Search

झुडूपवर्गीय काळी मिरी पद्धत

झुडूपवर्गीय काळी मिरी पद्धत

कोकणामध्ये प्रामुख्याने आंतरपीक म्हणून वेलवर्गीय काळीमिरीची लागवड केली जाते. मात्र, वेलीवरील मिरी घडाची काढणी करताना अडचणी येतात. हे टाळण्यासाठी आवाशी (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये झुडूपवर्गीय काळी मिरी पद्धत विकसित करण्यात आली आहे.

Bush pepper

 

कोकणातील काळे सोनेम्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळी मिरीच्या अनेक जाती असल्या तरी, त्यापैकी पेन्न्युर ही अधिक लोकप्रिय व सर्वांत जास्त उत्पादन देणारी जात आहे. या जातीची लागवड कोकण किनारपट्टीत आंतरपीक म्हणून नारळ, सुपारी, पांगारा, बॉटलब्रश, सिल्व्हरओक, भेंडी, आंबा यांसारख्या झाडांच्या आधारे केली जाते. तसेच ग्रॅनाईट पीलर, आरसीसी खांब, लाकडी खांब यांच्या कृत्रिम आधारावरही लागवड करता येते.

वेलवर्गीय मिरी पीक व्यवस्थापनातील अडचणी

1) नारळ अथवा सुपारीसारख्या उंच वाढणाऱ्या झाडांवर वेल वाढते. परिणामी, काळी मिरीची काढणी करणे अडचणीचे ठरते.

2) सूर्यप्रकाशाच्या बाजूला काळी मिरीच्या पानावर उष्णतेमुळे काळे चट्टे पडतात. उत्पादनात घट होते. याशिवाय सूर्याच्या दिशेने असलेले घड लवकर पक्व होतात. अशा घडांची संख्या कमी असल्याने काढणी होत नाही. ते गळून पडतात.

4) नारळ व पोफळींवर काळी मिरी शास्त्रीय पद्धतीने न वाढवल्यास वेलीच्या वाढीवर नियंत्रण राहत नाही. तसेच नारळ, पोफळीसारख्या पिकांना उंदराचा उपद्रव होतो.

5) तसेच सर्वसाधारण काळी मिरी लागवडीपूर्वी 3-4 वर्ष अगोदर त्यांना आधार देणाऱ्या झाडांची लागवड करावी लागते. त्यानंतर काळी मिरीची रोपे बुंध्यात लावली जातात. या लागवडीनंतर आणखी 3-4 वर्षांनी मिरीच्या उत्पादनाला सुरवात होते. म्हणजेच सहा वर्षांच्या प्रयत्नांनंतर काळी मिरीचे पहिले उत्पादन मिळते. यामध्ये सुमारे 7 ते 21 किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते.

झुडूपवर्गीय काळी मिरी म्हणजे काय?

Bush pepper type

वेलवर्गीय काळी मिरीपासून मिळणाऱ्या फळधारणा होणाऱ्या आडव्या फुटीची जमिनीमध्ये लागवड करून, त्याची नियंत्रित वाढ केली जाते. सर्वसाधारणपणे काळी मिरीच्या वेलीला तीन प्रकारचे फुटवे असतात.

 1. आकाशाच्या दिशेने जाणारे
 2. जमिनीकडे झुकणारे व जमिनीच्या समांतर रेषेत चालणारे
 3. तसेच मुख्यवेली वाढताना बाजूने येणारे फुटवे (साइड फुटवे).

Black pepper plant

पारंपरिक काळी मिरीची वेल तयार करण्यासाठी साधारणपणे पहिल्या दोन प्रकारांपैकी वेल निवडले जातात. अशा धावत्या वेलाचे मूळ फुटलेले व साधारण 1 ते 3 पेर असलेले छाट मिळतात; परंतु बुशपेपर अर्थात झुडूपवर्गीय काळी मिरीसाठी तिसऱ्या प्रकारातील साइड फुटव्याचा वापर केला जातो.

जमीन व हवामान

या पिकासाठी समुद्रतटीय भागातील उष्ण व दमट हवामान अतिशय पोषक आहे. 18 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानवते. आर्द्रता सुमारे 65 ते 85 टक्केपर्यंत लागते. तसेच किफायतशीर उत्पादनासाठी प्रतिदिन 5 ते 7 तास स्वच्छ सूर्यप्रकाश असणे आवश्‍यक आहे. या पिकास उत्तम निचरा होणारी व 1 टक्‍क्‍यापेक्षा अधिक सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन आवश्‍यक आहे.

Types of black pepper

जाती

 1. काळी मिरीच्या सर्व जातींचे आपण झुडूपवर्गीय (बुशपेपर)मध्ये रूपांतर करू शकतो. पेन्न्युर-1 ही जात कोकणात अधिक लोकप्रिय व जास्त उत्पादन देणारी आहे.
 2. याशिवाय कुथिरावली, करीमुंदा, कलुवली, इंपिरीआन, कोतानादान, युथिरॉन या इतरही अनेक जाती आकर्षक व लोकप्रिय आहेत.

बुशपेपर लागवड तंत्रज्ञान

 1. सशक्त व जोमदार वाढलेल्या काळी मिरीच्या वेलीची निवड करावी. त्यांच्या आडव्या फुटव्याची निवड करताना साधारणपणे फुटव्याची लांबी 30-35 सेंमी असावी.
 2. सदर फुटव्याला वरच्या बाजूस दुय्यम फुटवा व पान असते. यासह फुटवा निवडून धारदार चाकूच्या साह्याने त्याची छाटणी करावी. छाटणी केलेला फुटवा पाण्यात अथवा सावलीत ठेवावा. सदर फुटव्यास किमान 2 ते 3 पेर असणे आवश्‍यक आहे.
 3. या फुटव्याचा जमिनीत गाडावयाच्या भागावर कॅरेडेक्‍स भुकटी मिश्रण लावून घ्यावे. हा फुटवा शेणखत, वाळू आणि माती (111) समप्रमाणात घेऊन भरलेल्या पिशवीत लावावा.
 4. फुटवा जमिनीत साधारणपणे 5 ते 7 सेंमी एवढा भाग जाईल, अशी काळजी घ्यावी.
 5. नियंत्रित पाणी देऊन हा फुटवा वाढवावा.
 6. याला साधारणपणे 26 ते 27 दिवसांनी नवीन फुटवा येण्यास सुरवात होते.
 7. 80 ते 90 दिवसांच्या कालावधीत दीड फुटाचे रोप तयार होते. म्हणजेच रोपांची उंची 30 ते 45 सेंमी एवढी असते. या रोपास 5 ते 7 पाने असतात. अशाप्रकारे 2 महिने वयाची वाढलेली रोपे पुनर्लागवडीसाठी वापरावीत.

पुनर्लागवड (खुल्या जागेत किंवा सावलीत) –

Black pepper open farm Black pepper in shednet

 1. आडव्या फुटव्यापासून तयार केलेले 35 ते 40 सेंमी उंचीच्या रोपांची लागवड 1 मीटर बाय 1 मीटर अंतरावर करावी.
 2. लागवडीसाठी 1 घनफूट आकाराचा खड्डा खणावा.
 3. खड्ड्यात अर्धे घमेले शेणखत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व शिफारशीनुसार दाणेदार कीडनाशकांचा वापर करावा. खड्डा मातीने भरून घ्यावा. तसेच निवडलेली जागा उत्तम निचऱ्याची असावी.
 4. रोप लागवड करून इंग्रजी एचआकाराच्या काठीने आधार द्यावा. रोपाला सावलीची आवश्‍यकता असल्याने ती 50 टक्के ग्रीन शेडनेटमध्ये लावावीत. पावसाळ्यात मात्र ग्रीन शेडनेटऐवजी प्लॅस्टिक पेपर (सिलपॉलिन) वापरावे.

फूलधारणा, फळधारणा, उत्पन्न -.

Black pepper plant

 1. लागवड केलेल्या झुडपाला पहिल्या वर्षापासूनच फूलधारणा व कालांतराने फळधारणा होते.
 2. सर्वसाधारणपणे एका गुंठ्यात 100 झुडपे बसतात. 100 झुडपांपासून पहिल्या वर्षी 6.5 ते 8 किलो हिरवी मिरी आणि त्यापासून 2 ते 3.5 किलो सुकी मिरी मिळते.
 3. दुसऱ्या वर्षी साधारणपणे 25 ते 27 किलो हिरवी मिरी व त्यापासून 11 ते 12 किलो सुकी मिरी तयार होते.
 4. याशिवाय सतत वाढणाऱ्या फुटव्यांपासून वेलवर्गीय काळी मिरीची रोपे मिळतात.

हे पीक उपलब्ध अल्प क्षेत्रावर तसेच कुंडीतही घेता येते.

संदर्भ –  (कृषी संशोधन केंद्र, आवाशी, ता. खेड, जि. रत्नागिरी)

Related posts

Shares