Search

हळद लागवड – भाग १

हळद लागवड – भाग १

भारतीय मसाल्यांमध्ये हळद एक महत्वपूर्ण मसाला पीक म्हणून ओळखले जाते. हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे.

जमिनीची मशागत:

 • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
 • सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्केपेक्षा जास्त असावे.
 • जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी.
 • कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • त्यासाठी जमिनीची उभी – आडवी एक फूट खोल नांगरणी करावी.
 • दोन नांगरणीमधील अंतर कमीत कमी १५ दिवसांचे ठेवावे.
 • त्यासाठी जमिनीची उभी-आडवी एक फूट खोल नांगरणी करावी.
 • जमिनीचा पोत चांगला राखण्याच्या दृष्टीने द्विदल किंवा हिरवळीची पिके ( ताग, धैंचा) गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी.
 • भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही, त्यामुळे अशा जमिनी शक्यतो हळद लागवडीसाठी टाळाव्यात.
 • जमिनीमधील लव्हाळा, हराळी यांसारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.
 • तसेच अगोदरच्या पिकाच्या काश्या वेचून घ्याव्यात.

बेण्याची निवड

 • बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी.
 • बेण्यावरील एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत.
 • मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, तर हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असावीत.
 • बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे.
 • बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे.
 • बेण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बेणे मऊ पडते. असे मऊ बेणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो. असे बेणे उगवत नाही बीजप्रक्रियेच्या द्रावणात तरंगते.
 • मातृकंद बेणे त्रिकोणाकृती असावे.
 • बेण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी.
 • बेण्यावरील मुळ्या, गतवर्षीच्या पानाचे अवशेष साफ करून बियाणे स्वच्छ करावे.

या लेखाच्या पुढील भागात आपण बियाण्याचे प्रकार, हवामान व लागवड आणि खत व्यवस्थापन यासारख्या विविध पैलूंबाबत माहिती जाणून घेऊया.

[mailerlite_form form_id=1]

Related posts

Shares