Search

अक्षय कुमारची “जलयुक्त शिवार” साठी मदत.

अक्षय कुमारची “जलयुक्त शिवार” साठी मदत.
[Total: 0    Average: 0/5]

या वर्षी पावसाने पाठ दाखवल्याने महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेती कशी करावी हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. शेती करताना  पाणी टंचाई चा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्रात “जलयुक्त शिवार” योजना सुरु करण्यात आली आहे. २०१४-२०१५ मध्ये भूजल पातळीत २ मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या १८८ तालुक्यातील २ हजार २३४ गावे तसेच शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या २२ जिल्ह्यातील १९  हजार ५९ गावांमध्ये हे अभियान प्राधान्याने राबविण्यात येत आहे. भविष्यात राज्याच्या उर्वरित भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यावरही भर दिला आहे. या योजनेद्वारे २०१९  पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा राज्य सरकारने निर्धार केला आहे.

या योजनेसाठी बॉलीवूड मधील सुपरस्टार अक्षय कुमार याने मदत दिली आहे. अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत केली आहे. अक्षय कुमार ने ५० लाख रुपयांची मदत केली असल्याचे ट्विट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय.

नाना पाटेकर यांनी “नाम” या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत सुरु केली. त्यांच्या आवाहनाला समाजाच्या विविध स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि सगळ्याच स्तरातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी अनेकजण पुढे सरसावले. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेत आपल्यापरीने मदत केली.  महत्वाचे म्हणजे यापूर्वी अभिनेता आमीर खानने जलयुक्त शिवार योजनेसाठी ११ लाखाची मदत केली होती तर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही ५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केला होता.

एक सुजाण आणि कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून अक्षय कुमार ची ओळख आहेच. योग्य आयकर भरणारा अभिनेता म्हणून अक्षय ओळखला जातो. विशेष म्हणजे या आधी अक्षय ने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ९० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. यानुसार तो महिन्याला 15 लाख अशी सहा महिने मदत करणार आहे. आणि आता “जलयुक्त शिवार” योजनेसाठी मदत करत अक्षय कुमार ने एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. अक्षय कुमार ने त्याचे कर्तव्य नक्कीच बजावले आहे, पण आपले काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्यालाच शोधायचे  आहे.

फोटो कर्टसी : मिड डे

 

 

Related posts

Shares