Search

द्राक्ष काढणी पश्चात नियोजन

द्राक्ष काढणी पश्चात नियोजन
[Total: 3    Average: 3.3/5]

भारतात द्राक्षाचा प्रसार इराण आणि अफगाणिस्थानातून झाला. यानंतर, द्राक्षाची मधुर चव येथील खवय्यांच्या मुखी अशी रुळली कि द्राक्ष आपल्या आहाराचा अविभाज्य भाग झाली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे. द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन आल्यानंतर द्राक्षे योग्य वेळेला योग्य पद्धतीने काढून त्यांची चांगली हाताळणी करणे महत्वाचे असते. याच बरोबर महत्वाचे असते ते काढणी पश्चात तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान नेमके काय आहे हे जाणून घेऊया.
घडांची जुळवाजुळव (साठवणुकीचे ठिकाण) : काढलेली द्राक्षे स्वच्छ ठिकाणी ठेवावीत व जागेचे निर्जंतुकीकरण करावे. काढलेली द्राक्षे स्वच्छ क्रेटमध्ये ठेवून करेत सावलीमध्ये ठेवावे. त्याच्यावर वर्तमानपत्रे किंवा कोणताही स्वच्छ कागद टाकून झाकून ठेवावे.जेणेकरून धूळ किंवा इतर कीटकांपासून संरक्षण होईल.
द्राक्ष घडांची स्वच्छता : घडांची स्वच्छता करते वेळी लांब निमुळते टोक असलेल्या कात्रीच्या सहाय्याने पक्व नसलेले मणी किंवा रोगाचा प्रादुर्भाव असलेले कमी-जास्त आकार असलेले मनी किंवा एकसारखा रंग नसलेले मणी, सुकलेले मणी ग्रेडिंगच्या वेळेस किंवा पॅकिंगच्या वेळेस काढून टाकावेत.
प्रतवारी : निर्यातक्षम द्राक्षांच्या प्रत्वारीसाठी आवश्यकतेनुसार घडांचे वजन जसे आकार, लांबी, रंग साखरेचे प्रमाण इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन प्रतवारी करावी. अॅगमार्कच्या निकषानुसार साखरेचे व आम्लाचे गुणोत्तर वा इतर गोष्टींची पूर्तता त्याप्रमाणे असावी. त्याचबरोबर पाठवण्याच्या आगोदर त्यातील रसायनांची मर्यादा निर्यातीच्या धोरणाला अनुसरून असावी.
* खाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्राक्षांची तीन गटांमध्ये प्रतवारी करतात.
उच्च प्रतवारीची द्राक्षे : उच्च प्रतवारीची द्राक्षे निवडताना प्रामुख्याने एकसारख्या वजनाचे, आकाराचे, रंगाचे घड निवडले जातात.
श्रेणी ( ग्रेड – १) : हि प्रतवारी करताना प्रामुख्याने चांगल्या प्रतीची द्राक्षे घेतली जातात. यामध्येसुद्धा रंग व चवीचा विचार केला जातो. या श्रेणीच्या द्राक्षांमध्ये आकारमान व रंगामध्ये थोडाफार बदल असल्यास अडचणी येत नाहीत.
श्रेणी ( ग्रेड – २) : या प्रतीच्या द्राक्षांमध्ये साठवणूकक्षमता जास्त असावी. बाकीचे गुणधर्मसुद्धा चांगले असावेत. प्रामुख्याने थोड्या-फार प्रमाणात असलेले बदल, जसे आकारमान, रंग, उन्हामुळे झालेले बदल, थोड्या-फार प्रमाणात सालीवर असलेले डाग इ. गोष्टी या श्रेणीमध्ये जास्त महत्वाच्या नसतात.
साठवण : यामध्ये पूर्वशीतकरण, शीतकरण असे दोन महत्वाचे टप्पे आहेत.
पूर्वशीतकरण : द्राक्ष काढणीच्या वेळी द्राक्षांमध्ये जी उष्णता असते ती उष्णता काढून टाकण्याच्या क्रियेला पूर्वशीतकरण म्हणतात. काढणी झाल्यानंतर दोन ते चार तासांच्या आत कोल्डस्टोरमध्ये साधारण सहा ते आठ तासांपर्यंत ठेवणे गरजेचे असते. शीतकरण केंद्र द्राक्ष बागेपासून दूर असायला हवे. त्यानंतर ते प़ॉलीथिन न काढता बॉक्समध्ये भरावे.
शीतकरण : पूर्वशीतकरण झाल्यानंतर पेटी भरताना पेटीच्या टाळला सल्फर डायऑक्साइड व बबल पॅड ठेवून त्यावर प़ॉलीथीनचा कागद टाकला जातो. घडांच्या दोन थरांमध्ये बबल पॅड वापरतात. त्यानंतर द्राक्ष शीतकरण केंद्रामध्ये ० डिग्री ते ०.५ डिग्री इतक्या तापमानात ठेवतात. त्याचबरोबर असणारी आर्द्रता ९५% इतकी असावी त्यामुळे द्राक्षांचा ताजेपणा जास्त काल टिकून राहतो.
वाहतूक : काढणीनंतर द्राक्षे लवकर बाजारपेठेत फोचावली पाहिजेत. जलद वाहतुकीच्या अभावी माल बाजारपेठेत वेळेवर फ्चाविला न गेल्याने त्यांचे नुकसान होते. म्हणून त्यांची देशांतर्गत वाहतूक कोल्ड चेन खंडित न होता शीतगृहाची सोय असणारे कंटेनर, ट्रक, रेल्वे ने करणे योग्य असते. परदेशी बाजारपेठेसाठी त्यांची वाहतूक शीतगृहाची सोय असणाऱ्या जहाजातून किंवा विमानातून केली जाते.

संदर्भ – महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, पुणे

Related posts

Shares