Search

मका लागवड

मका लागवड
[Total: 53    Average: 2.9/5]

 

रब्बीचा हंगाम म्हणजे हिवाळा…या थंडीच्या मोसमात रब्बीचे मक्याचे पिक कसे घ्यावं? हे जाणून घेणे गरजेचे आहे. रब्बीतील मक्याच्या पिकासाठी मध्यम ते भारी प्रतीची सुपीक, पाण्याचा निचरा असणारी जमीन निवडणे गरजेचे आहे. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे ती जमीन लागवडीसाठी योग्य होय. साधारणपणे पाहायला गेल्यास जमिनीचा सामू ६.५  ते ७.५ दरम्यान असावा. मक्याचे पीक  हे वैविध्य असलेल्या हवामानातही घेतले जाते. म्हणूनच, समुद्रसपाटीपासून ते २७०० मीटर उंची पर्यंतच्या ठिकाणीदेखील मक्याची लागवड करता येते, परंतु धुक्‍याचे हवामान मक्याच्या पिकासाठीबाधक ठरू शकते.

मक्यासाठी योग्य तापमान कोणते?

 • रब्बीच्या हंगामात वातावरणात गारवा असतो त्यामुळे तापमानात घट होत असते. परंतु, मक्याच्या पिकासाठी सर्वसाधारण १८ ते २० अंश से. तापमान फलदायी ठरू शकते.
 • रब्बी हंगामात रात्रीचे तापमान सौम्य असल्यामुळे प्रकाश, श्‍वसनक्रियेचा वेग कमी होऊन तयार झालेल्या अन्नपदार्थांचा ऱ्हास कमी होतो.
 • तसेच पानांची लांबी, रुंदी, रचना आणि ७-८ तास असलेल्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया जलद व अधिक होते,त्यामुळे पिकाचा कालावधी वाढून उत्पादनात वाढ होते.

पाण्याचे व्यवस्थापन किती महत्वाचे?

 • रब्बीचा हंगाम हा तसा कमी आद्रता असलेला म्हणता येईल.कारण थंडी मुळे रात्रीच्या वेळी दव पडते.
 • रब्बी हंगामातील सौम्य तापमान आणि कमी आर्द्रता यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव व नुकसान फारच कमी होते.
 • जमीन व पाणी व्यवस्थापन,तसेच रोग व किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव यामुळे रब्बी हंगामात हेक्‍टरी रोप संख्या योग्य प्रमाणात ठेवता येते.
 • जर तणांवर  योग्य पद्धतीने नियंत्रण मिळवले तर वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांची परिणामकारकता वाढते.

krushi-expertsm

नांगरणी कशी करावी?

 • मक्याची शेती करताना जेवढी जमीन खोल नांगरली जाईल तेवढी मका उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
 • म्हणून जमिनीची खोल नांगरट (१५ ते २० सें.मी.) करणे आवश्‍यक आहे.
 • कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
 • तसेच शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी प्रति हेक्‍टरी १० ते १२ टन (२५ ते ३० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे.

पेरणी कधी करावी?

 • कोणतेही उत्पादन घेताना बियाणाची पेरणी कधी करावी हे महत्वाचे असते.
 • पेरणीची वेळ ही एक उत्पन्नावर परिणाम करणारी अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
 • रब्बी हंगामात मक्‍याची पेरणी साधारणत:१५ ऑक्‍टोबर ते दहा नोव्हेंबर या करणे उचित ठरते.
 • पेरणीचा कालावधी लांबला तर त्याचा उगवणीवर व पीकवाढीवर प्रतिकूल परिणाम होतो.

पेरणी कशी करावी?

 • रब्बी हंगामामध्ये मक्‍याची पेरणी ६० सें.मी.अंतरावर काढलेल्या सरीच्या बगलेत निम्म्या उंचीवर एकाच बाजूला १८ ते २० सें.मी.अंतरावर दोन बिया चार-पाच सें.मी. खोल टोकण करून करावी.
 • जर पेरणी सरीच्या दक्षिण बाजूस केली तर सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने उगवण चांगली होऊन पिकांची वाढ जोमात होते.
 • पेरणी करताना जर अशा प्रकारे नियोजन केले तर प्रति हेक्‍टरी साधारण ९०,००० रोपसंख्या मिळते व परिणामी उत्पादन अधिक मिळते.
 • अशाप्रकारे जर पेरणी करायची असेल तर प्रति हेक्‍टरसाठी २०किलोग्रॅम बियाणे लागते.

रोग नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी?

 • पेरणीपूर्वी दोन ते अडीच ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलोग्रॅम बियाण्यास चोळल्यास करपा रोगाचे नियंत्रण होते.
 • तसेच ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धन १५ ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाण्यास चोळल्यास उत्पादनामध्ये पाच टक्के वाढ होते.

खतांचा वापर कसा करावा?

 • पेरणी करताना रासायनिक खातानाचा वापर केला जातो.
 • पेरणीच्या वेळी रासायनिक खते पाच ते सात सें.मी.खोलीवर आणि जमिनीत चांगली मिसळून घ्यावीत.
 • एकदा का पिकाने जोम धरला कि मग उभ्या पिकांत नत्र खतमात्रा (युरिया) १०-१२ सें.मी. ओळीपासून दूर वळीमधून द्यावे आणि लगेचच पाणी द्यावे.
 • जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारण १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • मका उगवणीनंतर दहा दिवसांनी विरळणी करून,एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेवावे.

असा हा तयार झालेला मका वेगवेगळ्या पद्धतीने खायला सगळ्यांनाच आवडतो. मका जवढा दर्जेदार तेवढाच चवीला उत्तम. मात्र, असा चविष्ठ मका खाताना शेतकऱ्याची मेहनत लक्षात घ्या.
तुम्हाला जर मका लागवडीबाबत काही इतर माहिती हवी असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा.
संपर्क – ७७१९९५२३३३

Related posts

Shares