Search

चिकू लागवडीचे तंत्र – भाग १

चिकू लागवडीचे तंत्र – भाग १
[Total: 6    Average: 3/5]

चिकूचे मूळ स्थान दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधातील वेस्ट इंडीज हे आहे. अर्थात आता चिकू सर्वच देशांत होतो. महाराष्ट्रात ठाणे व कुलाबा जिल्हय़ातही चिकूची लागवड मोठय़ा प्रमाणात होते. चिकूपासून चिप्स, पावडर, आइस्क्रीम, कुल्फी तयार करता येते. पिकलेल्या चिकू फळात पोटॅशियम, जस्त, लोह यांचे चांगले प्रमाण असते. चिकुमध्ये असलेले औषधीय गुणधर्म लक्षात घेत चिकूचा रोजच्या आहारात समावेश असणे आवश्यक आहे.
ठाणे जिल्ह्यातील डहाणू व घोलवड हा भाग चिकूचे आगार म्हणून ओळखला जातो. या चिकूच्या आगारात पूर्वी प्रति झाड ३०० किलोपर्यंत चिकूचे उत्पादन घेतले जायचे. मात्र अलीकडील वर्षांत विविध समस्यांमुळे हे १०० ते ६० किलोपर्यंत खाली आले होते. कोसबाड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रातील (केव्हीके) विषय विशेषज्ञ (उद्यान विद्याशास्त्र) जगन्नाथ सावे चिकू उत्पादन घटण्याची कारणे शोधण्यासाठी विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन चर्चा करून चिकू बागेत काही प्रयोग करण्यास सुरवात केली. सलग तीन वर्षे छाटणी पद्धती, खतांचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन यासंबंधी प्रयोग केल्यानंतर सकारात्मक बदल झाल्याचे निदर्शनास आले.

चिकू बागेत कशाप्रकारे व्यवस्थापन करावे याचा आढावा घेऊया.

नवीन बागेचे व्यवस्थापन :
• चिकूच्या कलमांची लागवड केल्यानंतर मूळकांडावर (खिरणी) येणारी फूट नियमितपणे काढून टाकावी. लागवडीपासून नियमित सिंचनाची गरज असते.
• लागवडीनंतर पहिली तीन वर्षे कलमावर येणारी फुले खुडून टाकावीत, तीन ते चार वर्षांनी जमिनीपासून दोन ते तीन फूट उंचीवरील फांद्या काढून टाकाव्यात.
• चिकूच्या झाडावर नवीन पालवी आणि फुलधारणा एकाचवेळी येत असते. नवीन पालवीच्या बेचक्यासमध्ये फुले व फळे वाढतात, म्हणून फांद्यांची छाटणी दरवर्षी करता येत नाही. तथापि, किडलेल्या व रोगट फांद्यांची छाटणी करावी.
• दाट तसेच सावली करणाऱ्या फांद्यांची योग्य पद्धतीने छाटणी करावी.
खतांचे नियोजन :
चिकूची कलमांच्या चांगल्या वाढीसाठी तसेच अधिक उत्पादन मिळण्यासाठी लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी १५० ग्रॅम नत्र : १५० ग्रॅम स्फुरद : १५० ग्रॅम पालाश या खतांची मात्रा द्यावी. त्याचबरोबर १० किलो शेणखत द्यावे. दुसऱ्या वर्षी या मात्रेच्या दुप्पट, तिसऱ्या वर्षी या मात्रेच्या तिप्पट अशा प्रकारे वीस वर्षांपर्यंत वाढवीत जावी. त्यानंतर दरवर्षी २० घमेली शेणखत तीन किलो नत्र, तीन किलो स्फुरद आणि तीन किलो पालाश द्यावे, या मात्रा दरवर्षी दोन सारख्या हप्त्यांमध्ये द्याव्यात. पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यात, तर दुसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा. खते बांगडी पद्धतीने चरामध्ये द्यावीत.
पाणी व्यवस्थापन :
चिकूला वर्षभर पाण्याची गरज आहे. जमिनीची प्रत आणि हवामान यानुसार पाण्याचे प्रमाण व वेळ बदलत असते. पाणी देण्यासाठी झाडाच्या भोवती विस्ताराच्या आकाराचे गोल आळे करून पाणी द्यावे. चिकूच्या झाडाला सतत पाणी मिळाले पाहिजे, परंतु पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रमाणापेक्षा जास्त पाणी जरी दिले तरी फुले आणि फळांची गळ होते किंवा फळांच्या आकारामध्ये विकृती येते. प्रत खालवते. सध्याची पाणीटंचाई पाहता तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. आळ्यामध्ये आच्छादन करावे.
संदर्भ – स्वप्न शेतीचे

Related posts

Shares