Search

असे वाढवा सुर्यफुलाचे उत्पादन!

असे वाढवा सुर्यफुलाचे उत्पादन!


खाद्यतेलाचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण खाद्यतेलात स्निग्ध हा महत्त्वाचा घटक असतो. सुर्यफुल हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तेलबिया पीक असून भारतात एकूण तेलबियांपैकी 28% क्षेत्र व 10% उत्पादन सुर्यफुलापासून होते. महाराष्ट्रात विविध तेलबिया पिकांची लागवड केली जाते. प्रामुख्याने मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती व इतर काही जिल्ह्यात सुर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

सूर्यफूल पाण्याचा ताण सहन करणारे पीक आहे. उष्णतामान आणि सूर्यप्रकाशाला असंवेदनशील आहे. तेलातील विशिष्ट स्निग्धांशामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. अशा बहुगुणी पिकाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित लागवड तंत्राची माहिती असणे आवश्‍यक आहे.

हवामान

सुर्यफुल हे पीक विविध हवामानात चांगले येऊ शकते. सुर्यफुल महाराष्ट्रात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. रब्बी हंगाम हा खरीप व उन्हाळी हंगामापेक्षा, सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी चांगला आहे. कारण रब्बी हंगामातील वातावरणामुळे सुर्यफुलाच्या वाढीसाठी भरपूर कालावधी मिळतो. वर पीक काढणीस जास्त कालावधी लागतो. याउलट खरीप उन्हाळी हंगामात अधिक तापमानामुळे पीक लवकर काढणीस तयार होते. त्यामुळे उत्पादनात फरक पडतो. 20 ते 22 डी.सें.ग्रे. तापमान सुर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी पोषक आहे.

जमिन

सूर्यफूलाच्या वाढीसाठी वाळूमिश्रित जमीन चांगली असते; परंतु मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थाचे अधिक प्रमाण असणारी जमीनही योग्य असते. जमिनीचा सामू 6.5 ते 8.5 असावा.

बीजप्रक्रिया

बुरशीजन्य मर रोगापासून संरक्षण मिळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास 2 ग्रॅम थायरम किंवा कार्बेन्डॅझिम प्रति किलो बियाण्यास चोळावे, तसेच ट्रायकोडर्मा प्रति किलो 5 ग्रॅमप्रमाणे बियाण्यास लावावे. नत्र स्थिरीकरण होण्यासाठी रासायनिक बीजप्रक्रिया केल्यानंतर ऍझोटोबॅक्‍टर या जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर प्रति 10 किलो बियाण्यास लावावे.
सुर्यफुलाचे बी पक्व झाल्यानंतर 45 ते 50 दिवस सुप्तावस्थेत असते. म्हणून काढणीनंतर 45 ते 50 दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेले बियाणे पेरणीस वापरावे.

पेरणीसाठी वाणानुसार हेक्‍टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाणे 12 तास पाण्यात भिजवून नंतर सावलीत वाळवून पेरणी केल्यास बियाण्याची उगवण जोमदार आणि एकसारखी होण्यास मदत होते, तसेच बियाण्यांचे उगवण प्रमाण वाढून हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य राखता येते.

लागवड
  • बियाणे 5 ते 6 सें.मी.पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणी मध्यम जमिनीत 45 बाय 20 सें.मी. आणि भारी जमिनीत 60 बाय 30 सें.मी. अंतरावर करावी.
  • या पिकाच्या मुळ्या जमिनीत 45 ते 60 सें.मी. खोल जात असल्यामुळे 15 ते 25 सें.मी. खोल नांगरट करावी. 20 ते 25 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रति हेक्‍टर जमिनीत मिसळावे.
  • खरीप सूर्यफुलाची लागवड जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात, तर रब्बी सूर्यफुलाची लागवड ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी
  • सुर्यफुलाची लागवड करित असतांना 1 एकर क्षेत्रात 20,000 ते 22,000 रोप बसेल अशा हिशेबाने लागवड करावी.
सुधारित व संकरित वाण

सुधारित वाण
1) ई.सी. 68414- हे 100 -110 दिवसांत तयार होणारे वाण आहे. तेलाचे प्रमाण 36-38% असते. उशिरा पेरणीस योग्य आहे.

2) एस.एस.-56: हे 80 ते 85 दिवसांत तयार होणारे वाण आहे. लवकर पक्व होणारा, उशिरा लागवडीस, दुबार पेरणीस, आंतरपीक पद्धतीस आणि आवर्षणप्रवण भागास योग्य आहे. तेलाचे प्रमाण 34-36% असते.

संकरित वाण
1) एल.एस.एच.-1: हे 80-85 दिवसांत तयार होणारे, केवडा रोगास प्रतिबंधक वाण आहे. तेलाचे प्रमाण 38-40% असून हेक्‍टरी उत्पादन 10-12 क्विंटल येते.
2) एल.एस.एच.-3: हे मध्यम कालावधीचा (95-100 दिवस), केवडा रोग प्रतिबंधक वाण आहे. यात तेलाचे प्रमाण 40-42% असते. हेक्‍टरी उत्पादन 11-13 क्विंटल येते.
३) याशिवाय एम.एस.एफ.एच. 1, 8, 17 सारखे उत्पादनात स्थिरता देणाऱ्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाची पेरणी करावी.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

तेलबिया गटातील पिक असल्या कारणाने सुर्यफुलासंस फॉस्फोरस, पोटॅश, सल्फर, मॅग्नेशियम तसेच बोरॉन या अन्नद्रव्यांची गरज भासते.

सुर्य़फुल पिकाद्वारा शोषुन घेतली आणि बियांद्वारा वापरली जाणारी अन्नद्रव्ये

उत्पादन (908 किलो प्रती एकर) नत्र फॉस्फोरस पोटॅश सल्फर
जमिनीतुन पिकांद्वारे ग्रहण 30 – 37 10-12 15-18 3-4
सुर्यफुलाच्या बियांद्वारा वापर 21-26 6-8 5-6 1.8-2.2
स्रोत – कॅनेडियन फर्टिलायझर इस्टिट्युट (प्रमाण किलो प्रती 1 एकर)


सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जातात. वारंवार एकाच जमिनीत हे पीक घेतल्यास जमिनीचा पोत बिघडून उत्पादनक्षमता घटते. रोग- किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे किमान तीन वर्षे त्याच जमिनीत पुन्हा सूर्यफूल घेऊ नये. कडधान्य किंवा तृणधान्य पिकाची फेरपालट करावी. पीक फुलोऱ्यात असताना कीटकनाशकाची फवारणी करू नये.

सुर्यफुलाचे दाणे भरणे (सिड सेटिंग)

seed setting

सुर्यफुल ही वनस्पती स्वपरागसिंचीत नसल्यामुळे कृत्रिमरित्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात भरीव वाढ होते. त्यासाठी मधमाशांचे पोळे शेतात त्यांच्या घरट्यात ठेवल्यास मधमाशा मध गोळा करीत असताना त्यांच्या पायाला व अंगाला परागकण चिकटून एका फुलावरून दुसऱ्यावर नेऊन टाकले जातात व त्यामुळे बीजधारणेस मदत होते. तसेच 7 ते 8 दिवस फुल उमलल्यानंतर सकाळी 9 ते 11 या वेळेत फुलावरून हात फिरविल्यास किंवा एक फुल दुसऱ्या फुलावर घासल्यास बाह्य परागीकरणास मदत होते. त्यामुळे दाणे चांगले भरण्यास आपोआप मदत होते व उत्पादनात 20 ते 25% वाढ होते.

पीकावरील किडी आणि रोग
डाऊनी मिल्ड्यु
सुर्यफुल पिकावरिल हा रोग, हवेद्वारा, बियाण्याद्वारा तसेच जमिनीतुन लागण होणारा रोग आहे. ज्या वेळेस ४ ते ५ पानांच्या अवस्थेत लागण होते त्यावेळेस रोपाचे मुळ बॉल सारखे जाड होते, रोप लहान राहते आणि पानांवर डाऊनी ची लक्षणे दिसुन येतात. रोगाची लागण झाल्यानंतर पाने जाड होतात, पाने पिवळसर पडतात, फुलोरा येत नाही, जमिनीतुन मेटालॅक्झिल, बॅसिलस सबटिलिस यांचा वापर करता येतो. डाऊनी च्या नियंत्रणासाठी एम-45, कॅपटन, अक्रोबॅट, रिडोमिल, कर्जेट एम -8, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड, बेनोमिल, यापैकी एकाचा वापर करावा.
रस्ट
रोगाची बुरशी पिकाच्या शेतात पडलेल्या अवषेशांवर सुप्तावस्थेत राहते. या रोगाची बुरशी हवेद्वारा पसरते. रोगाच्या सुरवातीच्या लक्षणांमध्ये पानांच्या वरिल बाजुस तपकिरी रंगाचे ठिपके दिसुन येतात. कालांतराने पानांच्या खालिल बाजुस देखिल अशी लक्षणे दिसुन येतात.
रोगाच्या नियंत्रणासाठी झिनेब, मॅनेब, कॅपटन, बेनोमिल, एम-45, कॉपर ऑक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड यांचा वापर करता येइल.
काढणी व मळणी

सुर्यफुलाची पाने पिवळी दिसू लागली व फुलांचा मागील भाग पिवळा पडू लागला म्हणजे पीक काढणीला तयार झाले असे समजावे. मळणी यंत्राच्या सहाय्याने मळणी व उफणणी ही दोन्ही कामे करून घ्यावीत. फुले चांगली वाळलेली असतील तर मळणी यंत्राच्या बोल्टाच्या संख्येत 3 ते 4 ने घट करावी. तसेच चांगल्या वाळलेल्या फुलावर थोडे पाणी शिंपडावे, त्यामुळे दाणे फुटण्याचे प्रमाण कमी होते.

उत्पादन

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोरडवाहू सुर्यफुलाचे 4 ते 5 क्विंटल तर बागायती सुर्यफुलाचे 7 ते 8 क्विंटल एकरी उत्पादन येते.

Related posts

Shares