Search

सप्टेंबर महिन्यातील शेती कामे

सप्टेंबर महिन्यातील शेती कामे
[Total: 26    Average: 3/5]

सप्टेंबर महिन्यापर्यंत खरिपातील बहुतांश पिकांची लागवड झालेली असते. पावसाचा प्रभाव पिकांवर दिसू लागलेला असतो. अशात जर पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला तर त्याचा ताण पिकांवर होत असतो. हे लक्षात घेता विविध पिकांसाठी सप्टेंबर महिन्यातील शेती कामे कशी करावीत हे जाणून घेणे आवश्यक आहे.

नगदी पिके

सोयाबीन – मावा, तुडतुडे, फुलकिडे, पाने खाणा-या अळ्या यांच्या नियंत्रणासाठी सायपरमेथरीन + क्विनोल्फोस २ मि.ली. फवारणी करावी. पिकाच्या संवेदनाशिल अवस्थेत (फांद्या फुटण्याची, फुले येण्याची व शेंगा भरण्याची) अवस्था पावसाचा ताण पडल्यास संरक्षीत पाणी द्या.

ऊस – लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी आडसाली पिकास खताचा दुसरा हप्ता ६० किलो नत्र प्रती एकर (१०० किलो युरीया प्रती एकर) द्या.उभ्या पिकास आवश्यकतेप्रमाणे वेळेवर पाण्याच्या पाळ्या द्या.पुर्व हंगामी ऊस लागवडीसाठी शिफारशीप्रमाणे पूर्वमशागत करून शेत लागवडी योग्य तयार करा. पुर्वहंगामी ऊस लागवडीसाठी उत्तम प्रतीचे नर्सरीतील रोपे, रासायनिक खते इ.ची व्यवस्था करून ठेवा तसेच शिफारस केलेल्या ( को.९४०१२, को.७४०, को.७२१९, को.८६०३२, को.८०१४, को.एम.८८१२१ ) जातीपैकी एका जातीची निवड करा. ठीबक सिंचन पध्दतीचा उसासाठी वापर करा. लागवड पट्टापध्दतीने करा. लागवडीपुर्वी अझोटोबँक्टर, असेटोबँक्टर, अँझोस्पीरीलम व स्फूरद जीवाणू प्रत्येकी १.२५ किलो १०० लिटर पाण्यात एकत्र मिसळून द्या. द्रावणात बूडवून लागवड करावी.

तृणधान्य पिके

खरीप ज्वारी – पावसाचा ताण पडल्यास उपलब्धतेनुसार पिकाच्या संवेदनशिल वाढीच्या अवस्थेत संरक्षीत पाणी द्या. खरीप ज्वारी पिकावर मीजमाशीच्या प्रादुर्भाव दिसून येताच (५ टक्के कणसे दिसून येताच) क्लोरोपायरीफोस २-३ मि.ली प्रती लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. तसेच त्यानंतर ५ दिवसांनी क्विनॉलफॉस १.५ टक्के भुकटी ८ किलो प्रती एकरी या प्रमाणात धुरळावी. कणसातील अळ्यांच्या नियंत्रणासाठी वर नमूद केलेल्या कोणत्याही एक किडनाशकाचा वापर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येताच करावा. जरूरी भासल्यास एक आठवड्यानंतर दुसरी फवारणी करावी.

खरीप बाजरी – पीक संरक्षण करा.बाजरीचे पीक दाणे भरणेच्या अवस्थेत असताना जमिनीतील ओलावा विचारात घेऊन संरक्षीत पाणी द्या. उशीरा पेरलेल्या बाजरीचे पिकावर निळे भुंगेरे, सोशे या किडीच्या प्रादुर्भाव आढळून आल्यास १.५ टक्के क्विनॉलफॉस भुकटी एकरी ८ किलो या प्रमाणात धुरळावी. तसेंच ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

खरीप मका – पावसाचा ताण पडल्यास उपलब्धतेनुसार पिकाच्या संवेदनशिल वाढीच्या अवस्थेत पाणी द्या. पिकावरील किडीचे (पाने खाणारी अळी. लष्करी इ.च्या) नियंत्रणासाठी १२५० मिली २० टक्के प्रवाही क्लोरोपायरीफॉस ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारणी करावी किंवा ज्वारीच्या मिजमाशीच्या नियंत्रणासाठी वरीलप्रमाणे शिफारस केलेल्या कोणत्याही एका किटकनाशक पावडरीची धुरळणी करावी.

कडधान्य पिके

उडीद, मूग, चवळी इ. – जून महिन्यात पेरलेला उडीद, मूग व चवळी पक्व झाल्यामुळे वेळेवर शेंगाची तोडणी करावी.तोडलेल्या शेंगा खळ्यावर चांगल्या वाळवून मळणी करावी. मळणी करून तयार केलेले मूग, उडीद व चवळी धान्य १२ टक्के आर्द्रतेपर्यत सुर्यप्रकाशात चांगले वाळवून कोरड्या जागी अथवा कणगीत साठवण करावी म्हणजे साठवणीच्या काळात भुंग्यापासून संरक्षण होईल.उडीद. मूग,उडीद व चवळी काढलेले शेत दोन-तीन वेळा वखरणी करून रब्बी पिकासाठी तयार ठेवावे.

तूर – मावा, तुडतुडे, फुलकिडे, पिसारी पतंग, घाटे अळी यांच्या निंयंत्रणासाठी क्विनॉलफॉस १५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. तसेच फेरोमन सापळ्यांचा वापर करा शेंगअळीच्या नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही चा वापर करा. फवारणी शक्य नसेल तर क्विनॉलफॉस १.५ टक्के भुकटी २० किलो प्रती हेक्टरी धरळावी. तूरीवरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही रोगग्रस्त २५० अळ्यांची पहिली फवारणी पीक फुलो-यात असताना व किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच करावी. १५ दिवसांच्या अंतराने इमामेक्टिन बेंझोएट ४ ग्राम किंवा क्विनोलफोस ५०० लिटर पाण्यात मिसळून ३ फवारण्या कराव्यात. तुरीचे पीक ६० दिवसांचे होईपर्यत तणमुक्त ठेवा.

गळीत पिके

सुर्यफूल – आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवा. पाण्याच्या पाळ्या द्या/ संरक्षीत पाणी द्या. घाटे अळी व केसाळ अळ्या पाने कुरतडून खातात व पानाच्या फक्त शिरा राहतात. कीडीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्क अथवा क्विनॉलफॉस २५ इ.सी. १००० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी फवारावे. किडीची अंडी, पुंजके, अळ्या इ. गोळा करून नाश करावा. क्विनॉलफॉस १.५ टक्के भुकटी २५ किलो प्रती हेक्टर या प्रमाणात धुरळावी अथवा एस.ओ.एन.पी.व्ही. विषाणू ५०० एल.ई. ५०० लिटर पाण्यातून प्रतिहेक्टरी फवारावी. करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मँन्कोझेब ७५ टक्के २ ग्रँम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून हेक्टरी ५०० लिटर या प्रमाणात फवारावे.

भुईमूग – पिक तणविरहीत ठेवा.पावसाचा ताण पडल्यास पिकास फुले लागणेच्या, आरे लागणेच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षीत पाणी द्या.भुईमुगावरील टिक्का आणि तांबेरा रोग नियंत्रणासाठी कार्बेडाझीम०.५ टक्के किंवा मँन्कोझेब ०.२५ टक्के पेरणीनंतर ३० दिवसांनी २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.पाने गुडाळणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी या किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क अथवा इमामेक्टिन बेंझोएट ४ ग्राम किंवा सायपरमेथ्रीन २० इ.सी. ४ मिली. प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे. किंवा क्विनॉलफॉस भुकटी २० किलो प्रती हेक्टरी धुरळावी.

कापूस- या पूर्वी सांगितल्या प्रमाणे फुलकिडे,तुडतुडे,पांढरी माशीचे नियंत्रण करा. लाल्या विकृतीपासून बचाव करण्यासाठी या पूर्वी दिलेल्या संदेशाचे अवलोकन करा.

Related posts

Shares