Search

भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये- भाग १

भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये- भाग १

भाजीपाला पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना आवश्यकतेनुसार पोषक अन्नद्रव्ये पुरविणे अत्यंत आवश्यक आहे. अन्नद्रव्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्यास पीक उत्पादनांवर त्यांचा अनिष्ट परिणाम होतो. म्हणून सर्व पोषक अन्नद्रव्ये सर्व पिकांना समतोल प्रमाणात देणे आवश्यक आहे. यामुळे पिकानुसार लागणारी पोषक अन्नद्रव्ये त्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची दुष्परिणाम या सर्वांची माहिती असणे आवश्यक आहे. “भाजीपाला पिके आणि अन्नद्रव्ये” या लेखाच्या पहिल्या भागात आपण मूळ आणि मुख्य अन्नद्रव्ये यांबाबत माहिती घेऊया.
पिकांच्या वाढीसाठी खालील १६ अन्नद्रव्ये अवश्य असतात.

अन्नद्रव्यांचे प्रकार:

 • मूळ अन्नद्रव्ये– कार्बन, हायड्रोजन,ऑक्सिजन
 • मुख्य अन्नद्रव्ये– नत्र, स्फुरद, पालाश.
 • दुय्यम अन्नद्रव्ये-चुना, गंधक, मॅग्नेशियम.
 • सूक्ष्म अन्नद्रव्ये– लोह, मँगनीज, बोरॉन, तांबे, जस्त, क्लोरीन, मॅलीब्डेनम.

या अन्नद्रव्यांपैकी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हि तीन मूळ अन्नद्रव्ये हवा आणि पाण्यामधून पिकांना नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात म्हणून हि अन्नद्रव्ये पिकांना खतामधून देण्याची गरज नसते.

मुख्य अन्नद्रव्यांचे महत्व:

नत्र:

 • सगळ्याच पिकांना नत्राची जास्त प्रमाणात आवश्यकता असते.
 • पिकांच्या वाढीसाठी नत्राचा योग्य पुरवठा होणे अत्यावश्यक आहे.
 • वनस्पतीच्या शरीरातील प्रथिने आणि पानातील द्रव्यांचा नंतर हा महत्वाचा घटक आहे.
 • नत्रामुळे वनस्पतीची पाने हिरवी होतात, पानांची आणि पिकाची वाढ जोमाने होण्यास मदत होते.
 • नत्रामुळे पिकांतील प्रथिनांचे प्रमाण वाढते.
 • नत्राच्या पुरवठ्यामुळे स्फुरद, पालाश आणि इतर अन्नद्रव्ये जमिनीतून जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.
 • मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त नत्र पुरवठा झाल्यास पिकांची अनावश्यक वाढ होऊन रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि उत्पादनावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो.
 • एकूणच पाहता पिकाच्या लागवडीपासून ते पूर्ण वाढीपर्यंतच्या काळात नत्राची गरज असते.

स्फुरद:

 • वनस्पतीच्या पेशींच्या वाढीसाठी स्फुरदाची आवश्यकता असते.
 • स्फुरदाची पुरवठ्यामुळे रोपांना लवकर मुळे फुटतात आणि त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
 • स्फुरदामुळे वनस्पतीची मुळे सशक्त व मजबूत होतात त्यामुळे पीक जमिनीवर लोळत नाही.
 • द्विदल वनस्पतिंमध्युए स्फुरदमुळे मुळांची अन्नद्रव्य शोषण करण्याची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे नत्राचे स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंची चांगली वाढ होते.
 • म्हंणजेच हवेतील नत्र शोषण करण्यास स्फुरद मदत करते.
 • लागवडीपासून फुले येईपर्यन्तच्या काळातच स्फुरदाची गरज असते, म्हणून स्फुरदाची मात्र पिकांची लागवड करताना देतात.

पालाश:

 • पालाश या अन्नद्रव्यांमुळे पिकांची वाढ जोमदारपणे होऊन पिकामध्ये काटकपणा येतो.
 • पालाश या अन्नद्रव्यामुळे पिकांच्या पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पिकाच्या शरीरातील पाणी कमी होण्याचे प्रमाण कमी करता येते.
 • यामुळे वनस्पतीच्या शरीरात असलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग केला जातो.
 • आवश्यकतेपेक्षा जास्त नत्राचा पुरवठा केल्यामुळे हणारे अनिष्ट परिणाम पालाशमुळे सौम्य होतात. पालाशमुळे फळांचा आकार, फळांची प्रत आणि साठवणशक्ती वाढते.

पोषक अन्नद्रव्यांच्या कमतरतेचे पिकावरील दुष्परिणाम:

नत्र:

 • नत्राच्या कमतरतेमुळे पिकांची खालची पाने पिवळी पडतात.
 • रोपांची वाढ खुंटते.
 • मूळ, खोड, फांद्या व फळांचा आकार लहान राहतो.

स्फुरद:

 • स्फुरदाच्या कमतरतेमुळे पिकांची पाने, शिरा आणि खोड यांचा रंग जांभळा होतो.
 • बटाट्याची पाने फिकट होऊन कडेने गुंडाळली जातात.
 • पीक उशिरा तयार होतो.
 • स्फुरदाच्या कमतरतेमुळे कांद्याची साठक्षमता कमी होते.

पालाश:

 • पालाशच्या कमतरतेमुळे पिकांची पाने गुंडाळली जातात.
 • पानांच्या कडा वळतात आणि रंग विटकरी होतो.
 • पिकांची वाढ मंदावते.
 • पालाशच्या कमतरतेमुळे टोमॅटोची फळे नरम पडतात.

Related posts

Shares