Search

स्ट्रॉबेरी लागवड

स्ट्रॉबेरी लागवड

स्ट्रॉबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर आणि ठराविक ठिकाणीच होत असे, पण अलीकडे या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. या फळातील पोषणमूल्ये आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली मागणी यामुळे भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरीच्या फळामध्ये कर्बोहायड्रेटस जीवनसत्त्व ‘क’, ‘ब’ आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद इत्यादी अन्नघटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या ताज्या फळांना युरोपीय देशांत निर्यातीसाठी भरपूर वाव आहे. बाजारात असलेली मागणी लक्षात घेता स्ट्रॉबेरी लागवड करणे फायद्याचे ठरू शकते.

हवामान:

 • स्ट्रॉबेरीसाठी थंड किंवा शीत वातावरण खूप पोषक असते तसेच वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो.
 • या पिकासाठी साधारण १० – २५ अंश सें. पर्यंतचे तापमान पोषक ठरते.
 • स्ट्रॉबेरी च्या काही जाती परदेशातूनही आयात केल्या जातात. परदेशातून आयात केलेल्या (कॅलिफोर्निया) जातींना सरासरी ३० अंश ते ३७ अंश से. तापमान, ६० ते ७० टक्के हवेतील आर्द्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश असे हवामान चांगले मानवते.

जमिनीची निवड:

 • कोणत्याही पिकासाठी सुपीक कसदार जमीन आवश्यक आहे हे आपण जाणतोच.
 • पण प्रत्येक पिकासाठी जमिनीचा पोत वेगळा असावा लागतो.
 • स्ट्रॉबेरीच्या उत्तम वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी हलकी, मध्यम काळी, वालुकामय पोयटा, गाळाची जमीन असावी.
 • जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक ५. ५ ते ६. ५ या दरम्यान योग्य असतो.
 • भुसभुशीत – वालुकामय जमिनीत स्ट्रॉबेरीच्या रोपांची मुळे जोमाने वाढतात.

स्ट्रॉबेरीच्या जाती:

महाराष्ट्रात लागवड करण्यात येणाऱ्या स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आहेत. प्रामुख्याने सेल्वा, चॅन्ड्‌लर, स्वीट चार्ली, कॅमारोझा, रागिया, डग्लस, फेस्टिवल,ओसो ग्रॅंडी, विंटर डॉन, केलजंट, पजारो इत्यादी कॅलिफोर्नियन जातींची आयात केली जाते.

पूर्वमशागत:

 • दर्जेदार उत्पादनासाठी मेहनत घ्यावी लागते असे म्हणतात.
 • जमिनीची उभी-आडवी खोलवर नांगरट करून, तव्याच्या कुळवाने ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
 • तणांचे व जुन्या पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
 • शक्‍यतो स्ट्रॉबेरी लागवडीच्या अगोदर घेतल्या जाणाऱ्या पिकास शेणखत अथवा कंपोस्ट खत एकरी ८ ते १० टन दिलेले असावे.

गादीवाफे:

 • स्ट्रॉबेरीची मुळे मातीच्या वरच्या १५ ते २०  सें.मी. पर्यंतच्या थरातच वाढतात.
 • स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादी वाफे तयार करावेत.
 • गादी वाफ्यावर स्ट्रॉबेरीची लागवड दोन ओळी, तीन ओळी अथवा चार ओळी पद्धतीनेसुद्धा केली जाते.
 • त्यानुसार योग्य आकाराचे  गादी वाफे तयार करावेत.

रोपे अशी असावीत:

 • रोपे एकसारख्या समान वाढीची असावीत.
 • रोपांची पाने निरोगी व गर्द हिरव्या रंगाची असावीत.
 • रोपांची मुळे लांब, पांढऱ्या रंगाची असावीत.
 • रोपे किडी व रोगांपासून मुक्त असल्याची खात्री करावी.
 • खात्रीशीर रोपवाटिकेत व शक्‍यतो प्लॅस्टिक पिशवीत वाढविलेली रोपे लागवडीसाठी निवडावीत.

मल्चिंगचा वापर:

थंड वातावरणात तयार गादीवाफे पॉलीमल्चिंग ने झाकणे आवश्यक ठरते. यामुळे तण नियंत्रण होतेच तसेच अतिथंडीपासून रोपांचे संरक्षण देखील होते. तसेच मल्चिंग च्या वापरामुळे फळे आणि माती यांचा थेट संपर्क येत नाही, मातीतील आर्द्रता टिकून राहते आणि महत्वाचे म्हणजे मातीतील तापमान नियंत्रणात राहते. मल्चिंग पेपर एकप्रकारे कवचाचे काम करते कारण अति थंडीत रोपं गोठत नाहीत. स्ट्रॉबेरी लागवडीदरम्यान मल्चिंग वापरल्याने पाण्याचे देखील योग्य नियोजन करता येते आणि दर्जेदारउत्पादन घेणे शक्य होते.

 

Related posts

Shares