Search

खतांचे अनुदान आता थेट बँकेत येणार… बळीराजा सुखावणार…

खतांचे अनुदान आता थेट बँकेत येणार… बळीराजा सुखावणार…

 

कोणत्याही  कामाला जर हातभार लागला तर ते काम अधिक जलद गतीने होते असे म्हणतात. कारण, अशा प्रकारे कामाला लागणारा हातभार हा काम करणाऱ्याचा  उत्साह वाढवतो. त्याला काम अधिक जोमाने करण्यास प्रेरणा देतो. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अखंड मेहनत घेऊन आपल्यासाठी धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीत नेमके असेच होणार आहे. कारण आता केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी एक खास योजना घेऊन आली आहे. यासाठी शेतक-यांनी आधार कार्ड आणि आपल्या जमिनी संदर्भातील पुरावे सदर करणे गरजेचे आहे. रासायनिक खताचे अनुदान थेट शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने शेतक-याला ख-या अर्थाने याचा फायदा होईल.

मात्र, या योजनेची अंमलबजावणी करताना येणारे सगळ्यात महत्वाचे आव्हान म्हणजे या योजनेसाठी पात्र शेतकरी शोधणे हे आहे. कारण, अनेक राज्यांमध्ये शेती संदर्भात असणारे ७ x १२ चे उतारे एकतर अचूक नाहीत किंवा ते सुधारित नाहीत. यावर मात करण्यासाठी कृषी विभागाने योजना आखली असून या अंतर्गत खतांची किरकोळ विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांची मदत घेतली जाणार आहे. यामुळे, टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांची माहिती संग्रहित करता येणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकारच्या खत विभागाने दिनांक २५.०५. २०१५ प्रसिद्ध केलेल्या सुचनपत्राद्वारे युरिया ची निर्मिती करणाऱ्या देशी उत्पादक कंपन्यांना १०० टक्के निम कोटेड युरियाचीच निर्मिती करणे अनिवार्य केले आहे. निम कोटेड युरियाचा वापर  औद्योगिक कारणांसाठी करता येऊ शकत नाही यामुळे, अनुदानित युरियाचा बिगरशेती कामांसाठी वापर होण्यावर प्रतिबंध होऊ शकेल. खत विभागाने २५ मे २०१५ रोजी नवीन युरिया धोरण घोषित केले आहे. यामध्ये, दोन महत्वाचे उद्देश आहेत. देशी युरिया चे उत्पादन वाढविणे आणि घोषित केलेल्या युरिया केंद्रांमध्ये  ऊर्जा कार्यक्षमतेचा प्रसार करणे हे आहेत. यामुळे, सरकारवरील अनुदानाचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकेल.

केंद्र सरकारने नुकतीच वेगवेगळ्या सरकारी योजनेचा फायदा थेट लाभ धारकांना मिळावा यासाठी नवीन प्रणालीची घोषणा केली. यानुसार, लाभधारकांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे. या नुसार आता शेतकऱ्यांना रासायनिक खतावर दिले जाणारे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर पुढील काळात जमा करण्याची कार्यपद्धती सुरू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड,  बँकेचे नाव , शाखा , खाते क्रमांक याची माहिती जमा करावी लागणार आहे. संबंधित माहिती जमा केल्यानंतर रासायनिक खतावरील अनुदान सरळरित्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन त्यास अनुदानित खतावरील खतांचा लाभ घेता येईल.

Related posts

Shares