Search

साखर उत्पादनात घट

साखर उत्पादनात घट
[Total: 2    Average: 2.5/5]

राज्यात यंदाच्या हंगामात (2016-17) साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास निम्म्यावर आले आहे. यंदा 41 लाख 86 हजार टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे. गेल्या दशकभरातील हे नीच्चांकी साखर उत्पादन आहे. साखर उत्पादनात घट होण्यामागे सलग दोन वर्षे झालेला दुष्काळ कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय.

यंदाच्या हंगामात 150 साखर कारखान्यांनी एकूण 372 लाख टन उसाचे गाळप केले. गेल्या हंगामात एकूण 743 लाख टन उसाचे गाळप झाले होते. ऊस गाळपात निम्म्याहून अधिक घट झाल्यामुळे साखरेचे उत्पादनही घसरले. गेल्या वर्षी 84 लाख 15 हजार टन साखर उत्पादन झाले होते. यंदा ते निम्म्यावर आले आहे. यंदाच्या हंगामात उसाचा तुटवडा असल्यामुळे 177 साखर कारखान्यांपैकी 27 कारखान्यांचे धुराडे पेटलेच नाहीत.

मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी ऊस संपल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच गाळप बंद केले आहे. पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील कारखाने एप्रिलपर्यंत चालू होते. 9 एप्रिलला शेवटच्या कारखान्याने गळीत हंगामाची सांगता केली.

यंदाच्या हंगामात देशात 203 लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिला आहे. `इस्मा`ने त्यापूर्वी यंदा 213 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज दिला होता.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखरेचे उत्पादन घटल्याचे कारण देत केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने या निर्णयाला विरोध केला आहे. दरम्यान, राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यामुळे बहुतांश साखर कारखान्यांना आयात केलेल्या कच्च्या साखरेवर आता प्रक्रिया करणे शक्य नाही.

संदर्भ – ई  – सकाळ

https://beta1.esakal.com/arthavishwa/sugar-production-be-lower-year-40518

Related posts

Shares