Search

कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरूच राहणार…

कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरूच राहणार…

मागील काही दिवसांपासून दुबार पेरणीच्या चिंतेने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यसरकाराने मराठवाडा आणि विदर्भात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात केली. मात्र, हा प्रयोग किती यशस्वी झाला किती फसला हा चर्चेचा विषय ठरला. या प्रयोगाचा शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत. पुढील तीन महिने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग राबविले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पावसाचा मोसम कोरडाच होणार कि काय?  या चिंतेने धास्तावलेल्या बळीराजाला यामुळे निश्चित दिलासा मिळू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा देशभरात मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे.  मागील तीन वर्षांतही शेतक-यांच्या वाट्याला दुबार-तिबार पेरणीचे संकट आले होते. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या वर्षी पेरणी व्यवस्थित व वेळेवर होण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याशिवाय अन्य पर्याय दिसत नाहीत. औरंगाबाद परिसरात कृत्रिम पावसासाठी डॉप्लर यंत्रणा बसविण्याची व त्याद्वारे २५० किलोमीटर अंतरापर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्याची ही योजना २७ कोटी रुपयांची आहे. महाराष्ट्रात यापूर्वीही कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत. वार्षिक सरासरीच्या २२ ते २५ टक्के पाऊस या प्रयोगाद्वारे पाडता येतो हे सिद्ध झाले आहे.

कृत्रिम पावसावर २५-३० कोटी रुपये खर्च झाले तरी भविष्यात त्यामुळे शेकडो कोटी रुपयांचा शेतीमालाचे उत्पादन होऊ शकते. यामुळे, चिंताग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकते , मजुरांनाही शेतात काम मिळू शकते.  एकूणच, कृत्रिम पावसाचा प्रयोग राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. म्हणूनच , कृत्रिम पावसाचे प्रयोग यशस्वी होणे गरजेचे आहेच. पण, या बरोबरच जर निसर्गाने आपले काम चोख बजावले आणि पाऊस  योग्य प्रमाणात पडला तर दुधात साखर पडल्यासारखे होईल आणि बळीराजा खऱ्या अर्थाने सुखावेल…

 

 

 

Related posts

Shares