Search

यशोगाथा प्रगतिशील शेतकऱ्यांची – कृषी अवजारांना जोड आधुनिकतेची

यशोगाथा प्रगतिशील शेतकऱ्यांची  – कृषी अवजारांना जोड आधुनिकतेची
[Total: 5    Average: 2.6/5]

शेती भारतातील पारंपारिक उद्योग. यामुळे, भारतात बहुतांश भागात शेती केली जाते. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करावयाचा झाल्यास महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री दि. यशवंतराव चव्हाण यांनी शेतीला आणि शेतीसंबंधित विविध उद्योगधंद्यांना चालना मिळावी म्हणून सहकार चळवळ सुरु केली. मात्र, कालांतराने महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतीकडे राज्यकर्त्यांच  म्हणावं तसं लक्ष गेलं नसावं म्हणून महाराष्ट्र कृषी क्षेत्रात काहीसा पिछाडीवर पडला.

या विषयावर बोलणारे खूप मिळतील. पण हि परिस्थिती बदलावी, शेतकऱ्यांना काही फायदा व्हावा यासाठी मनापासून झटणारे फार कमी असतील. मुंबई जवळ असलेला “वाडा”. वाडा तालुक्यात अनेक आदिवासी पाडे आहेत. या पट्टयात मुख्यत्वे तांदूळ पिकविला जातो. या भागात चिक्कू बरोबरच विविध फळांचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय, भाज्या, कडधान्य यांचही  मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते.

मागील १५ वर्षे या भागात सेंद्रिय शेती करून नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे श्री. जयवंत वाडेकर या भागात दादा वाडेकर म्हणून ओळखले जातात. भात शेती चा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात भात शेतीवर संशोधन करत जय भात लागवड पद्धत विकसित केली आहे. या अंतर्गत सेंद्रिय पद्धतीने भात शेत केली जाते. तसं पाहायला गेलं तर शेतीसाठी लागणारी विविध अवजारे बनविणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय. हा वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळता सांभाळता या अवजारांमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे असे जयवंत वाडेकर यांना वाटले. याला कारणही तसेच होते. शेतकाम करताना मजुरांना किंवा शेतकऱ्यांना विविध अवजारे हाताळावी लागतात. मात्र, या अवजारांमध्ये असलेल्या काही त्रुटींमुळे हि अवजारे वापरताना इजा होत असे. नेहमीच दुसऱ्याला मदत करावी य भावनेने काम करणाऱ्या जयवंत वाडेकर यांना हि गोष्ट खटकली.

“नुसता विचार नाही तर कृती करावी”  या उक्तीचा प्रत्यय वाडेकरांचे काम पाहिल्यावर येतो. कारण, त्यांनी या अवजारांमध्ये असलेली त्रुटी दूर करत आवश्यक ते बदल केले. याचा फायदाच झाला. यामुळे काम वेगाने झाले, काम करतानाची जोखीम कमी झाली आणि याचा परिणाम उत्पादकतेवर झाला. पण आपण बदल केलेली अवजारे किती प्रभावी आहेत हे जाणून घेण्यासाठी जयवंत वाडेकर यांनी हि कृषी अवजारे जवळील शेतकऱ्यांना मोफत वाटली. यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद अपेक्षेप्रमाणेच समाधानकारक होता. प्रत्यक्ष शेतात काम करणाऱ्या लोकांकडून हा प्रतिसाद आल्याने वाडेकरांचा उत्साह दुणावला आणि त्यांनी जोमाने काम करायला सुरुवात केली. वाडेकर एवढ्यावरच थांबले नाहीत. कृषी अवजारांमध्ये बदल केल्यानंतर त्यांनी या सुधारित अवजारांची कृषी विद्यापीठातून चाचणी करून घेतली आणि दर्जावर शिक्कामोर्तब केले.

उत्पादन क्षमता कमी होते याकडे सगळ्यांचे लक्ष जावे म्हणून स्वत: वाडेकर यांनी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. योग्य नियोजन करून शेती करावी आणि शेती करताना भूमातेने उपलब्ध करून दिलेल्या बाबींचा कसा वापर करावा याबद्दल बोलताना वाडेकर म्हणतात कि शेतकऱ्याला जमिनीची नैसर्गिक रचना समजून घेणे गरजेचे आहे. मातीची उत्पादनक्षमता अबाधित ठेवण्यासाठी जमिनीतील जैविक घटक कसे जोपासले जातील किंबहुना त्यांची संख्या कशी वाढेल याकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे असे वाडेकर यांनी देस्ता टॉक बरोबर बोलताना सांगितले. यासाठी आम्ही जीवामृताचा वापर करतो असे त्यांनी सांगितले.

शेती केल्याने शरीर निरोगी राहते कारण आपण काम करताना निसर्गाच्या सानिध्यात अधिक काळासाठी राहतो. हे लक्षात घेता प्रत्येकाने दिवसातून कमीत कमी दोन तास शेतात काम करावे असे जयवंत वाडेकर म्हणजेच दादा वाडेकरांचे मत आहे. आज त्यांनी ७५ वर्ष पूर्ण केली आहेत, त्यांचा फिटनेस पाहिल्यावर त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे याची प्रचीती येते. आपल्या शेत जमिनीन तांदूळ, विविध कडधान्य, फळे याचं उत्पादन घेतात.

जयवंत वाडेकर यांनी आपल्या कल्पकतेतून आणि अनुभवातून “जय अॅग्रो प्रोडक्ट”  या कंपनीच्या माध्यमातून भात जोडणी यंत्र, दातेरी तेज विळा, दोन धारी कोयता, फटका विळा, तीन धारी खुरपी, मिनी कुदळ फावडे, अड कवणी, आंबा झेला, पोल्ट्री पंजा, कुंडी पंजा या बरोबरच विविध उपयोगी अशा कृषी अवजारांची यशस्वी निर्मिती केली आहे. आज त्यांनी तयार केलेली उत्पादने दिवसागणिक प्रसिद्ध होत आहेत. कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढते आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात या उत्पादनांना मागणी मिळत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी जयवंत वाडेकर नेहमीच तत्पर असतात.

( आपल्याकडेही शेती किंवा शेती अवजारांच्या संदर्भातील अशी यशोगाथा असेल तर आपण आमच्याशी संपर्क करा. ८०८२३४६५०९ किंवा ९८२०९७९१६६. या क्रमांकांवर आपण शेतीविषयक काही माहिती हवी असेल तरी निश्चित संपर्क करू शकता. )

जयवंत वाडेकर, वाडा

संपर्क –  02526-650355, Mobile: 09226728101

Related posts

Shares