Search

कृत्रिम पाऊस, शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण…

कृत्रिम पाऊस,  शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण…
[Total: 2    Average: 3.5/5]

कृत्रिम पाऊस?  

एखाद्या रुसलेल्या माणसाने आपल्याला वाट पाहायला लावावी तसं पाऊस सद्ध्या महाराष्ट्राच्या  बाबतीत करतो आहे. पाऊस आणि शेतकरी यांच्यात  सद्ध्या लपाछपीचा खेळ सुरु आहे कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बिकट परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यसरकाराने पावले उचलायला सुरुवात केली आहे. म्हणूनच राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात झाली. कृत्रिम पावसाचा हा प्रयोग सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात करण्यात आला.   नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्‍यात नांदगाव इथे खूपच कमी म्हणजे केवळ ७ टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्‍यातील वातावरण कृत्रिम पावसासाठी पोषक आहे. येथील ढगांमध्ये पुरेशी आर्द्रता आहे. दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न यातून होत आहे. या प्रयोगांकडे टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कसा पाडतात कृत्रिम पाऊस?

पाऊस पडण्यासाठी विविध गोष्टींची आवश्यकता असते. यामध्ये, ढगांमधील बाष्पांची क्षमता, तापमान, वा-यांची दिशा आणि वेग यांचा समावेश असतो. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पाऊस कमी पडतो. अशावेळी ढगांमधील बाष्प वाढवून बाष्प विशिष्ट तापमानाला थंड केल्यास त्याचं रुपांतर पाण्याच्या थेंबांमध्ये होतं. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. समुद्रसपाटीपासून साधारणत: सात ते बारा हजार फुटांच्या उंचीवर उड्डाण करत असताना हवा तसा ढग दिसला की या ढगात विमानाच्या पंखात दडलेले फ्लेअर्स विशेष रसायन सोडतात. या रसायनाची ढगांवर फवारणी झाली कि फवारणीनंतर अर्धा ते पाऊण तासात पाऊस पडतो.

जगभरात कृत्रिम पावसाचा प्रयोग

पुरेसा पाऊस न पडणे हि समस्या केवळ भारतातच नाही तर अवघ्या जगभरात आहे. याच कारणामुळे जगभरातील  ५० पेक्षा अधिक देशांमध्ये “कृत्रिम” पावसाचा प्रयोग केला जातो. कृत्रिम पावसामुळे दुष्काळावर पूर्ण मात करता येत नसली तरी पाण्याची टंचाई मात्र कमी करता येते. हि गोष्ट महत्वाची आहे. भारताचा  शेजारी असलेल्या चीनमध्येही असे प्रयोग वारंवार होत असल्याचे दिसते. कृत्रिम पावसासाठी चीनमध्ये तोफा, रॉकेट लाँचर, विमानाचा वापर केला जातो. जमिनीवरुन तोफा, रॉकेट लाँचर डागून आकाशात ढगांचं रोपण केलं जातं. राज्यात याआधी २००३ साली राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. नाशिक मध्ये करण्यात आलेला प्रयत्न अयशस्वी झाल्याचे वृत्त आहे.  मात्र, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार लक्षात घेऊन राज्यसरकार कडून उचलण्यात आलेले पाऊल स्वागतार्ह आहे. लवकरच महाराष्ट्राच्या विविध भागात विशेष करून मराठवाड्यात अशा प्रकारचे प्रयोग केले जाणार आहेत. जर हे प्रयोग यशस्वी ठरले तर दुबार पेरणीच्या चिंतेने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळू शकेल. म्हणूनच, राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचं जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.

फोटो कर्टसी : गुगल इमेजेस

Related posts

Shares