप्त होणारे होणारे अनुदान
(प्रति संयंत्रास)
1 सर्वसाधारण लाभार्थी अनुदान 1 घ.मी. रू. 4000/-
2. सर्वसाधारण लाभार्थी अनुदान 2 ते 4 घ.मी. रू. 8000/-
3. बायोगॅस संयंत्र शौचालयास जोडल्यास लाभार्थ्यांना द्यावयाचे अनुदान 1 ते 4 घ.मी. रू. 1000/-
4. टर्न की फी (5 वर्षाच्या हमी कालावधीतील देखभाल दुरुस्तीसाठी) 1 ते 4 घ.मी. रू. 1500/-
5. सेवाशुल्क 1 ते 4 घ.मी. रू. 100/-

संदर्भ : http://www.mahapanchayat.gov.in

बायोगॅस संयंत्राचे भाग-

बायोगॅस संयंत्राच्या भागामध्ये प्रथम भाग डायजेस्टर (सडविणारा भाग) व दुसरा भाग गॅस होल्डर किंवा डोम (गॅससंकलक) असतो. तसेच मिश्रणाकरिता इनलेट (प्रवेशद्वार) व आऊटलेट द्वार स्लरी बाहेर पडण्यासाठी आणि गॅस पाइपलाइन हे चार पूरक भाग असतात.

डायजेस्टर (सडविणारा भाग)

 • डायजेस्टरची जोडणी जमिनीखाली करतात. डायजेस्टरची निर्मिती विटा आणि सिमेंटने बांधणी करून दंड गोलाकार आकाराची असते.
 • डायजेस्टरची खोली व आकार बायोगॅस संयंत्राच्या क्षमतेवर अवलंबून असतो.

गॅस होल्डर

 • गॅस होल्डरमध्ये डायजेस्टरमधून बाहेर पडणारा वायू (गॅस) साठविला जातो.
 • स्थिर किंवा डोम प्रकाराचा गॅस होल्डर विटा आणि सिमेंटने बांधणी करून तयार करतात, तर तरंगता ड्रम प्रकारामध्ये सिलेंडर आकाराचा गॅस होल्डर लोखंडी पत्र्यापासून तयार करतात.
 • या गॅस होल्डरच्या वरील भागामधून गॅस कॉकची पाइपलाइनशी जोडणी करून घरातील गॅस बर्नरशी जोडतात.

मिश्रण टॅंक किंवा प्रवेश द्वार

 • या टाकीत शेण व पाण्याचे 1-1 प्रमाणात मिश्रण करून ते एका इनलेट पाइपमार्फत डायजेस्टरमध्ये सोडले जाते.

आऊटलेट किंवा निकास द्वार

 • डायजेस्टरमधून टाकण्यात आलेली स्लरीचे मिश्रण आऊटलेट किंवा निकासद्वारा मधून बाहेर येते.

स्लरी साठवण्याचा खड्डा

 • आऊटलेटमधून बाहेर पडलेली स्लरी या खड्ड्यांमध्ये साठविली जाते. ही स्लरी एकतर वाळवतात किंवा थेट शेतात पसरवतात. या जैविक खतामध्ये दोन पट नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश आणि पोषक तत्त्व असतात.

गॅस पाइपलाइन

 • गॅस पाइपलाइनद्वारा चुली/ बर्नरपर्यंत पोचविला जातो.

बायोगॅस संयंत्राची कार्यपद्धती-

सेंद्रिय पदार्थाचे जिवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात.

 • यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो.
 • बायोमास गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो.
 • बायोमास गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.
 • बायोगॅस वायूमध्ये मिथेन 55 ते 70 टक्के, कार्बन-डाय- ऑक्‍साईड 30 ते 40 टक्के अल्प प्रमाणात नायट्रोजन व हायड्रोजन सल्फाईड या वायूंचा समावेश असतो.
 • यातील मिथेन हा वायू ज्वलनशील आहे. कोणत्याही प्रकारचे टाकाऊ पदार्थ, जे कुजतात त्यांच्यापासून बायोगॅस तयार होतो. उदा. शेण, घरातील खरकटे अन्न, निरुपयोगी भाजीपाला, पशुविष्ठा, मानवी विष्ठा, इ. पदार्थांचे मिश्रण पाण्याबरोबर करून बायोगॅस संयंत्राच्या प्रवेश कक्षामध्ये पाचक यंत्रामध्ये सोडण्यात येते.
 • पाचक यंत्रामध्ये कालांतराने कार्यक्षम जिवाणू तयार होतात व ऍसिटिक ऍसिड तयार होऊन पाच विभिन्न प्रकारचे जिवाणू तयार होऊन मिथेन व कार्बन-डाय- ऑक्साईड हे वायू तयार होतात.
 • बायोगॅस संयंत्राची रचना करताना त्यामध्ये हवाबंद, बंदिस्त पोकळी तयार करावी लागते. त्या पोकळीत सेंद्रिय पदार्थ टाकण्याची सोय करावी लागते, तसेच सेंद्रिय पदार्थांपासून तयार होणारा गॅस व खत बाहेर येण्याची व साठविण्याची सोय करावी लागते.

बायोगॅससाठी आवश्यक बाबी :

 • कच्च्या मालाची उपलब्धता-कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरच बायोगॅस संयंत्राचा आकार ठरवता येतो.
 • साधारणपणे दर रोज 10 किलो शेण मिळेल असे मानले तर ताज्या शेणापासून सुमारे 40 लिटर/किलो वायू मिळू शकतो.
 • म्हणजेच 3 घनमीटर बायोगॅस तयार करण्यासाठी सुमारे 75 किलो शेण लागेल (3/0.04). म्‍हणून, गरजेपुरते शेण मिळवण्यासाठी किमान 4 गुरांची गरज असते.

बायोगॅस स्लरीचे खत

biogas inside

 • बायोगॅसपासून मिळणारे खत हे द्रवरूप आणि घनरूपात (वाळवून) अशा दोन प्रकारे वापरता येते.
 • स्लरीरूपात खत शेतात वापरल्यास खत शेतामध्ये मुरून पिकास उपयुक्त ठरते.
  गॅसप्लॅंटजवळ खत साठविण्यासाठी खड्डा तयार करावा.
 • खत साठविण्यासाठी आऊटलेटला लागून (रेचक कुंडी) दोन खड्डे करावे लागतील.
 • एक खड्डा भरल्यानंतर दुसऱ्या खड्ड्यात स्लरी सोडावी. खत वाळल्यानंतर ते हंगामानुसार शेतात वापरावे.

संदर्भ :

 • १. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
 • २. ॲग्रोवन
 • ३. महापंचायत.

Related posts

Shares