Search

हळद लागवड – भाग 2

हळद लागवड –  भाग 2
[Total: 22    Average: 3/5]

हळदीचा वापर मसाल्याबरोबरच औषधींमध्ये देखील केला जातो. हळद लागवड या लेखाच्या पहिल्या भागात आपण जमिनीची मशागत, बेण्याची निवड कशी करावी? यांसारख्या महत्वाच्या पैलूंचा आढावा घेतला. या भागात आपण बियाण्याचे प्रकार, हवामान व लागवड तसेच खत व्यवस्थापन याबाबत माहिती जाणून घेऊया.

बियाण्याचे प्रकार :

हळदीमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारचे बियाणे लागवडीसाठी वापरतात.

मातृकंद किंवा जेठा गड्डे बियाणे :

या प्रकारचे बियाणे हे मुख्य रोपाच्या खाली जे कंद तयार होतात त्यास म्हणतात. याचे वजन ५० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ११ ते १२ क्विंटल बियाणे लागते.

बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे :

मुख्य रोपाच्याबाजूला जे फुटवे येतात, त्याच्या खाली जे कंद तयार होतात. त्यास बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे असे म्हणतात. या कंदाचे वजन ४० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी १० क्विंटल बियाणे लागते.

हळकुंड :

ओली हळकुंडेही बियाणे म्हणून वापरू शकतो; परंतु त्यांचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. या प्रकारचे एकरी ९ ते १० क्विंटल बियाणे लागते. सुरवातीला बियाणे तयार करण्याच्या दृष्टीने या प्रकारचे बियाणे उत्तम आहे, परंतु मातृकंदापासून मिळणारे उत्पन्न हे हळकुंडापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा १५ ते २० टक्के जास्त असते.

हवामान व लागवड :

बदलत्या हवामानाचा हळद पिकाच्या वाढीवर फारसा प्रतिकूल परिणाम होत नाही. हळद हे नऊ महिन्यांचे पीक असून, याची लागवड विभागानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार मे महिन्याच्या सुरवातीपासून जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करता येते. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे अक्षय तृतीयेला हळदीची लागवड करतात. हळदीचे कंद जमिनीमध्ये साधारणतः एक फूट खोलीवर वाढतात. त्यामुळे एक फूट खोलीवरील मातीपरीक्षण केल्यास फायदेशीर ठरते.

खत व्यवस्थापन :

कुळवाच्या गरजेप्रमाणे एक ते दोन पाळ्या देऊन शेवटच्या पाळी अगोदर एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. सद्यःस्थितीमध्ये शेणखताची मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेणखताबरोबर इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने गांडूळखत, कंपोस्ट खत, मासोळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेस मड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींचे मिश्रण याचा वापर करावा. हळदीसाठी शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळावा.  जमीन तयार करतेवेळी एकरी २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांचा वापर करावा.

शेतीविषयक माहिती ईमेलद्वारे मिळवा!

तुमचा इमेल आयडी खालील चौकटीत लिहा

तुमचा इमेल आयडी पाठवला जात आहे...

धन्यवाद!  तुमचा इमेल आयडी मिळाला आहे.

Related posts

Shares