Search

पर्यावरण संतुलनासाठी वनशेती

पर्यावरण संतुलनासाठी वनशेती
[Total: 7    Average: 3.3/5]

आमच्याकडे एकराने जागा आहे, अशीच पडून आहे. पण त्याची निगा राखणे शक्य होत नाही. आता काय करु? परवाच एका मित्राचा फोन आला होता. मी त्याला म्हणालो मला जर वेळ दे मी विचार करून सांगतो. विचार करायला लागलो आणि हळूच डोक्यात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गावातले ते माळरान तिथलं खेळणे,बागडणे सगळे आठवायला लागले. आणि आपसूकच डोळ्यासमोर दौलत आजोबांचा सुरकुत्यांनी सजलेला हसरा चेहरा नजरेसमोर आला. त्या माळरानातलं त्याचं घाम गाळत काम करणं आठवलं. त्यांनी तेव्हा घेतलेली मेहनत आता मोठ्या वृक्षांच्या रुपात त्या माळरानावर डौलाने उभी आहे. क्षणात डोक्यात प्रकाश पडला मित्राच्या जागेत त्याला अशाप्रकारे वनशेती करता येऊ शकते असं फोन करून सुचविले. यावर त्याने मला वनशेतीबद्दल माहित नसल्याचे सांगितले. मनात विचार आला वनशेती वर प्रकाशझोत टाकणे गरजेचे आहे.

वनशेती म्हणजे काय?

वनशेती म्हणजे उपलब्ध जागेत योग्य नियोजन करून लागवड करून झाडा बरोबर धान्याचे आंतरपीक कसे घ्यायचे याचे तंत्र होय. वनशेती ही शेती उत्पादनातील सुधारित पद्धत आहे. महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण विभागातील कमी व अनिश्चिशत पाऊसमानात हलक्या, उथळ, क्षारयुक्त व नापिक, पाणथळ जमिनीत नेहमीचे पीक बर्याशच वेळा फायदेशीर ठरत नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या परवडतदेखील नाही. अशा जमिनीत परिस्थितीमुळे प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.

वनशेती पद्धती

कृषी उद्यान कुरण :

हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीवर आंबा, चिंच, सीताफळ, बोर, आवळा, शेवगा इ. फळझाडांची लागवड करून सुरवातीची तीन ते पाच वर्षे हरभरा मूग, तूर, गहू, भुईमूग आदी पिके घेतात व झाडांचा डोलारा मोठा झाल्यावर झाडाच्या ओळींमध्ये सुधारित गवताची लागवड करतात. या पद्धतीमध्ये गरजेनुसार फळझाडे व गवत यांची सुरवातीपासूनही लागवड करता येते.
कृषी उद्यान :
या पद्धतीत फळझाडांमध्ये विविध द्विदल किंवा एकदलवर्गीय पिके घेता येतात. जिराईत क्षेत्रावर बोर, आवळा, शेवगा, चिंच या फळझाडांची लागवड करता येते, तर बागायत क्षेत्रात आंबा, चिकू यांसारखी फळझाडे घेऊन त्यामध्ये पिकांची लागवड करतात.

वृक्षशेती :

ज्या जमिनीत विविध कारणांस्तव (पाणथळ, आम्ल व क्षारयुक्त इ.) सर्वसाधारण पिके घेता येणे शक्य नाही, त्या वेळी त्या-त्या प्रकारास योग्य अशा बहुउद्देशीय (लाकूड, चारा, फळे इ.) झाडांची लागवड करावी. क्षेत्र मोठे असेल तर एकाच प्रकारची झाडे न लावता समान पट्टे करून विविध उपयोगी अनेक जातींची झाडे लावावीत.

वनशेतीचे फायदे

उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर :
उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करून तेथे वृक्ष लागवड करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन काढता येईल. भागातील शेतकऱ्याला आर्थिक जळाऊ लाकूड, निवाऱ्यासाठी इमारती लाकूड फळे, जनावरांसाठी चारा या गरजा पूर्ण करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. अन्नधान्याच्या गरजेइतकाच याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे वनशेती महत्त्वाची आहे.

निसर्ग संतुलन :
वनशेतीची लागवड केल्यामुळे जमिनीत सेंद्रीय घटकांचे प्रमाण कायम राहते. जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. जमिनीत ओलावा टिकून राहतो, हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण संतुलित राहते. वन शेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षापासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो व वाढीव उत्पन्न मिळविणे शक्य होते. वातावरणातील आद्रतेचे प्रमाण वाढते, तापमानाचे नियमन होते, पिकांसाठी पूरक अशा जीव – जंतूचे जतन होते, वाऱ्याच्या गतींवर नियंत्रण होते, पावसाचे प्रमाण वाढते. पर्यावरणच्या संतुलनास मदत होते. वन शेतीस मजूर कमी लागतात व या पद्धतीपासून दीर्घकाळ उत्पन्न मिळत राहते.
कृषी वनशेती पद्धती शेतकऱ्यांसाठी पर्यावरण संतुलनाबरोबरच कुटुंबाच्या उपजीविकेचे साधन बनू शकते. त्यासाठी, सध्याच्या शेतीपद्धतीत थोडाफार बदल घडवून आणावा लागेल. कृषी वनशेतीच्या योग्य पद्धतीची निवड आणि त्याचा योग्य अवलंब केल्यास याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होऊ शकेल.

Related posts

Shares