Search

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि कृषीविषयक योजना

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि कृषीविषयक योजना

महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन आता ५५ वर्षे लोटली आहेत. आज महाराष्ट्र एक आघाडीचं राज्य म्हणून ओळखलं जातं. या कालावधीत महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले. महाराष्ट्राच्या विकासासाठी या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना राबविल्या. कृषी क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरु केलेल्या योजनांबाबत जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेतली. नियोजनबद्ध आणि कल्पक योजना आखत आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीस हातभार लावला. सी. डी. देशमुख म्हणजेच चिंतामणराव देशमुख यांना अर्थमंत्री करून योजनाबद्ध नियोजन केले. यशवंतराव चव्हाण यांनी सर्व प्रथम सहकार क्षेत्रात चळवळ उभी केली. तब्बल १८ सहकारी कारखाने सुरु केले. तसेच, सहकार बाजार, सहकारी दुध योजना, सहकारी बँका, एवढच नाही तर शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या बी बियाणांचे सहकाराच्या माध्यमातून वितरण करत त्यांनी अवघ्या महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणले. राज्यपातळीवर पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी केली. बेरोजगार शेतकऱ्यांना काम मिळावे यासाठी पाऊलं उचलत त्यांनी रोजगार हमी योजनेला सुरुवात केली. आपल्या कार्यकाळात यशवंतराव चव्हाण यांनी उद्योग व शेती या दोघांना ही प्राधान्य दिले. आदिवासी विकासावर भर, शिक्षण, आरोग्य सेवा, कोयना-उज्जैनी धरण प्रकल्प, कोयना वीज प्रकल्प, पाट बंधारे योजना अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरु केल्या आणि यशस्वीरीत्या राबविल्या. म्हणूनच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे जनक  म्हणणे क्रमप्राप्त आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळानंतर मारोतराव कन्नमवार यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारला आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार लक्षात घेऊन कापूस एकाधिकार योजना सुरु केली. यानंतर वसंतराव नाईक यांनी तब्बल १२ वर्षे मुख्यमंत्री म्हणून कार्यभाग सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी कापूस, ज्वारी, तांदूळ यांसह अनेक पिकांची सरकारमार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा मिळवून देता येईल यावर भर दिला. याबरोबरच शेतकऱ्यांना जनावर खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं आणि शेतकी विद्यापीठांची स्थापना केली. यानंतर पदभार स्वीकारलेल्या शंकरराव चव्हाण यांनी धरणं आणि पाट बंधारे योजनांवर भर देत शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी कसे उपलब्ध करून देत येईल यावर लक्ष केंद्रित केले. वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात योगदान देत सहकारी साखर कारखान्यांची सुरुवात केली आणि विनानुदानित शिक्षण संस्थांची स्थापना केली.

शरद पवार यांना ४ वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. आपल्या कार्यकाळात त्यांनी कापूस एकाधिकार योजनेत परिणामकारक बदल करत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले. याबरोबरच शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानांच्या विकासावर भर दिला, शेतीत निर्यातीवर भर देत औद्योगिक विकास करण्यास मदत केली. यानंतर महाराष्ट्रात ६ महिने राष्ट्रपती राजवट होती. ९ जुन १९८० रोजी अंतुले यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेगवान निर्णय घ्यायला सुरुवात केली. त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज सहज उपलब्ध करून दिले. बाबासाहेब भोसले यांनी मुख्यमंत्री असताना गरीब कुटुंबांसाठी विविध योजना सुरु केल्या तसेच कोळी बांधवांसाठी विमा योजना सुरु केली. ३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६ या आपल्या कार्यकाळात शिवाजीराव निलंगेकर यांनी मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देत पिकांसाठी विमा योजना सुरु केली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वीज कशी देत येईल यावर भर दिला. दरम्यानच्या काळात शंकरराव चव्हाण आणि सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. मार्च १९९५ ते मार्च १९९९ दरम्यान, महाराष्ट्रात युती सत्तेत आली. शिवसेना भाजप युतीचा मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या नंतर मुख्यमंत्री झालेल्या नारायण राणे यांनी शेतकऱ्यांसाठी बळीराजा विमा योजना सुरु केली. जकात कर रद्द केला आणि सर्व जिल्ह्यांना इंटरनेटने जोडले. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजनेचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यानंतर मुख्यमंत्री झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात ही कृषी क्षेत्रासाठी विविध योजना राबविण्यावर भर दिला गेला.

आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कालावधी नंतर सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा युती सरकार आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय सेवा जलद व्हाव्यात यासाठी अनेक महत्वाची पाऊलं उचलली आहेत. महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि कृषी क्षेत्राला त्याचा फायदा व्हावा यासाठी ते इस्त्राईल दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी इस्त्राईलचे माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विनंती केली. पेरेज फाउंडेशन तज्ञांनी महाराष्ट्राला भेट द्यावी, मुख्यत्त्वे करून यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं असे  मुख्यमंत्र्यांनी सुचवले होते. यावर पेरेज यांच्याकडून लवकरच त्यांच्या तज्ञांच मंडळ महाराष्ट्रात येण्याचा खुलासा करण्यात आला आहे. ही तज्ञ मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर अशा विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करणार आहे. इस्त्राईलप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी देखील सधन होऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील कृषी व्यवसाय संपन्न होऊ शकतो, असा विश्वास शिमोन पेरेज यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच आशादायी गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी व्यवसायाच्या प्रगतीसाठी अशीच आवश्यक पाऊलं उचलतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. असं झाल्यास शेतकरी चिंतामुक्त होईल आणि महाराष्ट्रातील शेतीला खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येतील.

Related posts

Shares