Search

शेतीच्या उज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक

शेतीच्या उज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक
[Total: 4    Average: 2.8/5]

कॉम्प्युटर आणि बिल गेट्स यांचे नाते आपण सगळे जाणताच. कॉम्प्युटर विश्वाचा हा बादशाह काही वर्षापूर्वी भारत भेटीवर आला होता. या दरम्यान त्यांनी बिहार मधील शेती आणि शेतकऱ्यांच जवळून निरीक्षण केलं. सध्या वातावरणामध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. या सगळ्याचा शेतीवर काय परिणाम होऊ शकतो? याचा त्यांनी घेतलेला आढावा. त्यांचा आढावा त्यांच्याच शब्दात आपल्यासमोर मांडत आहोत.

काही वर्षांपूर्वी मी आणि मेलिंडा असं आम्ही दोघांनी भारतातील बिहार ला भेट दिली. यावेळी,  मला तेथील शेतकऱ्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. येथील बहुतांश शेतकरी गरीब असून ते उत्पादित करत असलेल्या भातशेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मान्सून ला सुरुवात झाली कि दरवर्षी या भागात पूर येण्याची, पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. परिणामी कामाच्या शोधात ते शहरी भागात स्थलांतर करतात. मात्र, पुढच्या वर्षी त्याच जोमाने निसर्गाशी दोन हात करण्याची जिद्द मनाशी बाळगत शेतकरी नव्याने शेती करण्यासाठी सज्ज होतात.

या भेटीनंतर माझ्या लक्षात आले कि जगातील गरीब शेतकऱ्याची अवस्था कोणत्याही संरक्षणाशिवाय उंच दोराला लटकणाऱ्या माणसासारखी असते. श्रीमंत शेतकऱ्याप्रमाणे  गरीब शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, खते, जल संधारण योजना किंवा इतर फायदेशीर तंत्रज्ञान याची थेट माहिती नसते. याशिवाय, कोणत्याही आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानाची भरपाई व्हावी यासाठी त्यांच्याकडे पिकांचा विमा नसतो. म्हणूनच, दुष्काळ, पूर किंवा पिकांवर एखादा रोग झाल्यास ते गरिबीच्या गर्तेत अधिकाधिक खोलवर ढकलले जातात

सध्या, वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांवरील जोखीम अधिक वाढली आहे. दिवसागणिक उष्णता वाढत आहे, यामुळे उष्ण कटिबंधातील शेतीवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. कमी किंवा अधिक प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे पिकांची योग्य वाढ होणार नाही तसेच उष्ण वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होऊन पर्यायाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

वातावरणीय बदलाचा प्रभाव गरीब शेतकऱ्यांवर होणार आहे. जगातील वाढत्या लोकसंख्येला अन्न धान्य पुरविण्यासाठी याच शेतकऱ्यांची मदत होणार आहे. २०५० पर्यंत वैश्विक स्तरावर अन्नासाठी असलेली मागणी ६०% नि वाढणार आहे. यादरम्यान, शेती उत्पादनात होणारी घसरण बिकट परिस्थिती निर्माण करणार आहे. यामुळे, मागील अर्धशतकात गरिबी दूर करण्यासाठी झालेले सगळे प्रयत्न फोल ठरतील आणि उपासमारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे.

गेट्स फाऊंडेशन आणि त्याचे भागीदार यांच्या तर्फे आम्ही दुष्काळ आणि पूर यांच्यादरम्यान तग धरतील अशा बियाण्यांच्या निर्मिती साठी प्रयत्न करत आहोत. माझ्या बिहार भेटी दरम्यान मी येथील तांदूळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी पूरस्थितिचा सामना करू शकणारी “स्कुबा” हि बियाणाची नवीन जात विकसित केली आहे.  या अंतर्गत येणारी रोपं दोन आठवड्यापर्यंत पाण्याखाली तग धरू शकतात. या व्यतिरिक्त तांदळाच्या दुष्काळ, उष्मा, थंडी आणि खाऱ्या मातीशी निगडीत विविध समस्यांचा सामना करणाऱ्या विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

शेतीमध्ये जर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला तर शेतकऱ्याच उत्पन्न दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकते. असे झाल्यास कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक होऊ शकते. याचा सकारात्मक प्रभाव भविष्यात अन्न धान्यासाठी जी मागणी असेल त्याची पूर्तता करण्यासाठी होऊ शकतो. आज आफ्रिकेमध्ये उपग्रहाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या शेतजमिनीच्या आराखड्यातून त्या जमिनीला अनुरूप कोणते उत्पादन घेतले जावे याची सखोल माहिती मिळू शकते. आपल्या निरीक्षणा बाबत लिहिताना बिल गेट्स पुढे म्हणतात कि पुढील १५ वर्षात आफ्रिका अन्न धान्याच्या उत्पादनात अमुलाग्र प्रगती करेल. यामुळे, त्यांना दुसऱ्या कोणावरही विसंबून राहावे लागणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितही त्यांच्या कृषी उत्पादनावर प्रभाव पडणार नाही.

बिल गेट्स यांच्याकडून कृषी क्षेत्रा बाबत करण्यात आलेलं हे निरीक्षण खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या या निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भविष्यात वातावरणीय बदल कृषी क्षेत्रावर आणि पर्यायाने मानवावर विपरीत परिणाम करणार आहेत. पण यावर मात करण्यासाठी आपण आत्ताच आवश्यक पावले उचलायला हवीत. मुख्य आणि महत्वाचे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे खूप गरजेचे आहे.

Related posts

Shares