Search

करु भातशेतीसंगे मत्स्यपालन

करु भातशेतीसंगे मत्स्यपालन

भात शेतीतील मत्स्यसंवर्धन :

भात पिकाबरोबर मत्स्यसंवर्धन करण्याचे अनेक फायदे आहेत.

१. कमी खर्चात अतिशय पौष्टिक प्रथिनयुक्त खाद्याची निर्मिती आणि त्याद्वारे कुटुंबाला पौष्टिक आहार.

२. मासे विकून मिळणारा आर्थिक लाभ.

३. भात आणि मासे यांची एकत्रित शेती एकमेकांना पूरक आहे. भाताच्या शेतातील पाण्यामध्ये मासे राहतात आणि आपल्या वाढीसाठी शेतामधील शेवाळाचा खाद्य म्हणून उपयोग करतात.

४. भात शेतामध्ये प्रती हेक्टरी ५,००० ते १०,००० मासे सोडतात. या माशांच्या माल्मुत्राचा उपयोग भात पिकाला खतासारखा होतो. त्यामुळे खतावरील खर्चात बचत होते.

पाणी साठविण्यासाठी बांधबंदिस्ती आणि चर :

भात खाचरात पाणी साचून राहावे म्हणून बांधाची उंची ६० सें. मी. इतकी ठेवावी. या बांधामुळे शेतामध्ये ३० ते ४०  सें. मी. पाणी ठेवणे शक्य होईल. अतिवृष्टीमुळे मासेदेखील वाहून जाण्याची शक्यता असल्याने शेताच्या उतरकडील भागात बांधाची उंची किंचित ( १० सें. मी.) कमी ठेवावी व त्या ठिकाणी जाळी  बसवावी.

जास्त पाण्याचा भात पिकावर अनिष्ट परिणाम होऊ नये आणि वाढणाऱ्या माशांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी भातखाचरामध्ये चारही बाजूंनी बांधालगत  आणि मध्यभागी ५० सें. मी. रुंद आणि ४० सें. मी. खोल चार खोडणे आवश्यक आहे. ज्या भागात शेताचा उतार आहे त्या भागात कोपऱ्यात  एक १०० सें. मी. लांब व  १०० सें. मी. रुंद आणि ६० सें. मी. खोल खड्डा करावा. चार आणि खड्डा एकमेकांना जोडावेत. काही कारणांमुळे पाण्याची पातळी कमी झाल्यास माशांना या चरातील आणि खड्ड्यातील पाण्यात राहता येईल.

fish in paddy

मत्स्यसंवर्धन :

भाताची लागवड केल्यावर ४-५ दिवसांनी दर हेक्टरी ५,००० ते १०,००० मत्स्य बोटुकली सोडावी. त्यासाठी भारतीय प्रमुख कार्प, जिताडा, सिप्रिनस, मागूर तिलापीया (नर) या जातींपैकी कोणत्याही एका जातीचे मासे निवडावेत. मत्स्यबोटुकली महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागाच्या मत्स्यबीज केंद्रात मिळतात. भात पिकामध्ये जितके दिवार पाणी ठेवता येऊ शकेल तितके दिवस मत्स्यसंवर्धन करता येते. साधारणपणे ३ ते ४ महिने मत्स्यसंवर्धन केल्यास प्रति  हेक्टरी २०० किलो मत्स्य उत्पादन मिळू शकते. मत्स्यबीजासाठी रु. १५००/- खर्च केला असता रु.६०००/- इतके उत्पन्न मिळू शकते.

दक्षता : भातशेतीमध्ये मासे पाळताना भात्पिकासाठी किताक्नाशाके वापरू नयेत. कीटकनाशकामुळे मासेदेखील मरतात. कीड/ रोग प्रतिकारक अशा भात जातींची निवड करावी

संदर्भ : डॉ. बा. सा.को.कृ.वि. दापोली

फोटो कर्टसी : एग्रोपेडीया

Related posts

Shares