Search

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला
[Total: 14    Average: 3.2/5]

गेल्या आठवड्यात मजल दरमजल करत मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मागील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र, गोवा, केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी ओढे, नदी, नाले ओढे वाहू लागले आहेत. बुधवारी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार तसेच विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय. येत्या शनिवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सेनगाव, किनवर, बिल्लोरी, देगलूर, सिल्लोड तर विदर्भात खराब, सेलू, कळमेश्वर, भामरागड, मुलचेरा, राळेगण येथे मध्यम ते जोरदार पाऊस पडल्याचे वृत्त आहे.

कोकणातील कोयना, खोपोली, डगरवाडी, कोयना, दावडी, ताम्हिणी, लोणावळा, आम्बोणे, शिरगाव, भिरा, वाळवण या घाटमाथ्यवरही मुसळधार पाऊस झाला आहे.

तर पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पानशेत आणि खडकवासला धरणांमध्ये सुमारे २.८७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण १.५५ टीएमसी होते.

धरण परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांत पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे. खडकवासला धरण क्षेत्रात दिवसभरात १९ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत आणि वरसगावमध्ये प्रत्येकी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पवना परिसरात ३४ मिलिमीटर, मुळशीत ६९ मिलिमीटर, भामा आसखेडमध्ये १७ मिलिमीटर पाऊस पडल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

टेमघर आणि वरसगाव या ठिकाणी पाणीसाठा करण्यात येत नसल्याने या ठिकाणी शून्य पाणीसाठा आहे. पानशेत आणि खडकवासला या ठिकाणी सद्यपरिस्थितीत सुमारे २.८७ टीएमसी पाणी आहे. त्यापैकी पानशेतमध्ये २.६१ टीएमसी, तर खडकवासलामध्ये ०.२७ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी या धरणांमध्ये सुमारे १.५५ टीएमसी पाणीसाठा होता.

धरण परिसरात एक जूनपासून आतापर्यंत पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. खडकवासलामध्ये ९९ मिलिमीटर, तर पानशेतमध्ये २४६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांमध्ये दिलासादायक पाणीसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार, तुलसी, तानसा, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अनेक भागात जोरदार पावसामुळे बंधारे, ओढे भरून वाहू लागल्याने काही ठिकाणी शेतीमालाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्राबरोबच मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये मॉन्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. लवकरचं इथे देखील मॉन्सून सक्रिय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Related posts

Shares