Search

मॉन्सून लवकरच अंदमानात दाखल होणार

मॉन्सून  लवकरच अंदमानात दाखल होणार

 

  • भारतीय हवामान खात्याचा अंदाज

 

भर उन्हात आभाळ भरून येते आणि पावसाला सुरुवात होते. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारेच पाऊस पडत आहे. पण, बळीराजा ज्या पावसाची आतुरतेने वात भाघातो आहे तो मान्सूनचा पाऊस आता लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.  देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेले बहुप्रतीक्षित नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशाच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहेत. येत्या सोमवारपर्यंत (ता. 18) अंदमान-निकोबार द्वीपसमूह व लगतच्या भागात मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे. विषुववृत्तीय भागापासून सुरू झालेली मॉन्सूनची समुद्रातील वाटचाल सर्वसाधारण वेळेनुसार सुरू आहे.

 
सर्वसाधारणपणे मॉन्सून 20 मे रोजी अंदमानात दाखल होतो. त्यानंतर पुढील दहा दिवसांत म्हणजेच एक जूनपर्यंत तो श्रीलंका व्यापून केरळात येऊन थडकतो. यंदा तो 18 मेपर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच मॉन्सूनची वाटचाल सर्वसाधारण वेळेत सुरू असून, अनुकूलता कायम राहिल्यास पुढील दहा दिवसांत तो केरळात दाखल होऊ शकतो.

 

लक्षद्वीप व लगतच्या केरळ किनारपट्टीवर समुद्रसपाटीच्या पातळीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रिय झाले असून, त्यांचा विस्तार वाढलेला आहे. याशिवाय दक्षिण अंदमानचा समुद्र व लगतच्या बंगालच्या उपसागराच्या भागातही समुद्रसपाटीच्या पातळीहून 1.5 किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रिय आहेत. यामुळे या भागात पावसाला सुरवात झाली असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे येत्या तीन- चार दिवसांत मॉन्सूनच्या वाटचालीत वेगाने प्रगती होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

 

मॉन्सून दाखल होण्याआधी देशात ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत कर्नाटकचा किनारी भाग, लक्षद्वीप बेटे, तमिळनाडू, अंदमान व निकोबारमध्ये बहुतेक ठिकाणी पाऊस झाला. उत्तर भारत व ईशान्येकडील राज्यांमध्येही अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुण्यात देशात सर्वाधिक 111.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने शुक्रवारी (ता. 15) संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता व्यक्त केली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकणाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. राज्यात उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान वर्धा येथे 42.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

स्त्रोत – अग्रोवन

 

Related posts

Shares