Search

बीज परीक्षण

बीज परीक्षण
[Total: 9    Average: 3.3/5]

मॉन्सून आता कोणत्याही क्षणी बरसेल. शेतकरी बांधवांची कमला सुरुवात झाली आहे. नियोजनाअंतर्गत शेतकरी बांधवांनी पिकाची निवड केल्यानंतर पेरणीपूर्वी बीज परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. कारण बियाणांची उगवण क्षमता जर उत्तम असेल त्याचा सकारात्मक परिणाम उत्पन्नावर होणार आहे. बियाणांची उगवण क्षमता कशी तपासून घ्यावी या बाबत सविस्तर जाणून घेऊया.

बियाणांची उगवणक्षमता तपासून घेणे का गरजेचे आहे?

उत्पन्न भरघोस येण्यासाठी केवळ हवामानावरच अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. पेराल तसं  उगवेल या म्हणी प्रमाणे बियाणे उत्तम व दर्जेदार असेल तर उत्पादित पिकाचा दर्जा हि उत्तमच असेल. व त्यामुळे अशा उत्पादनास बाजारभावही उत्तम मिळेल यात शंकाच नाही. म्हणूनच आपण पिक घेण्यापूर्वी बियाणांची उगवणक्षमता तपासून घेणे गरजेचे आहे.

बियाणांची उगवणक्षमता कशाप्रकारे तपासावी?

  • खरेदी केलेल्या बियाण्यांपैकी काही भाग म्हणजे साधारण ४०० ते ५०० बी नमुना म्हणून घेऊ शकतो.
  • निश्चित केलेले बी कोणत्याही प्रक्रियेतून गेलेली नसावी  तसेच ती शुद्ध बियाण्यांच्या समूहाचा भाग असावी.
  • संबंधित बियाण्यांचा नमुना प्रयोगशाळेत गेल्यानंतर उगवण  कक्ष अर्थांत जर्मिनेटर या उपकरणाच्या मदतीने बियाणाची उगवणक्षमता तपासली जाऊ शकते.
  • बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरला जातो. ज्याला टॉवेल पेपर म्हटले जाते. या टॉवेल पेपरमध्ये असलेल्या ओलाव्यामुळे बियाणाची उगवण आणि वाढ होण्यास मदत होते.

उगवण क्षमता किती पद्धतीने तपासता येऊ शकते?

१. शोषकागादाच्या मदतीने उगवणक्षमता तपासणी :-

या पद्धती अंतर्गत लहान आकाराच्या बियाणांची उगवणक्षमता तपासली जाते. यामध्ये काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोषकागद ठेवून तो पाण्याच्या मदतीने ओला करावा. जास्त पाणी झाल्यास निथळून घ्यावे. यामध्ये बी ठेवून ही प्लेट उगवण कक्ष म्हणजेच जर्मिनेटर मध्ये ठेवावी. जर कक्षामध्ये आर्द्रता उच्चदर्जाची असेल तर उगवण होण्यास मदत होऊ शकते.

२. टॉवेल पेपरच्या मदतीने उगवणक्षमता  तपासणी :-

उगवणक्षमता चाचणीसाठी वापरण्यात येणारा विशेष कागद म्हणजेच दोन टॉवेल  पेपर घ्यावेत. या कागदामध्ये बी मोजून ठेवावेत आणि कागदाची गोल गुंडाळी करून घ्यावी. मेणकागदामध्ये ३/४ भाग गुंडाळून आवश्यक असणाऱ्या तपामान आणि आर्द्रता असलेल्या जर्मिनेटर मध्ये ठेवावेत.

३. वाळूमध्ये उगवणक्षमता तपासणी :-

आपल्याकडे असणाऱ्या कुंडी  आणि ट्रे मध्ये ओली वाळू घेऊन एक ते दोन से. मी. खोलीवर समान अंतरावर मोजून बी ठेवावी. अशा कुंड्या किंवा ट्रे जर्मिनेटर मध्ये ठेवल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसांमध्ये बियाणांची उगवण होऊ शकते .

राज्यसरकारतर्फे पुणे, परभणी आणि नागपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या तीन केन्द्रांमध्ये आपण बियाणांची शुद्धता, कीटकांमुळे झालेला दुष्परिणाम, बियाणांची उगवणक्षमता तसच बियाणांच्या वंशिकतेबाबत  माहिती मिळू शकते. आपण या तीन केंद्रांमध्ये बियाण्यांचा नमुना सादर केल्यानंतर आपल्याला तीस दिवसांच्या  आत परिक्षणाचा  अहवाल मिळू शकतो आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे ही तपासणी आपण माफक दरात करू शकतो. यंदा पेरणीआधी बियाणांचं परिक्षण  करायला विसरू नका.

तुमचा मोबाईल नंबर शेयर करा आणि तुमच्या गावाजवळील बीज परीक्षण केंद्रांची माहिती मिळवा!

 

Related posts

Shares