Search

गोड मधुर द्राक्षांची लागवड कशी कराल, वाचा आणि जाणून घ्या…

गोड मधुर द्राक्षांची लागवड कशी कराल, वाचा आणि जाणून घ्या…

द्राक्षाबाबत जाणू काही :

द्राक्षाचे मूळ स्थान रशियातील अरमेनिय जिल्हा आहे. भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला.  भारतात द्राक्ष लागवडीसाठी असणा-या एकूण क्षेत्राच्या निम्यापेक्षा जास्त क्षेत्र हे एकटया महाराष्ट्रातच असल्याने द्राक्ष शेतीस महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत विशिष्ट असे स्थान प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्रात  नाशिक, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत द्राक्षाची सर्वांत जास्त लागवड आहे. नाशिक, पिंपळगाव बसवंत, सांगली, तासगाव, उगाव, नारायणगाव, करकंभ – पंढरपूर, फलटण हा भाग उत्तम प्रतीच्या द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षाच्या लागवडीला औरंगाबाद, बीड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांतही तेथील अनुकूल हवामानामुळे भरपूर वाव आहे.

उपयोग जाणू द्राक्षाचा  :

manuka 1

ताजी द्राक्ष खायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. द्राक्ष वाळवून त्यापासून मनुका तयार केला जाऊ शकतो. भारतात बनविण्यात येणाऱ्या विविध मिष्टान्नामध्ये मनुक्याचा सर्रास वापर केला जातो. मनुक्यामधील औषधी गुणधर्मामुळे अनेक जण नुसत्या मनुक्याचेही नित्यनियमाने सेवन करतात.  याशिवाय द्राक्षापासून मद्य आणि इतर पेय बनविली जातात. जगातील द्राक्षांच्या एकूण उत्पादनापैकी ८० % उत्पादनाच वापर मद्य आणि विविध प्रकारची पेये बनविण्यासाठी केला जातो. १०% द्राक्षे ताजी खाण्यासाठी १०% मनुका तयार करण्यासाठी वापरतात.

हवामान व जमीन

द्राक्षाची वाढ कमी पावसाच्या प्रदेशात आणि उष्ण व कोरडे हवामान, असलेल्या प्रदेशात चांगली होते. सरासरी कमाल हवामान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किमान सरासरी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जात नाही अशा ठिकाणी द्राक्षाची लागवड यशस्वीरित्या होऊ शकते.  द्राक्ष पिकाला मध्यम काळी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन चांगली असते. तरीपण द्राक्षाचे पीक निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत येऊ शकते

लागवड पद्धती

grapes

द्राक्षबागेची लागवड दोन पध्दतींनी करतात.एक म्हणजे छाट कलमे कायमच्या जागी ऑक्टोबर महिन्यात लावून आणि रोप वाटिकेत छाट कलमांना मुळ्या फुटल्यानंतर जानेवारी महिन्यात रोपवाटिकेत काढून बागेत लागवड करतात. अलीकडे, द्राक्षात खुंट वापरून इच्छित जातींची कलमे करून लागवड करण्यात येत आहे. सूत्रकृमी, चुनखडी तसेच पाण्याचा ताण यावर मात करण्यासाठी खुंट वापरून यश मिळवता येते. बंगलोर डॉगरीज, रामसे १६१३ इ.जाती खुंट म्हणून वापरतात.

सुधारित जाती

grapes 1

महाराष्ट्रात थॉमसन सिडलेस, तास ए.गणेश, सोनाका सिडलेस, माणिक चमन, शरद सिडलेस, फ्लेम सिडलेस, अनाबेशाही, बंगलोर पर्पल या जातींची लागवड केली जाते. त्यापैकी अलीकडच्या काळात थॉमसन सिडलेस, तास ए गणेश व सोनाका या जातींची सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते.

द्राक्षाच्या बिनबियांच्या जातीमध्ये थॉमसन सिडलेस ही उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन देणारी जात आहे.या जातीचे उत्पादन हेक्टरी २० ते २५ टन असून घड मध्यम,भरगच्च मण्यांनी भरलेला असतो. साखरेचे प्रमाण २० ते २२% असल्यामुळे बेदाणे करण्यास या जातीचा वापर मोठया प्रमाणावर केला जातो.

तास-ए-गणेश ही जात थॉमसन सिडलेस या जाती पासून निवड पध्दतीने सांगली जिल्हयातील तासगाव येथे शोधून काढण्यात आली. सोनाका ही जात नानज, जिल्हा सोलापूर येथे थॉमसन सिडलेस या जाती मधून निवड पध्दतीने शोधून काढण्यात आले या जातीत साखरेचे प्रमाण २४ ते २६% असल्याने बेदाणे तयार करण्यास ही जात चांगली आहे.

खत नियोजन

द्राक्षवेलींना लागणा-या सर्व आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा हा वेलीची वाढ, उत्पादन गुणवत्ता यावर अवलंबून असतो. द्राक्षांच्या काड्या लावल्यापासून पीक येईपर्यंतच्या काळात खते देणे आवश्यक आहे द्राक्षासाठी प्रति हेक्टरी ९०० कि. नत्र, ५०० कि. स्फुरद व ७०० कि. पालाश ऑक्टोबर व एप्रिल छाटणीला मिळून द्यावे त्या पैकी ५०० कि. नत्र, २५० कि. स्फुरद हे ऑक्टोबर छाटणीच्या वेळी विभागून द्यावीत. सेंद्रीय खते आणि उशिरा उपलब्ध वर खते ऑक्टोबर छाटणीच्या पूर्वी १५ ते २० दिवस अगोदर द्यावीत. नत्र आणि स्फुरदाचा संबंध वेलीवरील काड्या परिपक्क होण्याशी आहे. तसेच नत्र व पालाशचा संबंध घडाच्या वाढीसाठी तसेच घड चांगल्या प्रकारे पक्क्व होण्याशी आहे. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचा वापर केल्यास दर्जेदार उत्पादन मिळू शकते

पाणी व्यवस्थापन

द्राक्ष वेलीला पाणी अधिक लागत नसेल तरी योग्य वेळी पाणी देणे फार मह्त्वाचे आहे. एप्रिल छाटणीनंतर पाण्याच्या किमान तीन पाळ्या द्याव्यात. ऑक्टोबर छाटणीनंतर हलके पाणी द्यावे. नंतर मात्र २० ते २५ दिवस पाणी देऊ नये. नंतर फळधारणा झाल्यानंतर फळे तयार होईपर्यंत बागेला नियमित पाणी द्यावे. ठिबक सिंचन पध्दतिने पिकांची पाणी वापरण्याची घनता २५% नी वाढते.यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होऊन बागायती क्षेत्र वाढविता येते.

 

इमेज कर्टसी : गुगल इमेजेस

Related posts

Shares