Search

मेथी लागवड

मेथी लागवड

मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथी ला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात जास्त प्रमाणात केला जातो. मेथीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वे तसेच प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह पुरेशा प्रमाणात असतात. मेथीमध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. मेथी हि पाचक असून यकृत व प्लिहा यांची कार्यक्षमता वाढविते. त्यामुळे पंचक्रियेची कार्यक्षमता वाढते.

हवामान :

मेथी हे थंड हवामानातले पीक असले तरी उष्ण हवामानातही चांगले येते. विशेषतः कस्तुरी मेथीला थंड हवामान मानवते. मेथी चे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते.

जमीन :

गाळाच्या जमिनीत मेथी उत्तम प्रकारे येते. मध्यम ते कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व हमीनीचा सामू ६ ते ७ च्या दरम्यान असलेली जमीन मेथीला जास्त मानवते.

सुधारित जाती :

१. कस्तुरी

२. पुसा अर्ली बंचिंग

३. आर. एम. टी – १

४. मेथी नं. ४७

लागवड :

लागवडीसाठी ३ x २ मीटर आकाराचे सपाट वाफे करून बी फोकून किंवा २० ते २५ सेंमी अंतरावर आळीतून पेरावे. हेक्टरी ३५ ते ४० किलो बी लागते.

खत व्यवस्थापन :

हेक्टरी १० ते १२ बैलगाड्या शेणखत ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावा. लागवडीनंतर ४० किलो नत्र प्रति हेक्टर द्यावे. पेरण्याचा वेळी १० किलो बियाणास २५० ग्राम रायझोबियम चोळल्यास उत्पादनात वाढ होते.

पाणी नियोजन :

पावसाळ्यात गरजेप्रमाणे पाणी द्यावे. पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी व उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे.

आंतरमशागत :

आवश्यकतेनुसार पिकातील तण काढून शेत तणमुक्त ठेवावे. मेथीवर १ टक्के युरियाची फवारणी केल्यास पिकाची वाढ चांगली होते.

काढणी :

बी पेरल्यानंतर ३०-४० दिवसात मेथी काढता येते. संपूर्ण रोपटे मुळापासून उपटून काढतात. किंवा जमिनीलगत कापून काढता येते. कंपनीमुळे खोडवा घेता येतो. कस्तुरी मेथीचे जास्त खोडवे घेता येतात. पूर्ण वाढलेली कोवळी मेथी काढावी. काढणीस उशीर झाल्यास पाने कडवट होतात. भाजीच्या जुड्या बांधून विक्रीस पाठवाव्यात.

उत्पादन :

देशी मेथीचे उत्पादन दर हेक्टरी १० ते १२ टन मिळते, कस्तुरी मेथीचे ६ ते ७ क्विंटल बियाणे मिळते.

 

 

Related posts

Shares